Monday, March 30, 2026
कृतार्थ क्षण !
कृतार्थ क्षण !
काल अर्णव गोस्वामीने घेतलेली एका पीडियाट्रिक हार्ट सर्जनची मुलाखत पाहात होतो. एका ‘ब्ल्यू बेबी सिंड्रोमने ग्रस्त खूप लहान बालकावर केलेली हृदय-शस्त्रक्रिया आणि त्या चार तासांच्या ऑपरेशन नंतर ठणठणीत झालेले ते बाळ पाहून त्याची आईच नव्हे तर डॉक्टर देखील भावुक झालेले पाहून खूप आठवणी जाग्या झाल्या. खरोखर विलक्षण कृतार्थ वाटल्याचे ते दुर्मीळ क्षण असतात.
मला आठवत आहेत काही प्रसंग ज्यात निव्वळ येगायोगाने चमत्कार घडले जणू, मात्र जे मला कृतकृत्य करून गेले.
एकदा नायडू हॉस्पिटल मधील माझा दैनंदिन राऊंड आटोपून मी मुख्य वार्डमधे आलो. शेजारच्या रिकव्हरी रूममधे एक निश्चेय्ट बाळ टेबलवर पडले होते नि त्याची आई बाहेर बसून रडत होती. खोलीत दुसरेतिसरे कुणीच नव्हते. मी वार्डच्या सिस्टरजवळ चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की गॅस्ट्रोमुळे बाळ दगावले आहे, हाऊसमन नुकतेच डेथ सर्टिफिकेट लिहून गेलाय्. त्या बालकावर पुन्हा नजर टाकताच त्याने किंचित हालचाल केल्याचा मला भास झाला. जवळ जाऊन पाहिले नि सिस्टरला तातडीने एक कॅन्यूला द्यायला सांगितले. ती जाड सुई बाळाच्या मानेवरील शिरेंत खुपसली आणि आहिस्ते सलाईन सुरू केले. तिसऱ्या मिनिटाला बाळ श्वास घेऊ लागले आणि पुढील उपचारांना प्रतिसाद देऊ लागले. हा निव्वळ चमत्कार समजून मी तो प्रसंग कधीच विसरून गेलो होतो. मात्र बरोबर सहा महिन्यांनी एका गुटगुटीत, नवे कपडे नि टोपडं घातलेल्या बाळाला घेऊन एक ग्रामीण जोडपे घरी आले नि चक्क पायांवर लोटांगण घातले की दोघांनीही. मी त्यांना ओळखले नाही म्हणताच तिने बाळाच्या गळ्यावरचा व्रण दाखवला नि म्हणाली आता तरी आठवतंय का ते बाळ, हेच आहे ते ! मी आणि उषा अक्षरश: सुन्न ! !
मेडिकलच्या फायनल वर्षांत असताना छातीच्या आजारांवर अभ्यास करण्यासाठी एकटाच टीबी हॉस्पिटलमधे पेशंट तपासत फिरत होतो आणि अचानक एक रूग्ण विलक्षण ब्रेथलेस झालेला दिसला. त्याला तपासताच ‘ॲक्यूट न्यूमोथोरॅक्स’ हा आजार लक्षात आला ज्यांत फुफ्फुसांच्या दोन्ही प्लूरांदरम्यान हवा ट्रॅप होत फुफ्फुसाला पंक्चर करून टाकते. अशा वेळी ती हवा बाहेर काढणे तातडीचे असल्याने मी ड्यूटी डॉक्टरची चौकशी केली, मात्र तो उपलब्ध नसल्याने वार्ड सिस्टरला एक लांब सुई ( स्पायनल पंक्चरला लागणारी ) मागवली आणि सरळ कांखेखाली ती छातीत घुसवली. क्षणार्धात ट्रॅप्प्ड एयर बाहेर आली नि रूग्ण छानपैकी श्वास घेऊ लागला. वास्तविक एका मेडिकल स्टूडंटने केलेले ते विनाकारण धाडस होते, सुई फुफ्फुस किंवा हृदयाला टोचली गेली असती तर अनर्थ अटळ होता नि मी सरळ जेलमधे असतो ! तो प्रसंग आठवला तर अजूनही अंगावर काटा येतो खरा !
तसे इतर अनेक चांगल्या आठवणी पण आहेतच जेव्हा रडत ओरडत आलेले पेशंट हसतहसत बाहेर पडतानाही पाहिले आहेत मी !
म्हटलं ना, आमच्या वैद्यकीय क्षेत्रांत हरघडी कठीण प्रसंग येत राहतात पण एक मात्र खरे की ‘वुई ट्रीट, “ही” क्युअर्स’ !
रहाळकर
३० मार्च २०२६