Thursday, February 19, 2026
परब्रह्म-स्वरूप !
परब्रह्म-स्वरूप !
सार्थ श्रीदासबोध लिहीत असताना प्राचार्य के.वि.बेलसरे अनेक विषयांचे स्पष्टीकरण आधीच सांगून टाकतात. परवां आपण श्रीसमर्थांचे जीवनदर्शन, त्यांचे अध्यात्म-विषयक तत्वज्ञान थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आज ‘परब्रह्म-स्वरूपा’ विषयीं जरासे समजून घेण्याचा प्रयास करणार आहे. अर्थात हेही विवेचन पूर्णत: प्राचार्यांचे आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही (आणि एकेकाळचा ‘वांग्मय- चौर्य’ हा प्रचलित शब्द टीका म्हणून ऐकावा लागणार नाही ! ) असो.
सर्वप्रथम ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ अतिविशाल, बृहत् किंवा खूप मोठे असे सांगताना तें सर्वसमावेशक, विलक्षण चैतन्याने परिपूर्ण अशी आत्मवस्तु असल्याचे सांगतात. वास्तविक हे दिसणारे जग किंवा अवघे विश्वच एकुलत्या एक ब्रह्मस्वरूपानेच ओतप्रोत असल्याचे सांगताना ते समजून घ्यायला आपली बुद्धी तोकडी पडते. तथापि, ब्रह्म ‘आहे’ म्हणजे त्या परब्रह्म-वस्तूला ‘अस्तित्व’ आहे, मात्र ते कसे हे सांगण्यासाठी, तें प्रत्यक्ष ‘दाखवतां येण्यासारखे नसल्याने नकारात्मक किंवा ‘नाही-पणाचे’ शब्द वापरावे लागतात ! (केवढे विडंबन ! )
त्याचे वर्णन ‘निर्गुण, निर्विकारी, निराकार, निरवयव, निरंजन, निर्विकल्प, निराभास, निष्प्रपंच, निराघार, निरुपम, निरूपाधि, नि:संग, निश्चल, निर्दोष, निष्कर्म, निर्लेप त्याचप्रमाणे अनात्म, अजन्म, अनंत, अप्रत्यक्ष, अक्षय, अगणित, अरूप, अलक्ष, अपार, अढळ, अतर्क्य, अद्वैत, अच्युत, अच्छेद्य, अदह्य, अक्लेद्य असे आहे. ( भगवंतांनी दुसऱ्या अध्यायांत आत्म्याचे वर्णन काही मोजक्या विशेषणांनी सांगितल्याचे आपल्याला माहीत आहे. मात्र वरील यादी त्या पलीकडची, खरंतर सर्वच विशेषणांच्या पलीकडची असल्याचे समजले तर ‘बृहत्’ या एकाच शब्दात ते सर्व सामावून जाईल.
याचाच अर्थ असा की मानवी बुद्धीच्या पलीकडचे हे प्रकर्ण आहे !
तर मग हे ब्रह्मस्वरूप कसे समजेल हे श्रीसमर्थ आत्मप्रचीतीच्या बळावर आणि त्या प्रकाशांत अतिशय सूक्ष्म असे ब्रह्म विश्वातल्या प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूंत, कणाकणांत, अणुरेणूंत सारखेपणाने गच्च भरून आहे असे सांगतात. ते कमीजास्त न होतां जसे आहे तसे अखंडपणे ‘असते’ ! ते एकच एक आहे, अमुक एक नसून सर्वत्र समसमान आहे. त्याचे वर्णन केवळ ‘मौनानेच’ करणे शक्य आहे ! !
तस्मात्, ‘गुह्यानां मौनं चाsस्मि’ म्हणत आतां गप्प राहणेच श्रेयस्कर ! !
रहाळकर
१९ फेब्रुवारी २०२६.