Saturday, February 28, 2026

 

संतांची गणेश-वंदना !

 संतांची गणेश-वंदना

मंडळी, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला विनंती केली होती की ज्ञानेश्वरीतील पहिल्या वीस ओंव्या, ज्यांत श्रीगणेशाचे यथार्थ वर्णन माऊलींनी केले आहे ते शब्दार्थाने समजून घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असले तरी त्यांचा तात्विक किंवा फिलॉसॉफिकल अर्थ कृपया समजावून सांगावा. त्या विनंतीला मान देऊन आदरणीय सबनीस काकूंनी तें वर्णन वांग्मयीन अथवा साहित्यिक मूल्यांचा परिपाक असल्याचे कळवले होते. त्याच अनुषंगाने विचार करताना जाणवले की जवळजवळ सर्वच  संतांनी आपापल्या ग्रंथारंभीं श्रीगुणेशाचे विविध प्रकारें वर्णन आणि स्तवन केले आहे. मुळात हाच विचार मनात धर करून बसला आणि मग सुरू झाले एकशोधकार्यज्या योगे विविध ग्रंथांचा धांडोळा घेण्यात मागील कित्येक दिवस व्यस्त राहता आले मला


ज्ञानेश्वरी पाठोपाठ साहाजिकच आधी हातीं घेतला समर्थांचा श्रीदासबोध ! या आधीं अनेक वेळा तो ग्रंथ वाचला असला तरी आज मात्र श्रीगुणेश स्तवन वाचताना प्रत्यक्ष विलक्षण चैतन्यमयी, सळसळते, सजीव स्वरूप नजरेआड होईचना ! त्यांतील प्रत्येक शब्दन् शब्द जीवन्त साकार स्वरूपात जणू थुइथुई नाचत राहिलापहा, तुम्हालाही तो अनुभव येईल कदाचित्


सर्वप्रथम श्रीगणेशाचे निर्गुण किंवा तात्विकदृष्ट्या विश्वरूप स्वरूप सांगत असतानाच समर्थ त्याला वंदनीय का मानतात  त्याची कारणे देतात. ते म्हणतात की तो सर्व सिद्धींची, खरेतर सर्व साधनांची फळें देणारा, अज्ञानरूपी भ्रांतीचे आवरण दूर करून ज्ञानबोध करणारे मूर्तिमंत ज्ञानस्वरूप आहे. ते म्हणतात की हे गणनायका, माझ्या अंत:करणांत ठाण मांडून सदा सर्वकाळ वास्तव्य करावे आणि मज मुखदुर्बळास केवळ आपल्या कृपादृष्टीने (अध्यात्म सांगण्याचे ) बळ द्यावे. तुझ्या कृपेच्या बळाने भ्रांतीचे सगळे पापुद्रे विरघळून जातील आणि विश्वभक्षककाळदास होऊन राहील ! तुझ्या कृपेने विघ्नांचा थरकाप होईल आणि ती बिचारी देशोधडीला लागतील, कुठल्या कुठे नाहीशी होतील ! म्हणूनच तर तुलाविघ्नहरम्हणतात ना, आम्हा अनाथांचे माहेर, ज्याला विष्णु आदिदेव शंकरांसह सर्व देवीदेवता आधी वंदन करतात. सर्व मांगल्याचा खजीना असलेल्या श्रीगजाननाला प्रथम वंदन केले की होणारी सगळी कार्यें उत्तम प्रकारें फलद्रूप होतात असा अनुभव आहे


जयाचे आठवितां ध्यान / वाटे परम समाधान / नेत्रीं रिघोनियां मन / पांगुळे सर्वांगीं //“ ( श्रीगुणेशाचे सगुण रूपडें नजरेपुढे येताच विलक्षण समाधान मिळते, मन नि दृष्टी जणू एकवटते आणि इतर सर्व क्रियाकलाप बंद पडतात. ) 


श्री गणरायाचे अतिशय सुंदर मोहक रूप पाहून आणि त्याचे नर्तन पाहताना तर सर्व देव देखील दिंग्मूढ होतात

सर्वकाळ मदोन्मत्त / सदा आनंदें डुल्लत / हरूषें निर्भर उद्दित / सुप्रसन्नवदनु //“  ( त्यांचे गंडस्थळातून सतत मद झिरपत असतो आणि ब्रह्मानंदांत तो कायम डोलत राहतो. त्या उफाळून येणाऱ्या   ब्रह्मानंदामुळे त्यांचे वदन नेहमीच प्रसन्न भासते. ) 


श्रीगजाननाचे शरीर अतिशय भव्य, धिप्पाड, चपळ आणि शक्तिमान आहे तर मस्तकावर घनदाट शेंदूर चर्चिलेला आहे. सतत गळणाऱ्या मदाचा दिव्य सुगंध आसमंतात दरवळत राहतो आणि म्हणून कित्येक भुंगे घूं घूं असा आवाज करीत तेथे गर्दी करतात.


