Monday, December 29, 2025
सन्माननीय सुहृद !
सन्माननीय सुहृद, सविनय सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
आज एक विलक्षण विनंती करायची आहे तुम्हा जाणकार ज्ञानेश्वरी पाठकांकडे. असं पहा की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेतले कित्येक सिद्धान्त छानपैकी समजावून सांगितले असले तरी माझ्यासारख्यांना ते समजून उमजून घ्यायला खूप सायास करावे लागतात. कित्येकांना ते सहज उमगतात आणि इतरांना समजावून सांगण्याची हातोटी देखील त्यांना साधत असते. अशा विशिष्ट सुहृदांसाठी ही प्रार्थनापूर्वक विनंती आहे. मला विश्वास आहे की तुम्ही मला फार वेळ ताटकळत न ठेवता माझी जिज्ञासापूर्ती लगेच करून मला उपकृत कराल.
सांख्ययोग, निष्काम कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास योग, कर्मसंन्यास योग, आत्मसंयमन योग, ज्ञानविज्ञान योग, अक्षरब्रह्म योग, राजविद्याराजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूपदर्शन योग, भक्ती योग, क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग, गुणत्रयविभाग योग, पुरूषोत्तम योग, दैवासुरसंपाद्विभाग योग, श्रद्धात्रयविउाग योग, मोक्षसंन्यास योग इत्यादी सर्व वाचून ऐकून अभ्यासून झाले (किंचित् का असेनात !) पण पहिल्याच अध्यायातील प्रारंभीच्या दोन ओंव्या सोडल्या तर तीन ते वीस या ओंव्या अजिबात समजल्या नाहीत मला. त्यांवरची प.पू.मामासाहेब दांडेकर, पूज्यनीय साखरे महाराज, स्वामी स्वरूपानंद इत्यादींचे भावार्थ समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, पण या अठरा ओंव्या काही केल्या मस्तकात शिरत नव्हत्या नि आतां तर बाहेर पडायलाही राजी नाहीत. काय करावे ते सुचेना. एकदा वाटलं चक्क तुमच्या पायांशी बसून सोप्पा अर्थ समजावून घ्यावा, पण तेही आता इतके सोप्पे राहिले नाही हो !
सबब, दोन्ही हात जोडून आणि नतमस्तक होत तुम्हाला अशी कळकळीची विनंती की त्या अठरा ओव्यांचा सोप्या शब्दात मला अर्थ सांगाल काय ? ( ‘हें शब्दब्रह्म अशेष’- पासून ‘तें मियां श्रीगुरूकृपा नमिलें / आदिबीज’ पर्यंत )
मला ठाव हाय की असे काही तुम्हाला विच्यारून मी माझेच पितळ उघडे पाडतोय. पण मुळातच भंगार असलेले सोनें कसे होईल कितीही मुलामा किंवा पुटें चढवली तरी ? तथापि केवळ परिस-स्पर्ष तसे करू शकतो आपल्याच वस्तुसामर्थ्याने आणि ते वस्तुसामर्थ्य तुमचेपाशी असल्याचा सुगावा मला लागला आहे. सबब कृपा करून मला या संभ्रमावस्थेतून बाहेर येण्यास त्वरित धांवून यावे अशी पुन्हा पुन्हा गळ घालतो.
रहाळकर
२९ डिसेंबर २०२५