Thursday, January 15, 2026

 

सिव्हिक सेन्स वगैरे !

 सिव्हिक सेन्स, सद्भाव, सदिच्छा वगैरे


काल परवां देवेन्द्र फडणविसांच्या जवळजवळ सर्व मुलाखती लक्षपूर्वक पाहिल्या आणि त्यातील एक प्रश्न मनात ठाण मांडून बसला. प्रश्न साधा सोपा असला तरी अंतर्मुख करणारा आहे खरा. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंचाहत्तर वर्षे उलटूनही आपण अजून सामाजिक व्यवहारदृष्ट्या मागासलेले, बुरसटलेले का आहोत ; साधेसुधे शिष्टाचार आपल्यात का रूजले नाहीत ; सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठा अजून एवढी दूर कां वगैरे प्रश्न काही केल्या पिच्छा सोडायला तयार नाहीत आणि म्हणून वाटलं यांवरच जरासे चिंतन व्हावे


शालेय शिक्षणात आपल्या सर्वांनाच नागरिक-शास्त्र हा विषय असे. त्यांतील लोकसभा राज्यसभा वगैरे भाग सोडले तर वैयक्तिक जीवन आणि समाज जीवन यांवर थोडेबहुत शिकवले जाई हे खरे असले तरी त्याचा अंमल प्रत्यक्ष वागणुकीत अभावानेच आढळत राहिला. विशेषकरून पाश्चात्य किंवा प्रगत देशांत थोडे जरी वास्तव्य घडले तर आपल्यातील ही उणीव प्रकर्षाने जाणवते. अगदी सहज सोपे वाटणारे वाहतुकीचे नियम आपण किती सर्रासपणे पायदळीं तुडवतो. साधं वन् वे ट्रॅफिक किंवा सिग्नलवरचा लाल दिवा जुमानतां आपापली वाहने बिनदिक्कत घुसवतो. पादचारी क्रॉसिंगचा अभावाने वापर करतो आणि चक्क आपली वाहने त्यांवरच उभी करतो ! इतस्तथा कचरा टाकणे नि कुठेही पिंक टाकणे किती सहज घडते नाही ? वाहन चालवताना वारंवार लेन बदलणे, सतत हॉर्न वाजवणे, वाटेल तसे ओव्हरटेक करणे, वेगमर्यागेचे वारंवार उल्लंघन वगैरे कितीतरी वाईट नि चुकीच्या संवई अजूनही घालवू शकत नाही आपण. पादचारी पथ ( फूटपाथ ) छान अवस्थेत असो वा नसोत, ते वापरणे कमीपणाचे वाटते ना बहुतेकांना ? ट्रॅफिक नियम मोडणे हाच बहुतेक वेळा नियम झालाय् जणू

बरं, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींशी कसे वागतो आपण वाटेत अचानक गाठ पडते तेव्हा ? साघं अभिवादन, हाय हॅलो म्हणणे दूरच, निव्वळ स्मितहास्य द्यायला काय अडचण असावी ? कुणी घरी आले असताना किंवा आपण कुठे गेलो असताना सतत फोन पाहात बसणे हा शिष्ठाचार नक्कीच नव्हे. संभाषण करतानाही समोरच्याचे आघी पूर्ण ऐकून घ्यावे इतके सुद्धा जमत नाही कित्येकांना आणि चर्चा करायचा प्रसंग असला तरी आपलेच म्हणणे खरे हा अट्टाहास कशापायीं


तशी ही यादी खूप मोठी करता येईल. केवळ वानगीदाखल काहींच्या उल्लेख केला. मुळात आपली वागणूक आपणच समजून घ्यायला हवी नि तींत योग्य तो बदल घडवून आणावा. सार्वजनिक स्वच्छतेबाबत इन्दौर गेली कित्येक वर्षें प्रथम क्रमांकावर आहे, मात्र ते सहजासहजीं घडलेले नाही. कायद्याचा बडगा, दंडात्मक कारवाई बरोबरच लोक-शिक्षण आणि जन-जागृती फार महत्वाची आहेत जिकडे आपली अजूनही पाठ आहे. यांत लवकरात लवकर लक्ष घालणे अगत्याचे आहे असे वाटले म्हणून हे दीर्घ निवेदन ! क्षमस्व ! ! ( अरे हो, ते सद्भाव, सदिच्छा राहूनच गेले की राव ! ) 

रहाळकर

१५ जानेवारी २०२६       



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?