Thursday, March 26, 2026

 

बे आना बेबे आना !

 बे आना बेबे आना


आज काय हे नवीनच अशा बुचकळ्यात तुम्ही पडलांत हे माहीत आहे मला म्हणून आधीच क्लियर करून टाकतो. ‘बे आना, बेबे आनाही साद देहरादून एक्स्प्रेसच्या तिसऱ्या वर्गातल्या डब्यात खूप लहानपणापासून ऐकत आलोय् मी. रात्री दहा वाजता मुंबई सेन्ट्रल सोडल्यावर पहाटे सहा साडेसहाला देहरादून एक्स्प्रेस बडोद्याला (आता वडोदरा) पोहोचत असे नि इतक्या पहाटे फेरीवाली मुलें बटाटा वेफर्सची पाकिटें नाचवीत डब्यात शिरत. त्या बे बे आनेवाल्या वेफर्सची लज्जत काही और असे. बटर पेपरमधे वेटाळलेली तीं वेफर्स अक्षरश: लाजबाब असत. तो फ्लेवर नंतर आयुष्यात कघीही चाखता आला नाही. दोनदोन आण्याला मिळणारी ती पाकिटे म्हणजे त्या काळचा अतिशय आनंददायक अनुभव असे, आताची बुधानी वेफर्स त्या चवीपुढे अगदीच तोकडी पडतील

या बे आण्यावरून आठवली तेव्हाची प्रचलित विविध नाणीं. माझ्या पीढीतल्या लोकांनी तांब्याची  पै, पैसा - ढब्बू आणि भोकाचा - मुरड असलेला एक आणा, चौकोनी दोन आणे, चवली, पावली नि बंदा रूपैयावट्ट चांदीचा - पाहिल्याचे आठवत असेल. बंदा रूपैया खण्ण् असा वाजला तरच तो जेन्युईन अन्यथा खोटा हाही अनुभव घेतला असेलच. मात्र सत्तावन अठ्ठावन सालींनवा पैसाआला नि नाण्यांची रयाच गेली बघा. चक्क ॲल्यूमिनियम वापरू लागले हो दहा पैशांसारख्या नाण्यांना

मला आठवतोय अक्षरश: ट्रकचे ट्रक भरून नेलेली जुनी नाणी. साहाजिकच वितळवून टाकली असतील तीं. या निमित्त मला आठवली आमचीमिंट सहल’. मुंबईला आलो असताना श्रीकांतने एक जोडकार्ड पाठवून मुंबईतील टांकसाळ किंवामिंटपाहण्याची परवानगी मागितली होती आम्हा सर्वांच्या नांवांसकट. बरोब्बर चौथ्याच दिवशी आम्हा सर्वांच्या नावाचेपासेसआले आणि रिझर्व बॅंकेसमोरील त्या मिंट मधे आम्हाला प्रवेश मिळाला. पूर्व-परवानगीने गेले असल्याने सोबत एक हपिसर देण्यात आला ज्याने आम्हाला विविध खात्यांतून फिरवून आणले होते स्वत:च्या रनिंग कमेंटरीसह. मात्र एका कोपऱ्यांत विशेष सुरक्षा कवच असलेल्या जाळीदार कक्षामधून शुद्ध सोन्याच्या लगडींचा ढीग त्याने लांबूनच पाहू दिला. होय, एकाच वेळी आम्ही खऱ्याखुऱ्या सोन्याचा डुंगर पाहिलाय् बरं का ! जय श्रीराम.

रहाळकर

चैत्र शुद्ध नवमी शके १९४८

अर्थातच श्रीरामनवमी


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?