Wednesday, January 22, 2025

 

अद्वय उपास्ति !

 अद्वय उपास्ति !

परवां ज्ञानेश्वरी ऐकत असतांनाअद्वय उपास्तिया संज्ञेवर अडकून पडलों आणि याचा शब्दश: अर्थ शोधून पाहिला. मनाजोगता अर्थ मिळाला नसला तरी अतिशय एकनिष्ठपणे, एकरूप होऊन  परमेश्वराची केलेली भक्ती किंवा उपासनाअखंड अविरतपणे करणे यालाअद्वय उपास्तिअसे म्हणता येईल. उदाहरण देतात नदीच्या अविरत प्रवाहाचे किंवा अखंड तैलधारावत्


मला वाटतं शारीरिक पातळीवर तसे अनुष्ठान घडणे अतिशय कठीण, खरेतर अशक्यप्राय असावे. मात्र मानसिक कदाचित घडूं शकेल. अर्थात मनाचे चांचल्य लक्षात घेतां तेही अवघडच होईल. मग संकटसमयीं ? कुंतीने तसा वर मागितल्याचे ऐकले होते, पण प्रपंचांत तो वर देखील कसा टिकून राहील ? बुद्धीला या कामीं जुंपले तर ती विवेक कसा साधणार ? चित्त तरी एकाग्र राहण्यासाठी कोणती क्लुप्ती करावी ? मग एऱ्हवीं नकोसा असलेला अहंकार काही मदत करू शकेल काय ? होय, मी करून दाखवीन असा बडेजाव मिरवला तरी तिथेमीनितोहे द्वैत असल्याने त्यालाअद्वयकसे म्हणणार

म्हणजेच अंत:करणाचे चारही दरवाजे बंद की

कोणी म्हणेल सततचा नामजप करणे हा मार्ग असू शकेल - अहो उठतबसतां, कार्य करितां, काहीही करतांही केवळ नामजपाची संवय जडली तरचअद्वय-उपास्तिच्या किंचित जवळ जातां येईल

तुमचे काय म्हणणे आहे यावर

रहाळकर

२३ जानेवारी २०२५      


 

विषरूपी अमृत !

 विषरूपी अमृत


वरील मथळा पाहून कदाचित अचंभित व्हाल तुम्ही म्हणून आधीच या शब्दांचे प्रयोजन सांगून टाकतो. ज्ञानेश्वरीतल्या सहाव्या अध्यायांत कुंडलिनी शक्ती, तिचे स्वरूप, जागृती, तिची सुषुम्नेतून ब्रह्मरंध्रापर्यंतची भरारी वगैरेचे सविस्तर मात्र अत्यंत गहन, नव्हे अतिशय कठीण विवेचन माऊलींनी केले आहे जे मूळ भगवद्गीतेंत आढळत नाही

ओंवी क्र. २४१ - “तेथ तृप्तीचेनि संतोषें / गरळ जें वमीं मुखें / तेणें तियेचेचि पीयुषें / प्राणु जिये // “ 


स्वामी स्वरूपानंद सांगतात

ऐशापरी तेथें महाभूतें दोन खावोनियां पूर्ण तृप्त होतां

शक्ती कुंडलिनी पहा राहे कैसी सुषुम्नेच्या पाशीं सौम्यपणें  

पावोनियां तृप्ती होतां समाधान टाकी मुखातून गरळ जें

त्या चि विषरूप अमृताच्या योगें धनंजया जगे प्राणवायू  

 

मला  वरील दोन शब्दांचा - विषरूपी अमृत - यांवर थोडीशी मल्लिनाथी करायची होती म्हणून जरासा भारी उल्लेख केला गेला, क्षमा करा

खरेतर, या निमित्त मला आठवले आमचे औषधी-विज्ञानाचे प्राध्यापक, ज्यांचे एक वाक्य मी अनेक वेळां त्यांचेच मुखातून ऐकले होते. ते म्हणत, ‘Remember, every medicine or drug is a potential Poison ! म्हणजेच आम्ही डॉक्टर मंडळी तुम्हाला औषधांच्या मिषाने चक्क विष भरवीत असतो की काय असा प्रश्न साहाजिकच आहे पण त्याचे उत्तरही तुम्ही जाणतांच. ‘अति सर्वत्र वर्जयेतहा नुस्खा असला तरी अनेक वेळाकाट्याने काटा काढणेहा सुद्धा उपचाराचा भाग असतोच की. ते असो

