Saturday, June 28, 2025

 

चेरी पिकिंग !

 चेरी पिकिंग


काल फलाहार करत असताना जरा गंमत झाली. माझ्या वरच्या दाढेंत मी चघळत असलेल्याचेरीतली मोठ्ठी बी चक्क अडकून बसली हो ! आधीच सर्व दातांमधे भरपूर फटी आणि दाढांमध्ये तर क्रेटर्स झालेली. एऱ्हवी शेंगदाणा, फुटाणा, बटल्याचे दाणे वगैरे तर नेहमीच अडकतात पण या चेरीचे बीं भलतेच टणक निघाले हो नि काही केल्या काढताच येईना. मग काय, सूनबाईने तांतडीने फोनाफोनी करून इमर्जन्सी डेन्टल प्रॅक्टिसची लगोलग अपॉइंटमेंट मिळवली नि ती, मी आणि चिरंजीवांनी एकदाचे ते क्लिनिक शोधून काढले. सर्व सव्यापसव्य करून वट्ट सत्तावीस पाऊंड मोजून ते भले मोठे बीं अख्खेच्या अख्खे डिलिव्हर करण्यांत यशस्वी ठरल्या डेन्टिस्ट बाईअसेही एकचेरी पिकिंग’ ! ! 


खरंतर या दिवसात अख्ख्या इंग्लंडभरफ्रूट पिकिंगचा कार्यक्रम हौशे गवशे नि काही पर्यटक आवर्जून हातीं घेतात. शहरानजीकच्या मोठाल्याफार्म्सवर तुम्हाला हवी तेवढी फळें, भाज्या, कांदेबटाटे वगैरे सर्व काही स्वहस्तें तोडून किंवा उपटून आपापल्या ट्रॉलीजवर गोळा करतात, गेटपाशी असलेल्या तराजूंत तोलून बोर्डवर लिहिलेल्या किंमतीनुसार पैसे आदा करून गाड्यांच्याडिकीजतुडुंब भरून घेतसोने लुटूनि मोरू घरासी परतुनियेतात ! आम्ही मागे हा सोहोळा दोनतीन वेळां उपभोगला आहे. अर्थात कालचाचेरी पिकिंगकार्यक्रम जरासा आगळा ठरला खरा

रहाळकर

२८ जून २०२५ 


Sunday, June 22, 2025

 

दर्शन !

 दर्शन


खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या एका अनामिक कवीच्या काही पंक्ती आठवल्या आणि त्यातीलमी कधीच नाही म्हटले मज दे दर्शनही ओळ काही केल्या पिच्छा सोडायला राजी नाही आज. म्हणून म्हटलं आजदर्शनवरच बोलू काही बाही

आपण मुळात देऊळात काय म्हणून जात असतो हो ? देवाला पाहायला की त्याचे दर्शन घ्यायला ? आपण जरी म्हटले की दर्शन घ्यायला तरी खरं तर ते त्या मूर्तीला डोळ्यांत साठवून घेण्यासाठी अनिमिष नेत्रांनीपाहातअसतो आपणमात्रदर्शनघडते आपण डोळे मिटून घेतल्यावर. म्हणजेच उघड्या डोळ्यांनी घडते तेपाहणेनि बंद डोळ्यांनी होते तेदर्शनआणि असे दर्शन आपण केव्हाही, कुठेही घेऊ शकतो, नव्हे घेतो


दर्शन या शब्दाचा हिंदीत तत्वज्ञान असा अर्थ आहे आणि आपल्याला देखील ती षट् दर्शने या स्वरूपात ओळखीची आहेत. तत्वज्ञानाला अम्मळ बाजूला ठेऊन निव्वळ दर्शनाचा विचार करूंया

एखाद्या थोर विभूतीचे दर्शन घेण्यासाठी कित्येक जिज्ञासूंना मी तासनतास वाट पाहतांना पाहिले आहे. अगदी पहिली आठवण आहे पंडित नेहरूंचे इंदौर आगमनाच्या वेळची. माझा अंतरंग मित्र आणि मी एयरोड्रोम रोडवर चक्क दोन तास सायकलींच्या दांड्यावर पाय विसावत, ताटकळत उभे असलेले मला स्पष्टपणे आठवतेय्. मात्र त्यालादर्शनम्हणणार नाही मी.


