Saturday, November 08, 2025
व्हेटर्नरी रिजेक्ट !
‘व्हेटर्नरी रिजेक्ट’ !
आज सकाळी सकाळी आदरणीय श्रीकाकांनी एक निरोप दिला उषाला की मी आता काहीतरी ‘दुर्बोध’ लिहायला सुरूवात करावी, जसे ‘आत्माराम’वरील भाष्य ! काका, आजवर तेच तर करत आलोंय की मी ! कारण माझी सर्वच लिखाणे या आत्मारामा भोवतीच तर फिरत राहिली आहेत ना ! असो.
मंडळी, एकेकाळी म्हणजे खूप पूर्वी ‘मेडिकल रिजेक्ट’ मुलें डेन्टिस्ट्री, फार्मसी किंवा व्हेटर्नरीकडे वळत. आस्मादिक मात्र व्हेटर्नरी रिजेक्ट मेडिकलला गेलेला एकमेव बंदा असेल ! होय, मी व्हेटर्नरीच्या पहिल्याच वर्षीं गचकलो होतो, चक्क नापास झालो होतो हो. आणि याचे खरेखुरे कारण सांगूं ? ‘व्हेटर्नरी क्या चीज है, पाहतापाहतां निव्वळ बुद्धिसामर्थ्यावर सहज पादाक्रांत करता येईल’ अशा भीमकाय अहंकारापोटी स्वत:चे हंसें करून बसलो हो मी, चक्क नापास झालो ! अभ्यास असा कधी झालाच नाही त्या वर्षीं. अर्थात अभ्यास न होण्याची कारणे ऐकून मात्र तुम्ही नक्कीच हेवा कराल माझा.
मुळात मी आधी व्हेटर्नरीला गेलोच का असे कुणालाही वाटेल कारण तोंवर मेडिकल प्रवेश मिळण्या इतके गुण माझ्या पदरीं होते. मात्र एकोणीसशे पन्नास ते साठ या दरम्यान हिंदुस्थानांत कमालीचे बदल घडत होते. इंदौरला बावन-पंचावन्न दरम्यान सुरू झालेले पहिले मेडिकल कॉलेज, सत्तावन सालचे व्हेटर्नरी कॉलेज महूजवळ इंदोरपासून पंधरा मैलांवर, तसेच भाखडा-नांगल भिलाई पेरांबलूर कोच फॅक्टरी वगैरे विशाल प्रोजेक्ट्स त्या दशकांत साकारत होते. बासष्ट नंतर मात्र भारताला जे ग्रहण लागले ते दूर व्हायला दोन हजार चौदा यावे लागले. तथापि पन्नास-साठचे दरम्यान नेहरूंचे वर्चस्व होते हे निर्विवाद. त्याच दरम्यान अनेक बिर्लामंदिरें, गीतामंदिरें, अनेक इतरही शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्या हे मी मोदी-भक्त असूनही अभिमानाने सांगतोय बरे का श्रीमान इंगोले काका ! असो.
आधी बराच स्थूल प्रकृतीचा मी दररोज महूला जा-ये करता करतां खूप ‘झटकलों’ होतो कारण आठवड्यातले तीन दिवस कम्पलसरी हॉर्स-रायडिंगचे धडे, त्यासाठी पहाटे सहाला सायकल सफारी कॉलेजपर्यंत, बॉडी-बिल्डिंगची लागलेली चटक वगैरें मुळे अभ्यास असा वर्षभर झालाच नाही. ब्रॅंड-न्यू कॉलेज, एक चांगला मित्रपरिवार आणि उत्तम शिक्षकांकडे पाहून मलाच विस्मय वाटत असे. त्यावेळी आमचे बहुतांश प्राध्यापक इंग्लंड-अमेरिकेत शिकून आलेले असल्याने त्यांची वेषभूषा अतिशय हायक्लास असे. सर्वच कायम सूटबूटनेक्टाय वाले ! त्यांची बोलण्याची पद्धतही ‘हायफाय’. महूच्या जगप्रसिद्ध ऑर्फियम थिएटरला त्यांच्या सारखीच आमचीही हजेरी कारण तिथे केवळ इंग्रजी सिनेमे लागत. त्यावेळचे सर्वोत्कृष्ट इंग्रजी सिनेमे मला पाहता आले.
आता मला सांगा, या सर्व व्यापातून मी अभ्यास तरी कसा करणार ? म्हणून चक्क नापास झालो बरे का मी !
आज सकाळी तिथल्या मित्रपरिवाराची उजळणी नोस्टॅल्जिक ठरली. अतिशय साधाभोळा, गरीब आणि आई नसलेल्या हुषार प्रमोद काले ची आधी याद आली. त्याचे शिक्षक वडील त्याला दररोज पहाटे सहाला डबा भरून देत, जो माझ्या डब्याबरोबर आम्ही एकत्रितपणे ‘पिगडंबर’ या वाटेवरच्या खेडेगावी ग्रहण करीत असू. अतिशय सालस असा प्रमोद कुणावरही कघीच रागावत नसे. त्यांच्या तोंडून मी कधीही शिविगाळ ऐकली नाही. दुसरा होता ग्वाल्हेरहून आलेला कडुसकर. शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेला, कारण त्याचे वडील आणि मोठे भाऊ ग्वाल्हेरला संगीत विद्यालय चालवीत. या कडुसकर मुळे मलाही शास्त्रीय संगीत आवडू लागले हे वास्तव आहे. जळगावचा सुनिल देशपांडे विलक्षण मसखऱ्या नि हजरजबाबी ! सर्वच शिक्षकांची यथेच्छ मिमिक्री करायचा तो. शिवपुरी-बॉर्न शहाजी भोसले विलक्षण उमदा, हुशार, काळा-सावळा पण देखणा आणि घरंदाज ! शाही म्यानरिझ्म्स आणि एटिकेट्स् त्याचेकडे पाहात शिकावे असा. उमेश वाघ हा हिंदीभाषिक मित्र खूप छान सिनेसंगीत गात असे आणि माऊथ-ऑर्गनवर डिट्टो शंकर-जयकिशनची गाणीं ! जेएम् शर्मा उत्तम बास्केटबॉलॉल पटू . त्याच्या नांवाने अजूनही कार्यरत असलेली डॉ. जेएम शर्मा स्पोर्ट्स कॅडमियमी अजूनही कार्यरत आहे.
असे एकाहून एक सरस मित्र मला लाभले त्या एका वर्षांत. म्हणून मी तेव्हा नापास झालो याचे मला अजिबात वैषम्य नाही.
(माझ्या बाबतीत असा कोणी विचार करत असतील काय त्यावेळचे माझे मित्र ? )
रहाळकर
८ नोव्हेंबर २०२५.