मला या निमित्त जरा आणखी बोलावेसे वाटतेय आज. असे पहा, होमिओपॅथीचा मूळ सिद्धान्त आहे - Similia Similibis Curentur - म्हणजे ज्या औषधाने एखादी व्याधी जडते त्याच औषधाच्या अति-सूक्ष्म प्रमाणांत त्याच व्याधीचे निराकरण देखील करता येते. त्या घटकाला वारंवार triturate करून अति सूक्ष्म स्थितीत आणले जाते

दुसरे उदाहरण जालीम सर्प-विषाचे. हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये सर्पविषातूनच व्हॅक्सीन निर्माण केले जाते ज्यायोगें रोगप्रतिबंध करता येतो


मंडळी, हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की सृष्टीतील एकही वस्तु निरर्थक नाही, अगदी आपले निर्जीव शरीर देखील. अर्थात जीवांत जीव असेपर्यंत या शरीराचा प्रत्येक कण आणि हातात असलेला प्रत्येक क्षण सत्कर्मांत, सद्व्यवहारात, सदाचरणांत घालवणे निव्वळ आपल्याच हातांत असते. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करावा, सतत कार्यमग्न असावे आणि मुख्य म्हणजे त्या सृष्टिकर्त्याचा छडा लावण्याचा निरंतर प्रयत्न करीत राहावे ! ! 


थांबलेच पाहिजे ना आतां ! ! ! 

रहाळकर

२२ जानेवारी २०२५.      


Thursday, January 09, 2025

 

माझे सहाध्यायी !

 माझे सहाध्यायी


माझ्या प्राथमिक शाळेपासून मेडिकल पर्यंतचे सर्व सहाध्यायी, नव्हे बहुतांश जणांची संख्या आठवतां आठवतां चक्क शंभराचा आकडा पार करून जाईल. नुसती नांवेच नव्हे तर प्रत्येकाची चेहरेपट्टी आणि लकबी सुध्दा नजरेपुढून झरझर जात असताना घडाळ्याचे काटे जणू थबकले होतेमग जाणवले की आज आठवलेली नांवे कदाचित उद्या विसरली जातील. सबब केवळ माझ्यासाठी तीं टिपून ठेवावी असे वाटले - तेवढाच विरंगुळा म्हणून

इंदौरच्या सहा नंबरच्या शाळेत अर्थात वागळ्यांच्या शाळेत मी पहिलीत दाखल झालो आणि रविंद्र नाईक या आडदांड मुलाने माझी विकेट उडवली कारण त्यावेळी माझ्या दोन्ही कानांत चक्कडूललोंबकळत होते, डोक्यावर टोपी होती, गळ्यात दप्तर नि हातीं पोळीचा लाडू असलेला डबा होता, ज्यावर त्याने झडप घालून तो मटकावला होता. एकूण सुरूवातच मुळीरॅगिंगने झाली होती ! ( मात्र तसा प्रसंग पुन्हा कधीच आला नाही कारण वडिलांनी शिक्षकाला वेळीच सज्जड दम दिला होता. खरंतर त्या निमित्ताने वडिलांनी दररोज तालीम किंवा आखाड्यात जाणे अनिवार्य करून टाकले नि घरी देखील सूर्यनमस्कार सक्तीचे केले होते ! ) 


मला एकही मैत्रीण नव्हती. बहिणींच्या मैत्रिणींशी देखील बोलायला मला कधी जमलेच नाही कारण मलाच विलक्षण लाज वाटायची त्यांच्या समोर असताना. साहाजिकच त्याही माझ्याकडे सहज दुर्लक्ष करीत. मित्र असे केवळ बोटावर मोजण्याइतपत विरळा. तथापि शाळाकॉलेजात साहाजिकच शेंकडोंनी सहाध्यायी होते. मी सर्वांशी अदबीने वागत असे म्हणून कदाचित तेही मला सलगीने वागवीत


यशवंत खिरवडकर हा विलक्षण बुध्दिमान मुलगा नेहमीच पहिला येई दर परिक्षेत आणि त्याचे पाटीवर लिहिलेले अक्षर अक्षरश: मोत्यासारखे सुंदर होते. खूप अबोल होता तो आणि नंतर माझा जीवश्चकंठश्च झालेल्या प्रमोद ऊर्फ पम्याचा मोठा भाऊ. पम्याने दोनदां डबल् प्रमोशन घेतल्याने तो माझ्याबरोबर मेडिकलचा सहाध्यायी झाला. पहिलीनंतर यशवंत कुठे होता ते मात्र माहीत नाही. असो.


