Monday, December 22, 2025
इकडचं तिकडचं !
इकडचं तिकडचं !
परवांच पुन्हा एकदा अनिलांच्या कविता वाचनांत आल्या. माझ्या आवडत्या कवितांपैकीं ‘तळ्याकाठीं’ या कवितेच्या काही ओळी विनाकारण मनात रूंजी घालत राहिल्या - “अशा एखाद्या तळ्याच्या काठीं बसून राहावे मला वाटते / जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत आली असते…..”
काय सुंदर कल्पना आहे नाही !
मात्र आता स्वच्छ शांत निवांत तळीं मिळणे अवघड, त्यातून आपल्या स्वत:ला अशा निवान्त क्षणांची गरज असली तरी खरंच काढता येतात का हो असे निवान्तपण ? आणि समजा जमलंच तर आपल्याकडच्या तळ्यांकाठी, त्यातून सांजवेळी काहीशी भीती नि कसलीशी हुरहुरच जास्त वाटते नाही ? भीती जवळपासच्या पालापाचोळ्यातील सळसळीची, आणि हुरहुर या वयात दुसरी कोणती तर भा.रा.तांब्यांच्या दुसऱ्या एका कवितेतल्या ‘मधु मागसि माझ्या सख्या परी’ मधल्या - ‘संध्याछाया भिववित हृदया…’ ! असो.
आज भर दुपारी एकटाच भटकंती करायला बाहेर पडलो. आता वाढत्या वयानुरूप मिळालेल्या मोफत ‘फ्रीडम-पास’ मुळे लंडनभर कुठेही केव्हाही भटकंती करायची मोकळीक असल्याने ‘कोव्हेन्ट गार्डन’ या पर्यटकांनी गजबजलेल्या मेळ्यांत येऊन पोहोचलो. आपल्याकडे जसे गारूड्यांचे खेळ चालतात तसे इथेही विविध मनोरंजनात्मक खेळ, नकला, कसरती आणि ‘ म्यूझिकचे’ भरपूर कार्यक्रम सतत चालू असतात. त्या तशा कोलाहलात जरासा शांतपणे थोडावेळ बसून पाहिले पण मन काही रमेना.
म्हणून तेथून सरळ नॉरवुडच्या भल्या मोठ्या जलाशयाजवळ जाऊन बसलो. तिथे त्यावेळी माणसांची अजिबात गजबज नव्हती. बहुधा एकटाच. त्या विस्तीर्ण जलाशयाला प्रदक्षिणा घालून एका बांकड्यावर स्थानापन्न झालो. पाण्यांत मुबलक फिरणारी बदकें, राजहंस, कित्येक पक्ष्यांचा किलकिलाट एवढेच सोबतीला. पाण्याची सतत चाललेली चुळबुळ पाहात खूप वेळ नुसताच बसून राहिलो आजवरच्या कित्येक आठवणींना गोंजारत. खराखुरा निवान्तपणा अनुभवत होतो खूप दिवसांनी. आणि अचानक अनिलांची मला आवडणारी कविता आठवली आणि नंतर अनेकानेक तत्सम कवितांनी गर्दी करायला सुरूवात केली आणि जाणवले की कितीही निवान्तपण शोधायचा उपद्व्याप करून पाहिला तरी या बेट्या आठवणी नि कविता काही पिच्छा सोडत नसतात !
आज खरोखर ‘इकडचं तिकडचं’ लिहिलं पहा, कुठलाही शेंडाबुडखा नसलेलं लिखाण !
रहाळकर
लंडन
७ सप्टेंबर २००७.