मुर्डीव शुंडादंड सरळें / शोभे अभिनव आवाळें / लंबित अधर तिक्षण गळे / क्षणक्षणां मंदसत्वीं //“ (एखाद्या जाड सोट्यासारखी त्याची सोंड कधी सरळ कधी मुरडलेली तर कधी गुंडाळलेली असते. तथापि ती  सतत वळवळत मात्र असते. त्याचा खालचा ओठ लोंबलेला असतो आणि कपाळावरील दोन आवाळें (टेंगुळासारखी) छानच दिसतात. क्षणाक्षणाला पाझरणारा मद मात्र कधीकधी उग्र वाटतो


चौदा विद्यांचा गोसांवी / ऱ्हस्व लोचन ते हिलावी / लवलवित फडकावी / फडै फडै कर्णथापा //“  ( चौदा विद्यांचा हा स्वामी असून त्याचे लोचन मात्र अतिशय लहान आहेत, ज्यांची तो वरचेवर उघडझाप करीत असतो. लांबरूंद पण अत्यंत लवचिक असे त्याचे कान तो पंख्याप्रमाणे हलवितो फडफडा आवाज करीत

त्याच्या मुकुटांत रंगबिरंगी झळाळणारी सुंदर रत्ने जडवलेली आहेत, तर कानांतील नीलमणियुक्त सुशोभित कुंडलें विशेष दैदिप्यमान वाटतात


दंत शुभ्र सद्दट / रत्नखचित हेमकट्ट / तया तळवटीं पत्रें नीट / तळपती लघु लघु //“ ( त्यांचे दात एकसारखे घट्ट आणि पांढरेशुभ्र आहेत आणि ते सोन्याच्या पानांनी वेढलेले तळपणारे असे आहेत


लवथवित मलपे दोंद / वेष्टित कट्ट नागबंद / क्षुद्र घंटिका मंद मंद / वाजती झणत्कारें //“ ( त्यांचे विशाल पोट थलथलतें. जीवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढून असतो आणि कमरेवरच्या साखळीची लहान लहान घुंगुरें मंद आवाजांत झणत्कारतात


चतुर्भुज लंबोदर / कासें कासिला पीतांबर / फडके दोंदीचा फणिवर / धुधुकार टाकी //“ ( त्यांचे पोट चांगलेच सुटलेले असून कमरेला घट्ट पीतांबर कसलेला आहे. पोटावरचा मोठा नाग फणा उभारून फुत्कार टाकतो आहे. ) 


डोलवी मस्तक जिव्हा लाळी / घालून बैसला वेटाळी / उभारोनि नाभिकमळीं / टकमकां पाहे //“ ( तो नाग फणा काढून डोलतो आणि जिभल्या चाटतो. कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा उभारून टकमक टकमक पाहतो ! ! ) 


या गणपतीच्या गळ्यात अनेक प्रकारच्या फुलांच्या माळा शोभत आहेत ज्या बेंबीपर्यंत रूळत आहेत. त्याचे वक्षस्थळावरील रत्नजडित पदक खूप शोभून दिसते आहे खरे


शोभे फरश आणि कमळ / अंकुश तिक्षण तेजाळ / येके करीं मोदकगोळ / तयावरि अति प्रीती //“ ( चार हातांपैकी एकात परशु, दुसऱ्या हातांत कमळ, तिसऱ्यात अणकुचीदार तेजस्वी अंकुश आणि चौथ्या हातावर गोल मोदक घेतलेला आहे. मोदक त्याला खूप आवडतो ! ) 


नट नाट्य कला कुसरी / नाना छंदें नृत्य करी / टाळ मृदांग भरोवरी / उपांग हुंकारे //“ ( अनेक प्रकारचे हावभाव करीत कला आणि कौशल्यसंपन्न असे नृत्य तो करतो. साथीला टाळ मृदंग वगैरे वाद्यें असतात ज्यांत अधूनमधून त्यांच्या हुंकारांची भर पडत राहते. ) 


हा गणपती क्षणभरही स्थिर राहात नाही कारण तो विलक्षण चपळही आहे. खरोखर तो सौंदर्याची जणू  खाण असल्यासारखा सुलक्षणी आणि सुबक आहे

रूणझुणा वाजती नेपुरें / वांकी बोभाटती गजरें / घागरियासहित मनोहरांचे / पाउलें दोनी //“ ( त्याच्या पाउलांतील पैंजण रूणझुण असा गोड आवाज करतात. बाकींचा देखील मोठा ध्वनी होतो. घुंगुरें घातलेली त्याची दोन्ही पाउलें मन वेधून घेतात. )


ईश्वरसभेसी आली शोभा / दिव्यांबरांची फांकली प्रभा / साहित्यविशई सुल्लभा / अष्टनायका होती //“ ( ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे विशेष शोभा येते. त्यांच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वदूर पसरते. त्यांचे सान्निध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका पुढे सरसावतात. ) 


ऐसा सर्वांगें सुंदरू / सकळ विद्यांचा आगरू / त्यासी माझा नमस्कारू / साष्टांग भावें //“

ध्यान गुणेळाचे वर्णितां / मतिप्रकाश होये भ्रांता / गुणानुवाद श्रवण करितां / वोळे सरस्वती //“ 

जयासी ब्रह्मादिक वंदिती / तेथे मानव बापुडे किती / असो प्राणी मंदमती / तेही गणेश चिंतावा //“ 

जे मूर्ख अवलक्षण / जे का हीणाहूनि हीण / तेचि होती दक्ष प्रविण / सर्वांविशईं //“ 

ऐसा जो परम समर्थ / पूर्ण करी मनोरथ / सप्रचीत भजन स्वार्थ / कल्लौ चंडविनायकौ //“

ऐसा गणेश मंगळमूर्ती / तो म्यां स्तविला येथामती / वांच्छ्या धरून चित्तीं / परमार्थाची //“ 

इति शम्

आठशे सहासष्ट शब्गांची ही पुष्पमाळ श्रीगजाननार्पणमस्तु

रहाळकर

२८ फेब्रुवारी २०२६    



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?