Tuesday, November 04, 2025
ताई-सुधीच्या मैत्रिणी !
ताई-सुधीच्या मैत्रिणी !
ताई म्हणजे ज्योत्स्ना, माझी मोठी बहीण तर सुधा धाकटी. आम्हा तिघांच्या बालपणातल्या आठवणी साहाजिकच समान आहेत. आज्जी मला ‘कार्तिकस्वामी’ म्हणायची कारण कुठल्याच मुलीशी बोलायला सुद्धा मी लाजत असे. साहाजिकच मला मैत्रीण अशी कधीच नव्हती (अजूनही नाहीच हो ! ). ताई-सुघीचा मैत्रिणी-परिवार खूपच मोठा होता आणि त्यांचे घरीं येणेजाणे, नटणे मुरडणे आणि शिष्ठपणा नक्कीच टोचायचा मला. काही नावें आता सांगायला हरकत नाही कारण त्यांची आडनावें कधीच बदलली असणार !
ताईची एक मैत्रिण होती पुष्पा जतकर. उंच शिडशिडीत नि किंचित् वाकून चालणारी. गणेशोत्सवातल्या ‘फिश-पॉंड’ मधे तिला ‘फटा बांस’ हा किताब मिळाला होता. दुसरी शेजारीच राहणारी शैला देशपांडे. खूप नटायची नि लाडेलाडे बोलायची. तिचे एक वाक्य दरवेळी उच्चारले जाई आमच्या घरीं - ‘कुणाला सांगू नको बरं का, माझं किनई बॉबकट् करणार आहे मी. अतिशय रूपवान अशी सुधा केतकर खरं तर आमच्या अक्काची (चुलत बहीण) मैत्रीण तर तिची धाकटी बहीण प्रभा ताईची. दोघीही विलक्षण रूपवती आणि साहाजिकच झकास नवरे पटकावले दोघींनी. सुधाला आर्मीतला नवरा मिळाला जो पुढे ब्रिगेडियर झाला. सुधा तांबे आणि कुमुद मुळ्ये या ताईच्या जीवश्चकंठश्च ! होय, कलि देवल पण !
सुधीच्या मैत्रिणींपैकी मीना कोतवाल, सुधा संवत्सर वगैरे विशेषकरून आठवतात खऱ्या ! अरे हो, आणखी एक तर चक्क विसरणार होतो आत्तां. बरं झालं वेळीच सावध झालो, कारण तिचे नाव होते उषा गोसावी, जी माझी पत्नी आहे आतां ! !
लई भारी नै ?
रहाळकर
४ नोव्हेंबर २०२५.