Friday, April 24, 2026
मंगौडे और दहीबडा !
मंगौडे और दहीबडा !
लेकीकडे आलोंय् परवां तळेगांवला आणि आज तिने झकास मुगाची भजीं ( मंगौडे ) आणि मॅंगो-शेकची मेजवानी दिली ब्रेकफास्टला. नेहमीप्रमाणे मी साठसत्तर वर्षें मागे फिरून आलो ते निमित्त साघून !
मी कॉलेजात असताना अक्सर पलासिया भागात (उगीचच) मटरगश्त करीत भटकंती करायचो. पलासियाच्या नुक्कडवर एक ठेलेवाला मंगौडे तळत उभा असायचा. गरमागरम मंगौडे और उनपर छिडकी हिरवीगार पुदिना चटणी बेहद मझा आणायची. लग्न ठरल्यावर उषाला सर्वात आधी ते मंगौडे खिलवले होते !
नव्हे, त्याच्या कितीतरी आधी दिवाकरला ग्वालियरच्या आत्याकडे सोडायला म्हणून पहांटे सहाच्या ‘पूलमन्’ ने निघालो होतो. दिवाकर तेव्हा जेमतेम पाच वर्षाचा असेल. डिसेंबरच्या थंडीचा कडाका होता पण देवास येतांच बस बाहेर टोपलीभर ताजे पेरू विकणाऱ्या पोराकडून त्याने एक भलामोठा पेरू घ्यायला लावला आणि जवळजवळ गुना येईपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत तो पेरू संपवला. तेवढ्या कडाक्याच्या थंडींत त्याहून गारेगार पेरू संपवण्याचा विक्रम त्या पाच वर्षीय बालकाने करून दाखवला होता !
इंदौर-ग्वालियर हे पंधरा तासाचे अंतर ती ‘पूलमन’ त्याकाळचे सर्वात जलद धावणारे वाहन समजले जात असे.
शिवपुरी आणि ग्वाल्हेरच्या मधे दोन महत्वाचे थांबे असत. एक रेंहट नि दुसरें मोहना. रेंहटला गरमागरम मंगौडे मिळत तर मोहनाला मलईदार दह्यात हरवून गेलेले लुसलुशीत दहीबडे ! इथे मात्र ट्रक्स्, बसेस आणि मोटारींची रांग लागायची ते फेमस् दहीबडे चट् करायला ! आम्हा दोघांसह जवळजवळ सर्व प्रवाशांनी तो लुफ्त उठवला.
अशीच रांग इन्दौरच्या सराफा बाजारात जोशी दहिबडावाल्यांच्या विकानासमोर लागते बरं का !
आणि हो, यशवंतराव समोरचे बर्वे दहीवडेवाले सुद्धा मस्त दहीबडे बनवतात, कारण ते मुळात इंदौरीच तर आहेत ना !
रहाळकर
२४ एप्रिल २०२६.