Friday, February 06, 2026

 

श्रीसमर्थांचे जीवनदर्शन !

 



श्रीसमर्थांचे जीवनदर्शन


 समर्थ श्रीरामदास स्वामींचे जीवनदर्शन अद्वैत सिद्धान्त आणि  व्यावहारिक द्वैत अंगाने विनटलेले  म्हणता येईल. त्याच संदर्भांत समर्थांचा समकालीन असलेल्या डच तत्ववेत्ता स्पिनोझाचाही उल्लेख नजरेस पडलापुढे जाण्याआधी या स्पिनोझाचे विचार काय होते हे जाणून घ्यायची उत्कंठा लागली. सबब कायम जवळ असलेल्या गूगल् बाबाची मदत घेतली. गूगल् प्रमाणे स्पिनोझाचे तत्वचिंतन   पूर्णत: व्यावहारिक किंवा सायन्टिफिक म्हटले तरी त्याला मूळ सिद्धान्ताचे कितपत पाठबळ असेल हे ज्ञात नाहीईश्वर किंवा GOD बद्दल त्याचे म्हणणे असे की परमेश्वर ही एक अतिविशाल, सर्वसमावेशक, असीमितवस्तुहोय, जी अमर्याद गुणांनी (Attributes) युक्त अशी आहे. त्याचे म्हणण्यानुसार हे विश्व परमेश्वर-निर्मित नसून ते परमेश्वराचाच एक अंश आहे

मला वाटतं या ठिकाणी त्याचे हे विचार आपल्या तत्वज्ञानाशी मिळतेजुळते आहेत


आतां श्रीसमर्थांचे जीवन-दर्शन अर्थात मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण काय होता ते पाहूं. आधी म्हटल्याप्रमाणे त्यांचे तत्वज्ञान अद्वैत आणि द्वैत या दोन्ही अंगांनी परिपूर्ण असे आहे. अद्वैत सिद्धान्त परमार्थ-स्वरूप असून तो शाश्वत, कालातीत, अमर्याद आणि सत्यस्वरूप आहे तर द्वैत सिद्धान्त हा प्रपंचरूप असून तो देश, काल, परिस्थितीनुरूप बदलणारा असा तात्पुरता, फसवा नि कालाधीन असतो. तो कल्पना, संकल्प-विकल्प, भाषा वगैरेंद्वारा व्यक्त होतो किंवा साकार होतो.


समर्थांचा परमार्थ हा सगुण साकार ईश्वराच्या (श्रीरामांच्या) भक्तिरसांत चिंब भिजलेला असला तरी व्यावहारिक दृष्ट्या त्या प्रेममय भक्तिरंगाला नीतिमत्तेच्या कोंदणांत बसवलेंय् त्यांनी. स्वत: आत्मसाक्षात्कारी संत असल्याने त्यांनी आत्म-प्रचीतीवर कायम भर दिलेला दिसून येईल. रोकडा अनुभव घ्यावा असा दंडक असे त्यांचा

मुळांत दासबोध हा ग्रंथ गुरू-शिष्य-संवाद स्वरूपात अर्थात प्रश्नोत्तर स्वरूपात असला तरी शिष्याने विचारलेले प्रश्न त्यांनीच अतिशय चाणाक्षपणे निर्माण करून मग त्यांची समर्पक उत्तरें दिल्याचे सहज लक्षात येईल

श्रीसमर्थांनी विशद केलेला भक्तिमार्ग विलक्षण बुद्धिप्रधान आहे, तेथे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. विशेष म्हणजे समर्थांचाविवेकावरविलक्षण भर होता. ( हाच विवेक स्पिनोझाच्या तत्वचिंतनात आढळून येईल ). असो

समर्थांचा विवेक तत्कालीन भोंगळ रूढींचा नि:पात करणारा असून उत्तम वैज्ञानिकाप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवावर त्यांचा विशेष भर होता. विवेकाच्या जोरावर माणूस अंत:करणाने विशाल होत्साता आत्मज्ञानी होऊ शकतो हे त्यांचे सर्वोच्च तत्वज्ञान किंवा जीवनदर्शन म्हणता येईल.

तथापि, प्रापंचिक संसारी माणसांसाठी त्यांनी दिलेली गुरुकिल्ली - ‘आधी प्रपंच करावा नेटकाविसरून कसे चालेल ? नीट विचार करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य म्हणता येईल. अविवेक आणि आळस ही करंटेपणाची लक्षणे होत.


श्रीसमर्थसाहित्याची शक्ती पुरेपूर जाणतात. जे दासबोधाचा अभ्यास करतील त्यांच्यांत आमूलाग्र परिवर्तन घडून येईल अशी ग्वाही ते देतात. ते म्हणतात - ‘अज्ञान, दु: भ्रांती नाश पावून लगेचच वैराग्य अंगीं बाणेल. त्याला विवेकाची जोड मिळेल. बद्ध मुमुक्षु होतील. मूर्ख दक्ष होतील. अभक्त भक्त बनून मोक्ष पावतील. नाना दोष जाऊन पतित पावन होतील. देहबुद्धिचे धोके टळतील. संसारातील उद्वेग नष्ट होऊन अधोगती चुकेल आणि मनाला खरी विश्रांती मिळून अत्यंत समाधान लाभेल

दासबोघाने अनेकांना हे फळ दिले आहे

इति शम्

रहाळकर

फेब्रुवारी २०२६      



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?