Thursday, November 06, 2025
तुलसी रामायण- भाग दोन !
तुलसी रामायण- भाग दोन
पहिल्या भागात हिंदीतून मराठीत केलेले भाषांतर पुन्हा वाचताना जाणवले की शब्दश: केलेला हा खटाटोप काही केल्या पकड घेत नाहीये. म्हणून आतां भावांतर करण्याचा प्रयत्न करणार आहे ! प्रभु श्रीराम हे माझे मूळ आराध्य-दैवत. तेच नेमके मागे पडत गेले इतर सर्व पाला पाचोळ्यांमुळे ! मला माहीत आहे की हातीं घेऊं पाहात असलेले कोदंड धनुष्य पेलण्यास माझी लेखणी तेवढी सक्षम नाही. तथापि आता उर्वरित आयुष्यात तरी श्रीरामांचे नित्य स्मरण होत राहील या निमित्ताने ! तर मग आपण बरोबर हा मार्ग चोखाळून पाहूया !
रहाळकर
६ नोव्हेंबर २०२५
आता भाग दुसरा-
(दोहा). -
“जथा सुअंजन अंजि दृग साधक सिध्दसुजान ।
कौतुक देखत सैल बन भूतल भूरि निदान ॥१॥”
(ज्या प्रमाणे दिव्य अंजन (सिध्दांजन) डोळ्यांत घालताच साधक, सिध्द आणि ज्ञानी पुरूष पर्वत, जंगलें आणि पृथ्वीच्या गर्भातील अद्भुत रहस्यें सहज पाहू शकतात).
“गुरूपद रज मृदु मंजुर अंजन । नयन अमिअ दृगदोष बिभंजन ।
तेहिं करि बिमल बिबेक बिलोचन । बरनउं रामचरित भव मोचन ॥
( ते सिद्धांजन म्हणजे श्रीगुरूंच्या चरणांची धूळ ! ती अतिशय मऊ, सुंदर आणि डोळ्यांना सुखावणारे दिव्य अंजन आहे, जे सर्वप्रकारचे नेत्रदोष दूर करते. त्या दिव्यांजनामुळे जागृत झालेल्या विवेकाने या संसाररूपी भवसागरातून तारून नेत मुक्तिप्रदान करणाऱ्य श्रीराम चरित्राचे मी आतां वर्णन करतो.) ॥१॥
“बंदउं प्रथम महीसुर चर्नी । मोह जनित संसय सबहरना ।
सुजन समाज सकल गुन खानी । करउं प्रनाम सप्रेमसुबानी ॥ “
(सर्वप्रथम पृथ्वीची देवता असलेल्या ब्रह्मवृंदाला मी वंदन करतो, जे अज्ञानजन्य सर्व शंकांचे निरस करतात. या नंतर सर्व गुणांची प्रत्यक्ष खाणच असलेल्या संत-सज्जनांना अत्यंत प्रेमपूर्वक, मधुर शब्दांनी आळवितो.) ॥२॥
“साधु चरित सुभ चरित कपासू । निरस बिसदगुनमय फल जासू ।
जो सहि दुख परछिद्र दुरावा । बंदनीय जेहिं जगजसं पावा ॥”
(संत-चरित्र कापूसा सारखे शुभंकर असते, ज्यांची फळें नीरस, विशुध्द आणि गुणकारी असतात. (कापसाचें बोंड नीरस म्हणजे रसहीन असते; तसे संत-जीवन विषयांपासून मुक्त असते. कापूस शुभ्र असतो तसे संत-हृदय अज्ञान आणि पाप-रूपी अंधार रहित असते. म्हणून त्याला विशुध्द म्हटले. कापूस अनेक तंतूंपासून बनलेला असतो तसे संतचरित्र सद्गुणांनी विणलेले असते. पुढे म्हणतात की ज्या प्रमाणे कापसाचा धागा सुईने केलेली छिद्रे सहन करीत कापड बनतो आणि माणसांच्या गुप्तांगांना झाकतो, तसे संत स्वत: अपरिमित दु:खें सहन करीत इतरांचे दोष झाकून टाकतात आणि म्हणून सर्व जग अशा यशस्वी संतांना नमन करते ).॥३॥
“मुद मंगलमय संत समाजू । जो जग जंगमतीरथराजू ।
राम भक्ति जहं सुरसरि धारा । सरसइ ब्रह्म बिचारप्रचारा ॥”
(संत-समाज खरोखर आनंद नि कल्याणकारी आहे,जो चालताबोलता प्रत्यक्ष तीर्थराज प्रयाग होय, जेथे रामभक्तिरूपी गंगाजळ खळाळत असते आणि ‘ब्रह्म-विचार’ म्हणजे जणूं (न दिसणारी) सरस्वती होय ! ॥४॥
“बिधि निषेधमय कलिमल हरनी । करम कथारबिनंदनि बरनी ।
हरि हर कथा बिराजति बेनी । सुनत सकल मुदमंगल देनी ॥”
(विधि-निषेध आणि कलियुगांतील पापांचे हरण करणारी सूर्यपुत्री यमुना असून भगवान् विष्णू आणि शिव-शंकरांच्या लोभस कथा त्रिवेणी संगम आहेत, ज्यांचे श्रवण घडतांच आनंद आणि मांगल्याची लयलूट होते ). ॥५॥
