Sunday, February 15, 2026

 

गुणगुणणें !

 गुणगुणणें

स्वयंपाकघरांत कामात व्यस्त असलेल्या उर्मिलेला सहज गुणगुणताना ऐकून मनात विचार आला की आपण देखील केव्हा कसे कधीतरी काय म्हणून एखादे गीत किंवा धून गुणगुणण्यात मश्गूल होऊन जातो

या निमित्त आठवली गदिमांची एक कविता, जिच्यात ते म्हणतात - ‘अर्धे अंतर चालून आलो…….वगैरे पण पुढे म्हणतात, ‘मी असाच चालणार आहे, मुखीं येईल तें गाणार आहे, शब्द सुचेनासा झालाच तर, नुसतीच शीळ भरीन’ ! 

शीळ घालणे नि गुणगुणणे कधी घडते ? जेव्हा आपण निवान्त, अव्यग्र, काळजीमुक्त, सहजपणे वावरत असतो तेव्हाच. विचार करून पहा, खूप राग आलेला असताना काळजीने व्यग्र असताना एखादी मुलाखात देण्याआधी परिक्षेच्या वेळी किंवा घोर संकटात असताना गाणे गुणगुणणे किंवा शीळ घालणे ( शिट्टी मारणे नव्हे ! ) शक्य असते का हो ? तथापि माझ्या एका ज्येष्ठ स्नेह्याने टेन्शनमुक्त राहण्यासाठी हा उपाय सुचवला होता

वास्तविक प्रत्येकालाच आपल्या घरांत शांती, सौख्य, आनंददायक वातावरण कायम राहावे असे वाटत असते. विशेषकरून घरातील सुगृगिणी (आणि नवरोबा देखील ! ) एखादे गाणे गुणगुणताना पाहिले तर त्या घरात शांती, सुख, आनंदाचे वास्तव्य असल्याचा पडताळा येईल. तस्मात्, गुणगुणत राहा, निदान शीळ घालून पहा

रहाळकर

१५ फेब्रुवारी २०२६.    


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?