Saturday, March 21, 2026

 

दिव्यानुभूती !

 दिव्यानुभूती

विबुधहो, आपल्यातील प्रत्येकाला केव्हाना केव्हा विलक्षण वाटावेत असे दिव्य अनुभव येत असतातच. मात्र ते कधी आठवतात तर बहुतेक वेळी निसटून जातात. कधीतरी निवान्त क्षणी ते अचानक आठवतात आणि आपण तिकडे कसे काय दुर्लक्ष केले याचे नवल वाटत राहते. प्रत्येकाचा तसा पूर्णपणे वैयक्तिक अनुभव असला तरी अधूनमधून काही अनुभव तिखटमीठ लावता सांगता आले तर पुन:प्रत्याचा अनुभव तर येतोच पण आणखी काहींना तसले गुपित सांगितले तर त्यांनाही त्या दिव्यानंदांत सहभागी करून घेण्यात आपल्याला धन्यता वाटते


प्रत्येक बाबतींत सुरूवात स्वत:पासून करावी या उद्देशाने काही मोजके प्रसंग साझा करीन म्हणतो


इंदौर शाजापूर वगैरे मागे टाकून पुण्यनगरींत स्थायिक होऊन अदमासे पंचावन्न वर्षे उलटलीत पण बरोब्बर साठ वर्षांपूर्वी शाजापूर नजिकच्या गिरवर मारुती  मंदिरातील माझा पहिलावहिला पूर्णपणे नि:स्वार्थी सेवा अनुभव विसरणे शक्यच नव्हते म्हणून काही वर्षांपूर्वी गिरवरला एकटाच जाऊन आलो होतो आमच्या इंदोर ट्रिप दरम्यान. त्या दिवशी खूप पाऊस झाला होता तरीही भिजत भिजत ते मंदिर गाठायला संध्याकाळ होत आलेली. सर्वदूर शुकशुकाट आणि मंदिरातही कोणीच नव्हते तरीही एक मंद पणती तिथे प्रज्वलित होती. मी गाभाऱ्यात शिरत असतांना अगदी जवळून कुणीतरी झपाट्याने बाहेर पडतानाचा भास झाला. दर्शन घेऊन बाहेर पडलो मात्र कोणाचीही चाहूल नव्हती. परत इंदोरला आलो आणि तेथून खामगावीं सद्गुरू दर्शनाला गेलो. मला पाहताच काकांनी विचारलं गिरवरला कोणी भेटलं काय. मी नकार देताच खूण सांगितली की तिथे एकच पणती लागली होती ना, तुम्ही आत येताना पाहून मी गुपचुप बाहेर पडलो होतो ! हा दिव्य अनुभव आजवर केवळ उषाला सांगितला होता, आज तुम्हालाही सांगावासा वाटला

दुसऱ्या एका वेळीं खूप वेळ रांगेंत उभे राहिल्यावर एकदाचे उज्जैनच्या महाकालाचे छान दर्शन झाले आणि समाधानाने बाहेर पडताना समोरच्या कट्ट्यावर श्रीकाका बसलेले दिसले. त्यांना वंदन करताच मला विचारले की दर्शन कसे झाले ? मी खूप छान असे म्हटल्यावर हसून म्हणाले की ते तर होणारच होते ! माईंड यू, काका त्यावेळी खामगावला होते. दर्शनासाठी तिथे गेल्यावर म्हणाले खूप वेळ ताटकळल्यावर महाकालाने छान दर्शन दिले ना, तुमचा चेहराच सांगत होता ! त्या उज्जैनच्या दर्शनाहून ही दिव्यानुभूती विलक्षण म्हणायला हवी ! स्मर्तृगामी म्हणतात ते हेच अनुभव

आणखी एकच प्रसंग सांगून तुमची रजा घेईन

एकदा त्र्यंबकेश्वरला सहकुटुंब गेले होतो. संध्याकाळ होत आलेली आणि बरोबरचे सर्वजण ब्रह्मगिरीवर जायला निघाले. मी एकटाच निवृत्तिमहाराजांचे समाधिमंदिरा समोर थांबलो. अचानक लोकांची वर्दळ थांबली म्हणून समाघी समोरील सभामंडपात स्वामींना साष्टांग दंडवत घातला. आजूबाजूला कोणीच नव्हते आणि दंडवत असताना डोक्यावर टपकन् एक गुच्छ पडला ज्यांत बेलपत्र, तुलसीपत्र आणि दोनतीन शुभ्र फुलें होती ! जवळपास कोणीही नव्हते, समाघी शिळा किमान आठ फूट दूर. चटकन् बाहेर येऊन पाहिलं, चिटपाखरूही नव्हतं ! हा प्रसाद कोणी दिला असावा, खरोखर अनाकलनीय आहे ही दिव्यानुभूती ! ! ! 

रहाळकर

चैत्र शुद्ध तृतीया शके १९४८

अर्थात २१ मार्च २०२६ 

पुणे.      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?