“बटु बिस्वास अचल निज धरमा । तीरथराजसमाज सुकरमा ।
सबहि सुलभ सब दिन सब देसा । सेवत सादर समनकलेसा ॥”
(त्या संत-समाजरूपी प्रयाग क्षेत्रीं आपल्या धर्मावर ज्यांचा अक्षुण्ण विश्वास आहे आणि केवळ सत्कर्म हेच ज्यांचे ब्रीद आहे असे ते प्रयागक्षेत्र सर्वांना, सर्वठिकाणी, केव्हाही सहज प्राप्त होऊ शकते. त्यांचा आदरपूर्वक अंगिकार केला तर सर्व क्लेष आणि दु:खांचा नायनाट होतो ). ॥६॥
“अकथ अलौकिक तीरथराऊ । देइ सद्य फल प्रगटप्रभाऊ ।”
(तें प्रयाग तीर्थ अलौकिक आणि वर्णणातीत आहे, तसेंच तात्काळ फल देणारे असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे ). ॥७॥
(दोहा-)
“सुनि समुझहिं जन मुदित मन मज्जहिं अतिअनुरागा ।
लहहिं चारि फल अछत तनु साधु समाजप्रयाग. ॥२॥”
(जे पुरूष या संत-समाजरूपी तीर्थराजाचा प्रभाव प्रसन्न चित्ताने ऐकतात आणि नंतर अतिशय प्रेमपूर्वक त्यांत डुबकी मारतात, ते याच देहीं याचिडोळां चारही पुरूषार्थांचे फल अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष , यांना प्राप्त करतात. )
“मज्जन फल पेखिअ ततकाल । काक होहिं पिकबकउ मराला ।
सुनि आचरज करै जनि कोई । सतसंगति महिमानहिं गोई. ॥८॥”
(या तीर्थस्नानाचे फलित इतके तात्काळ दिसते की कावळे कोकीळ होतात आणि बगळे हंस ! हे ऐकून कुणाला आश्चर्य वाटायला नको कारण सत्संगाचे माहात्म्य लपून राहात नाही. ) ॥१॥
“बालमीक नारद घटजोनी । निज निज मुखनि कहीनिज होनी ।
जलचर थलचर नभचर नाना । जे जड चेतन जीवजहाना ॥”
(वाल्मिक ऋषि, नारद आणि अगस्त्य ऋषींनीआपापल्या परीने त्यांचे अनुभव सांगितले आहेत. पाण्यातले जलचर, पृथ्वीवरील थलचर आणि आकाशातील नभचर तसेच जड-चेतन असलेले जितके जीव या जगांत आहेत - ॥२॥
“मति कीरति गति भूति भलाई । जब जेहिं जतनजहाँ जेहिं ।
सो जानब सतसंग प्रभाऊ । लोकहुं बेद न आनउपाऊ. ॥”
(-त्यांतील ज्यानी ज्यांनी, जेव्हा जेव्हा, जिथे जिथे,ज्या ज्या प्रयत्नांनी बुध्दी, कीर्ती, सदगती, ऐश्वर्य आणि सौख्य मिळविले आहे, ते सर्व सत्संगाद्वारेच मिळाले आहे असे निश्चितपणे समजले पाहिजे. वेद नि शास्त्रांत यांच्या प्राप्तीचा दुसरा कोणताच उपाय सांगितलेला नाही). ॥३॥
“बिनु सतसंग बिबेक न होई । राम कृपा बिनु सुलभन सोई ।
सतसंगत मुद मंगल मूला । सोइ फल सिधि सबसाधन फूला ॥”
(सत्संगाशिवाय विवेक जागृत होत नाही आणि श्रीराम कृपेशिवाय सतंसंग सहजपणे लाभत नाही.सत्संगच आनंद आणि योगक्षेमाचे मूळ होय.सत्संग-सिध्दि म्हणजे प्राप्ती हेच फलही आहे, इतर सर्व साधना ही त्या आधींचि फुलें !! ) ॥४॥
“सठ सुधरहिं सतसंगति पाई । पारस परस कुधातसुहाई ।
बिधि बस सुजन कुसंगत परहीं । फनी मनि समनिज गुन अनुसरहीं ॥ “
(दुष्ट मंडळी सुद्धा सत्संगाच्या प्रभावाने सुधारू शकतात, जसे परिस-स्पर्ष होताच लोखंड सोन्यांत परावर्तित होते. तसेच, दुर्दैवाने सज्जन माणूस जर दुष्टांचे संगतीत आला तरीही ते आपले सद्गुण कधीच सोडत नाहीत. एक सुंदर उपमा दिली आहे येथे - ‘ज्याप्रमाणे विषारी सर्पाचे मस्तकावर असूनही सर्पमणी त्या विषापासून दूर राहून आपला केवळ प्रकाश फांकवण्याचाच गुण राखून ठेवतो तसे साधू पुरूष दुष्टांच्या संगतींत राहूनही उपकारच करत राहतात, दुष्टांचा त्यांचेवर काहीच प्रभाव पडत नाही.) ॥५॥
क्रमश:......