Sunday, March 08, 2026
संतचरणांची याद !
संतचरणांची याद !
आज सकाळपासून खूप रूखरूख वाटतेय मनाला आणि सतत एखाद्या संत पुरूषाच्या किंवा विदूषीच्या चरणांपाशी बसून शांत विश्रान्त व्हावे असे वाटते आहे. याचे कारण मला माहीत आहे नि ते असे की नुकता कालच पुन्हा ‘संत स्तवन’ हा पाचवा समास पुन्हा वाचला होता. गेल्या ऐंशी वर्षांत असंख्य साधू सत्पुरूष तसेच विलक्षण बुद्धिमान, चतुर आणि दयार्द्र स्नेहाळ विदुषींचाही सत्संग घडला. त्यांतील काही महात्मे अजूनही हयात आहेत मात्र सर्वच्या सर्व स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेले आहेत. तथापि आज याद सतावते आहे त्यांच्या पवित्र मंगल चरणांची. खरंतर मी पाद्यपूजा वगैरे सोपस्कार करण्या ऐवजीं निवान्तपणे संतांचे मनोमन चरणदर्शन आणि सान्निध्य अनुभवण्यांत अधिक रमतो. आज मात्र स्मृती दगा देते आहे असे वाटले म्हणून ती मनाची रूखरूख, अस्वस्थपण आणि बेचैनी. उषाने काही नावें नि जागा सुचवून पाहिल्या, जसे वाई, फुलगाव, गोंदवले आणि पांवस देखील. मात्र लगेच उठून तिकडे धांव घेणे आता शक्य नाही हे पुन्हा जाणवताच चांगलाच हिरमोड झाला आज. मला आत्तां या क्षणीं संतचरणांची खूप खूप याद येतेय. तुम्ही काही मार्ग सुचवून पाहाल ?
रहाळकर
८ मार्च २०२६.