Wednesday, April 22, 2026
बोराड प्रोजेक्ट !
बोराड प्रोजेक्ट !
आज अचानक हा शब्द आठवला आणि मन भूतकाळात रमून गेले काही काळ. माझ्या भावंडांनीही हा शब्द ऐकला असेल पण माझ्या काही आठवणी त्यांनाही माहीत नसतील कदाचित् ! अण्णा म्हणजे आमचे तीर्थरूप जरी रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्यें अघिकारी असले तरी काही काळ त्यांनी पीडब्ल्यूडी विभागात लॅंड ॲक्विझीशन ऑफिसर म्हणून डेप्यूटेशनवर काम पाहिले होते. ते ऑफ़िस इंदौरच्या पलासिया भागात होते. दररोज नाही पण कधीकधी पश्चिम निमाड मधील धामनोदच्या अलिकडे पाच मैलांवर जरासे उजवीकडे तीन मैलांवर एक ‘बांध’ बांधण्याचे काम सुरू झाले होते. खेड्यापाड्यातल्या रस्त्यांवरून सहज जाऊ शकेल अशी हाय क्लियरन्सची व्हीएट कन्व्हर्टिबल फोर्ड कार अण्णांनी मुद्दाम विकत घेतली होती सरदार राहिंज यांचेकडून. मी त्याच गाडीवर ड्रायव्हिंग शिकलो आणि एकदा अण्णांबरोबर बोराड प्रोजेक्टच्या त्या डॅम साईटवर कार चालवीत गेलेले मला स्पष्ट आठवतेंय्. एवढेच नव्हे तर साईटवर दोन टिनशेड मधे राहणाऱ्या मराठी ओव्हसीयर कुटुंबासमवेत त्यांच्या त्या झोपडीवजा खोलींत त्यांनी अगत्याने बनवलेला चहा मी कधीच विसरणार नाही. ते मराठी ओव्हरसीयर कुटुंब म्हणजे पतिपत्नी नि त्यांची दोन गोंडस बछडी. त्यांनी एक बकरी देखील पाळली होती आणि बकरी दुधाचा असूनही तो चहा अक्षरश: अमृत-तुल्य लागला मला !
अण्णांच्या संवईनुरूप त्यांनी श्रीरामावर बोलायला सुरूवात केली आणि रामनक्षेवर भर देऊ लागले. वडिलांना मधेच थांबवून त्या उभयतांनी रामरक्षा म्हणायला सुरूवात केली आणि त्यांच्या बछड्यांनीही आपल्या बोबड्या शब्दांत त्यांची साथ दिली. खूप आनंद झाला अण्णांना आणि मी तर चक्क थिजलेला !
मराठी सुसंस्कार कसे पाळामुळात रूजले होते त्या काळी हे आठवून अजूनही अंगावर आनंदाने रोमांच उठतात !
रहाळकर
२२ एप्रिल २०२६.