Friday, March 20, 2026
होळकर संस्थान !
होळकर संस्थान !
मंडळी, आज मी जे काही लिहिणार आहे ते कदाचित् ऐतिहासिक दृष्ट्या तंतोतंत बरोबर नसले तरी माझ्या बालपणी जे ऐकले, वाचले किंवा पाहिले ते मात्र शंभर टक्के खरे आहे.
ग्वाल्हेरचे शिंदे संस्थान किंवा बडोद्याचे गायकवाड संस्थान खूप वैभवशाली असले तरी होळकरांचे अगदीच दरिद्री नव्हते. अफूच्या लागवडीमुळे असेल कदाचित पण तेही बऱ्यापैकी सधन होते. तथापि मला सांगायचे आहे ते या संस्थानची प्रशासकीय गुणवत्ता आणि सांस्कृतिक वारसा. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी विधवा असूनही त्यांनी ज्या तडफेने आणि कौशल्याने राज्य कारभार चालवला त्या विषयीं शाळेत नि घरीदारीही अत्यंत आदरपूर्वक उल्लेख मी प्रत्यक्ष ऐकले आहेत. शाळेतले इतिहास आणि मराठीचे शिक्षक तसेच घरीं माझी आई आणि आजी त्यांच्या विशेष गौरवपूर्ण पराक्रमांच्या कथा सांगत.
महाराजा यशवंतराव होळकरांनी तो वारसा छान जपला आणि वाढवला देखील. त्यांनी किंवा त्यांच्या आधीच्या महाराजांनी ब्रिटिश राजवटीचे धर्तीवर आय. सी. एस्. सारखी होळकर सिव्हिल सर्व्हिसची- एच् सी एस्- स्थापना केली होती. माझ्या तीर्थरूपांनी ती परिक्षा पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. अहिल्यादेवींप्रमाणेच सर्व प्रशासनही पूर्णपणे लोकाभिमुख होते. अहिल्याबाईंनी तर पूर्ण मध्यप्रांत, विशेषकरून माळवा आणि निमाड आणि उत्तरप्रांतांत अगणित नद्यांवर घाट, तलाव, विहिरी आणि धर्मशाळा बांधल्या तर नंतरच्या शासकांनी औद्योगिक संकुलें उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला. माझे आजोबा होळकर संस्थानमधे कॅबिनेट सेक्रेटरी आणि नंतर डायरेक्टर इंडस्ट्रीज म्हणून विशेष छाप सोडून गेले. होळकर संस्थानचे तत्कालीन प्रधानमंत्री सर सिरेमल बाफना आजोबांचे निकटचे स्नेही. बाफना साहेबांना आमच्या घरी अनेकवेळा येऊन आजोबांशी सल्लामसलत करताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
महाराजा यशवंतरावांबद्दल माझे दोन्ही आतोबा विशेष प्रेमाने उल्लेख करीत. दोघेही इंजिनियरिंगच्या पदवी अभ्यासक्रमासाठी कराचीला जाणार होते संस्थानच्या शिष्यवृत्तीवर. मात्र त्यासाठी महाराजांनी स्वत: दोघांचाही प्रदीर्घ इंटरव्ह्यू घेतला होता आणि तुम्ही दोघे होळकर संस्थान मार्फत तिथे जात आहांत, आपले चालचलन आणि वर्तणूक त्याच आदबशीर दिमाखांत असली पाहिजे असा कानमंत्रही त्यांना दिला होता.
माझे आजे-श्वसुर डॉक्टर श्री द गोसावी हे तत्कालीन शासक तुकोजीराव महाराजांचे दरबार फिजिशियन होते आणि त्यांचे समवेत त्यांनी त्या काळी किमान पंचवीस तीस इंग्लंड-यूरोपच्या सफरी केल्या होत्या. मात्र स्वत: कधीही मांसाहार वा अपेय द्रव्यांचे सेवन केले नाही. असो.
होळकरांनी संगीत, कला, शिक्षण आणि खेळाला भरपूर प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य केले. त्यावेळच्या जगप्रसिद्ध होळकर इलेव्हन मघ्ये कर्नल सीके नायडू, सैय्यद मुश्ताक अली, हिरालाल गायकवाड, मेजर जगदाळे, सीटी सर्वटे वगैरे दिग्गज क्रिकेटपटू तर नरेंद्र मेनन सारखा उत्तम अंपायर जगाला दिला. जगातल्या सर्व क्रिकेट टीम्स इंदोरच्या यशवंत क्लब वर खेळल्या आहेत.
होळकर कॉलेज ही नामांकित शिक्षण संस्था म्हणजे उत्कृष्ठ शिक्षण देणारी टांकसाळ होती जणूं !
होळकर राज्यांत कवी, लेखक, साहित्यिकांना राजाश्रय होता तसेच नाट्यभारती सारख्या नवीन विचारांच्या संस्थांना पूर्ण सहकार्य मिळत असे.
परवां अचानक कुणीतरी आम्ही अजूनही ‘संस्थानिकांसारखे’ वागतो असा टोमणा हाणला म्हणून आज होळकर संस्थान आणि त्याची प्रजा काय चीज होती हे सांगितल्यावाचून राहवेना ! !
रहाळकर वय अवघे पंच्यांशी,
चैत्र शुद्ध द्वितीया श्रीमन्नृपशालिवाहन शके १९४८
अर्थात २० मार्च २०२६