Tuesday, December 23, 2025
सेल्फ ऑडिट - एक स्व-मूल्यांकन !
सेल्फ-ऑडिट एक स्व-मूल्यांकन !
अनेक वर्षांपूर्वी आमच्या स्टडी सर्कल मध्ये सहभाग घेत असताना माणसांतील सद्गुण-दुर्गुणांवरील चर्चा खूप रंगली होती. त्यावेळी मला चिटोऱ्यांवर टिपणे लिहून ठेवायची वाइट्ट खोड लागली होती. पूर्ण शीट्सचा वापर क्वचित होई आणि ती चिटोरी देखील ड्रावर मधे इतस्तथा पसरलेली असत. कधीकाळी मूड आलाच तर ती फुलस्केपवर उतरून काढत असे मी.
आज अचानक त्यातला एक कागद हातीं आला आणि वाटलं तुम्हालाही तो साझा करावा !
त्या दिवशी आम्ही सद्गुण-दुर्गुणांची यादी तयार केली होती आणि त्यांची व्याप्ती पाहूनच गलितगात्र झाले होतो आम्ही सर्व. एक नुसती झलक दाखवणार आहे आत्तां, पण एऱ्हवीं ती प्रचंड आहे परमेश्वराच्या असंख्य विभूतींसारखी. असो.
खरंतर प्रत्येकालाच असं नेहमी वाटत असतं की आपली मुलेबाळें सद्गुणी असावीत, त्यांच्यात कोणत्याही वाईट संवई रूजूं नयेत. आपण स्वत:ही कधी सन्मार्ग सोडू नये. मग त्यासाठी काय करायला हवे ? सद्गुण-दुर्गुणांची निदान ओळख तर हवीच ना ? थांबा, कोणतेही अवजड प्रवचन न करता केवळ एक यादी तुमचेसमोर ठेवणार आहे. कारण शुद्ध सद्गुणी नि निव्वळ दुर्गुणी कोणीच नसतो. सबब त्यांत योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा ज्याने त्याने आपापला करायचा आहे. ( आजही प्रस्तावना पुन्हा लांबलीच ! ) असो.
मात्र त्याही आधी एक बाब अधोरेखित करणे अगत्याचे आहे की आपल्यातील अवगुण हेच गुण मानणे हा दुर्गुणाचा कळस होय ! सो, बिवेअर ! !
वास्तविक दुसऱ्यांतील सद्गुण पाहायचे नि आपले दुर्गुण निपटून टाकण्यासाठी केलेले प्रयास सद्गुण-पोषणासाठी उपयुक्त ठरतील. दुर्गुण, पाप-पुण्याची वासना, पशुत्व, विकार मलिनता, देहबुद्धी वगैरे सगळे शब्द समानार्थी आहेत.
षड्रिपूंबद्दल तर आपण बालवयापासून ऐकत आले आहोत. त्यातील काम, क्रोध, मद , मत्सर, दंभ नि ईर्षा यां बरोबरच आळस, अति-निद्रा, संशय, भय, चिंता, आपलेच ते खरे असे वाटणे, स्वत:ला न येणारे न शिकणे, वादविवाद, शोक, संताप, परनिंदा, क्रियेवीण बोलणे, ( इतरांचा ) पैसा वैभव पाहून भुलणे नि मिंधे होणे, ‘मी’पण, वासनांवर नियंत्रण न ठेवता येणे, एकाग्र न होता येणे, सुखलालसा, व्यसनाघीनता, कठोर कर्कश खोटे उपहासाने बोलणे, छद्मीपण, दुसऱ्याचे दोष काढणे, अति-विनोद करणे, प्रसंगीं गंभीर न होणे, अभिमान नि गर्व, संसारातील दु:खांसाठी परमेश्वराला शिव्याशाप देणे,, सगुण-भजन न करणे, स्व-धर्माला गौण मानणे, साधनेची निंदा करणे, अति-करमणुकीत रमणे, वडिलांचा-थोरांचा अनादर, संतांची टिंगल टवाळी, इतरांना तुच्छ मानणे वगैरे वगैरे वगैरे !
तसे पाहिले तर ही यादी अजूनही अपुरी आहे. तथापि, अशा दुर्गुणांमुळे प्रापंचिक सुखाला, समाजातील सुसंवादाला आणि आध्यात्मिक विकासाला फार मोठी हानी पोहोचते एवढे समजले तरी पुरेसे आहे !
खरंतर, दुर्गुणांच्या या छोट्याशा यादीपेक्षां सद्गुणांची यादी खूप मोठी आहे, तिचा आपण प्रत्यहीं अंगिकार करीत असतो. त्यातील अगदी मोजक्याच उधृत करून थांबेन अशी खात्री देतो.
‘सत्य-धर्म-शांती-प्रेम-अहिंसा’ ही त्या चौऱ्यांशी मानवी मूल्यांचा परिपाक होय. अशा यादीचे दोन प्रकारांत विभाजन करता येईल.
एक- नकारात्मक सद्गुण, जसे नि:स्पृहता निरासक्ति निर्ममता निरहंकार निर्मत्सर निर्व्यसन निर्विकार निष्कपट नि:संदेह वगैरे. तर होकारात्मक सद्गुण म्हणजे सहना दुसऱ्याचे दोष गिळणे सतत शांती टिकवणे ईश्वरचिंतन अनुसंघान बाळगगणे आर्जव परोपकार सदा प्रसन्न राहणे संतोष आणि सर्वांना आत्मरूप मानणे !
ए टॉल ऑर्डर इंडीड ! कठीण पण असाध्य नाही !
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.
रहाळकर
२३ डिसेंबर २०२५.