सुधीर दामले शाळेतला विलक्षण चुणचुणीत, हुषार नि चतुर मुलगा. पाहतापाहतां तो अशा काही खोड्या करून मोकळा होई की मास्तरांनी हातांवर मारलेल्या झणझणित पट्ट्या काखेत हात कोंबून चुकलो चुकलो म्हणण्याशिवाय त्याला पर्याय नसे. गीद आणि वैद्य या बंडखोर जोडगोळीला बहुतेक वेळा दाराबाहेर उभे राहण्याची शिक्षा भोगावी लागत असे, कधीकधी दिवसभर


दुपारच्या सुटींत बंदीसाखळी हा खेळ खूप गलका करीत खेळायचो आम्ही नि त्यांत सुरेश नि रमेश खांडेकर हे चुलत भाऊ खूप चपळाई दाखवीत

दर तासाला शाळेची घंटा बडवायचे काम चंदु जोश्याकडे असे आणि तोही वर्ग खराखुरा रंगात आलेला असताना निष्ठुरपणे घंटा बडवायला मास्तरांसमोरून दिमाखात बाहेर जाई. मात्र चौधरी मास्तर एखादी सुंदर कविता साभिनय शिकवून रंगतदार करत असताना तोही कधीमधी गुंगून जाई नि चक्क दहा दहा मिनिटें उशीर होई घंटा वाजवायला. कधीतरी शेजारच्या वर्गातला किचकट कंटाळवाणा तास लवकर संपवण्यासाठी जोश्या चिंच-आंवळ्यांची चिरिमिरी लाटत असे

अशोक काळे, बंडू अभ्यंकर, विद्याधर बाकरे वगैरे मुलें जात्याच अतिशय बुध्दिवंत, सोज्वळ आणि उत्तम खानदानी वागणूक असलेली तर काकीर्डे, शहाणे, केळकर, अजित भोंडवे नि शिवाजी मोहिते उत्कृष्ठ क्रीडापटु होते. अजित पुढे भारतीय सैन्यात फुल कर्नल झाल्याचे कळले नि माझी छाती फुगून आली होतीपुढे नरेंद्र मेनन आणि भगवानदास या जोडीने मध्यभारत आणि अखंड भारतातही क्रिकेटमधे छान लौकिक मिळवला. नरेन्द्र आणि नंतर त्याचा मुलगाही एक यशस्वी टेस्ट अंपायर म्हणून चमकला

जे. एम्. शर्मा हा वेटर्नरीतला माझा सहाध्यायी उत्तम बास्केटबॉल खेळाडू, ज्याचे नावावर मध्यप्रदेशात आजही जगत् विख्यात बास्केटबॉल ॲकॅडमी कार्यरत आहे. व्हेटर्नरीतलाच शहाजी भोसले माझा सहाध्यायी होता, उंचापुरा धिप्पाड देखणा नि विलक्षण खानदानी. शिवपुरीला असताना वडील डेप्यूटी कलेक्टर तर शहाजीचे वडील श्री भोसले फ़ॉरेस्ट ऑफ़िसर होते. अतिशय दिलदार आणि बेधडक होते त्याचे व्यक्तिमत्व


तथापि मोजकेच का असेनात, मेडिकलला असताना काही निवडक मित्र मात्र मला खूप जिवलग झाले. पमू खिरवडकर, प्रफुल्ल देसाई, उल्हास पुराणिक, विजू माटे, लक्ष्मण पारोळकर, श्रीनिवास तपस्वी, दास मोटवानी, नौशाद अली, जनू खांडेकर, प्रकाश जैन नि प्रकाश बजाज तसेच गोव्याचा प्रकाश कुराडे नि काल्या  वर्मा ( हाय बजरंग फेम ! ) वगैरे खरोखर अंतरंग मित्र ठरले. या प्रत्येकाविषयीं खंडीभर लिहिता येईल पण ते तूर्तास करणार नाही कारण काहीच नाही

रहाळकर

जानेवारी २०२५.    


This page is powered by Blogger. Isn't yours?