Saturday, June 28, 2025
चेरी पिकिंग !
चेरी पिकिंग !
काल फलाहार करत असताना जरा गंमत झाली. माझ्या वरच्या दाढेंत मी चघळत असलेल्या ‘चेरी’तली मोठ्ठी बी चक्क अडकून बसली हो ! आधीच सर्व दातांमधे भरपूर फटी आणि दाढांमध्ये तर क्रेटर्स झालेली. एऱ्हवी शेंगदाणा, फुटाणा, बटल्याचे दाणे वगैरे तर नेहमीच अडकतात पण या चेरीचे बीं भलतेच टणक निघाले हो नि काही केल्या काढताच येईना. मग काय, सूनबाईने तांतडीने फोनाफोनी करून इमर्जन्सी डेन्टल प्रॅक्टिसची लगोलग अपॉइंटमेंट मिळवली नि ती, मी आणि चिरंजीवांनी एकदाचे ते क्लिनिक शोधून काढले. सर्व सव्यापसव्य करून वट्ट सत्तावीस पाऊंड मोजून ते भले मोठे बीं अख्खेच्या अख्खे डिलिव्हर करण्यांत यशस्वी ठरल्या डेन्टिस्ट बाई ! असेही एक ‘चेरी पिकिंग’ ! !
खरंतर या दिवसात अख्ख्या इंग्लंडभर ‘फ्रूट पिकिंग’चा कार्यक्रम हौशे गवशे नि काही पर्यटक आवर्जून हातीं घेतात. शहरानजीकच्या मोठाल्या ‘फार्म्स’वर तुम्हाला हवी तेवढी फळें, भाज्या, कांदेबटाटे वगैरे सर्व काही स्वहस्तें तोडून किंवा उपटून आपापल्या ट्रॉलीजवर गोळा करतात, गेटपाशी असलेल्या तराजूंत तोलून बोर्डवर लिहिलेल्या किंमतीनुसार पैसे आदा करून गाड्यांच्या ‘डिकीज’ तुडुंब भरून घेत ‘सोने लुटूनि मोरू घरासी परतुनि’ येतात ! आम्ही मागे हा सोहोळा दोनतीन वेळां उपभोगला आहे. अर्थात कालचा ‘चेरी पिकिंग’ कार्यक्रम जरासा आगळा ठरला खरा!
रहाळकर
२८ जून २०२५