Tuesday, March 03, 2026
त्रिकाळ चरणीं मस्तक ठेऊन…..!
त्रिकाळ चरणीं मस्तक ठेऊन…….!
काल अचानक मी तीर्थरूप अण्णांना लिहिलेले एक पत्र माझ्या पुन्हा पाहण्यांत आले आणि त्यातील मायना वाचतांना गतकालीन शेकडो आठवणी बेचैन करून गेल्या. वास्तविक अण्णांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेले प्रत्येक पत्र, मग ते साधे पोस्टकार्ड असो, इनलॅंड किंवा आंतरदेशीय वा पाकीट, या वंदनानेच सुरू होई - “तीर्थरूप राजमान्य राजेश्री तात्यांना बालकें बबनचा त्रिकाळ चरणीं मस्तक ठेऊन सादर शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विज्ञापना” ! पुढे हाच शिरस्ता मी नि माझी भावंडें सुरूवातीस पाळत असूं. मी मात्र अखेरपर्यंत अण्णांना तसेच संबोधन करत गेलो प्रत्येक पत्रातून (बबन ऐवजी बालके प्रभू एवढाच काय तो फरक ! ) वर नमूद केलेले पत्र मी अण्णांना आमच्या पहिल्याच लंडनवारी दरम्यान लिहिले होते आणि त्यांत एकूणच तिथल्या माहौलचे विस्तृत वर्णन केले होते, माझ्या परखड अभिप्रायांसह. ( खरंतर तुम्हालाही तो मजकूर वाचून मजा येईल )
सांगायचा मुद्दा असा की वडील आणि आजोबांचा हा नित्य पत्रव्यवहार दर आठवड्याला होणें अनिवार्य असे. एकाद वेळीं कधी विलंब झालाच तर लगेच तारेने विचारणा होई. दर आठवड्याला प्रत्येक पत्रातून सविस्तर बित्तंबातमी कळवणे हे नित्याचे असले तरी त्यातील मजकूर इतका विपुल असे की पत्राचा कानाकोपरा देखील शब्दांनी ओसंडून वाहात असे. पत्रातील रिकाम्या जागा दोघांनाही वर्ज्य होत्या ! आजोबा आणि अण्णांची लेखनशैली विलक्षण साहित्यिक मूल्यांवर आधारलेली असे. दोघेही विलक्षण भाषाप्रभू नि शब्दप्रभू. पत्र इंग्रजीत असो वा मराठीत, शुद्ध व्याकरण आणि नेमके शब्द वापरण्यात दोघांचाही हातखंडा असे. प्रवास वर्णने तर लाजबाब असत त्यांची. हाच वारसा माझ्या लेकी-लेकाने छान पाळला आहे, नव्हे वाढवला आहे. अर्थात् ‘ बालकें अमुक अमुकचा त्रिकाळ चरणीं मस्तक ठेऊन वगैरे भाग इतिहास-जमा झालाय् आतां !
रहाळकर
३ मार्च २०२६