नंतर नंतर परिक्षेच्यावायव्हा-व्होसीसाठी खूपसे नर्व्हस् होत आपले नाव कधी पुकारले जाईल या विवंचनेत घालवलेले क्षण. ती प्रतिक्षाही जीवघेणी असे

मात्र स्वामींच्याफोल्डमधे आल्यावर ते दर्शन देण्यासाठी बाहेर येण्याची उत्कंठा कित्येक वर्षें मनापासून जोपासली आहे आम्ही सर्वांनी. अगदी ते पुन्हा दिसेनासे होईपर्यंत माना उंचावत किती किती सांठवून घेत असूं तें रूप आम्ही


तथापि माझे एक ज्येष्ठ स्नेही नेहमी आग्रह धरीत यापाहण्यावर’. ते म्हणत की ब्रदर, यू मस्ट अलौ दॅट व्हिजन टु सेटल् डाऊन डीप इन्टु युवर कानशन्स ! ( तू पाहात असलेले रूप तुझ्या अंतरंगांत खोलवर मुरूं देत, जपून ठेव त्या रूपड्याला आपल्या हृदयांत आणि मग पहा दरवेळी एक नवीन चमत्कार तूं अनुभवशील. तो दयाळू परमात्मा हांक देताही प्रत्यक्ष उभा ठाकेल तुझ्यासमोर ! ! ) 


मला वाटतंपाहणें निदर्शनयांतील फरक हाच असावा

रहाळकर

मु. पो. लंडन

२२ जून २०२५.    


Friday, June 13, 2025

 

प्रपोझ नि डिस्पोझ !

 प्रपोज ॲंड डिस्पोझ


आपल्या मराठीत एक छान वाक्प्रचार आहे, ‘मॅन प्रपोझेस ॲंड गॉड डिस्पोझेस्म्हणजे ढोबळमानाने मनाने हजार संकल्प केले तरी नियती तिला हवे तेच करवून घेते ! आता मला सांगा, यानियतीचानियंताकोण असेलकुठे असेल, कसा असेल ? वास्तविक तो नियंता म्हणजे परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म असेल. कोणी पाहिलंय तें किंवा निदान अनुभवलंय ? आपल्याला असं सांगण्यात आलंय की प्रत्येकाची नियती किंवा नशीब ज्याचेत्याचे कर्मानुरूप घडत असते. सत्कर्म वा दुष्कर्माची तरी प्रेरणा कुठून येते हो ? असे काही बालिश  प्रश्न असले तरी त्याचा सांगोपांग विचार करावासा वाटतोय आज. पहा तुम्हालाही काही सुचतंय का या गूढाचं गुपित


संकल्प किंवा विकल्प यांची जननीमनअसली तरी त्या मनाची जडणघडण होते इच्छा वासना नि तदनुरूप विचारांमुळे. इच्छा नि वासनांची जननी साहाजिकच इंद्रियें, मूलत: ज्ञानेंद्रियें. या ज्ञानेंद्रियांचे विषय आहेततन्मात्राअर्थात शब्द, स्पर्ष, रस, रूप नि गंधहा सगळा पसारा मांडण्याचे कारणप्रपोज नि डिस्पोजया विषयांचे चिंतन


मुळात आपण जे काही ठरवितो ते अंमलात आणण्यासाठी थोडेबहुत प्रयत्न तर करावेच लागतात ना. त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी दृढ इच्छाशक्ती लागते. शिवाय मनातल्या मनात का होईना त्यांची कार्यपद्धती किंवा मोडस् ऑपरॅंडी आखावी लागते. या कार्यपद्धतीला किंवा खरेतर अशा संकल्पाला आपण प्रपोजल म्हणूया

सरकारी हपिसांत एखादा ज्युनियर अधिकारी किंवा लेखनिक देखीलसाहेबांच्यापरवानगी साठी एखादा मुद्दा मांडतो नि क्वचित कधी ते प्रपोजल साहेब मोडीत काढतो, आऊटराइटडिस्पोज् ऑफकरून टाकतो ! सर्कारी हपिसावरून आठवलं, कित्येकफाईल्सशहानिशा करतांच परस्पर डिस्पोज होतात. अशा वेळी त्या हपिसरला परमात्मा कसे म्हणतां येईल ? तो तर आपल्या कर्तव्य-कर्मांत गढून असणारा नाही का

कालच्या अहमगाबाद येथील विमान दुर्घटनेविषयी ऐकून बेचैन झालो. मनात आले की एकाच वेळी शेकडो प्रवासी काय म्हणून मारले गेले, प्रत्येकाची नियती एकाच वेळी कशी काय फिरली ? खरोखर अनाकलनीय, अतर्क्य आहे हा नियतीचा खेळ किंवा खेळखंडोबा

त्यांतील प्रत्येक प्रवाशाचे काही ना काही संकल्प असतीलच ना, मग ते सर्व एका झटटक्यांत कसे काय डिस्पोज झाले

कुदरत की गती न्यारीम्हणतात हेच खरं !


रहाळकर

१३ जून २०२५.   


This page is powered by Blogger. Isn't yours?