Tuesday, November 25, 2025
संत-साहित्य आणि मी !
संत-साहित्य आणि मी !
खरं पाहिलं तर संत-साहित्याच्या आधी संत-चरित्रें प्रथम कानी पडली आणि नंतर वाचली गेली. आईवडील नि आज्जीबरोबर कथा-कीर्तने ऐकली लहानपणी आणि आई-आजीसुद्धा संतांबद्दल खूप गोष्टी सांगत असत, अर्थात आईचा भर शिवाजी महाराज आणि रामकथेवर अधिक असे. कुणास ठाऊक का, पण महाभारताकडे पाहण्याचा तिचा कल नसे. वडिलांना गीता-ज्ञानेश्वरी अधिक प्रिय असल्या तरी रामचरित मानस त्यांचा अतिशय आवडता ग्रंथ होता.
माझी आणि समर्थ श्रीरामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, संत श्री नामदेव इतकेच नव्हे तर चांगदेवांची देखील बालपणीच ओळख झाली होती. सर्वप्रथम संतचरित्र वाचले ते शेगावींच्या श्रीगजानन महाराजांचे. वाचन कसले, कित्येक पारायणेही झाली. नंतर साई सच्चरित् झाले नि नंतर सत्यम् शिवम् सुंदरम् ही स्वामींची कित्येक भागातील गुण-संकीर्तने वाचनांत आलीं. प्रत्यक्ष संत-साहित्य हातीं घ्यायला निवृत्तिनंतरचा काळ यावा लागला !
मात्र त्याही आधी प.पू. नानामहाराज तराणेकर, रंगावधूत महाराज, गांडा महाराज, संत कबीर नि तुलसीदासांची चरित्रे देखील नजरेखालून गेलीत. थोडेबहुत सूरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभु, त्यागराज वगैरे संतांबद्दल कुतुहल असले तरी अभ्यास असा कधी झालाच नाही.
संत-साहित्याची खरी गोडी लागली ती एकदम ज्ञानेश्वरी हातात घेतली तेव्हाच ! माझे एक स्नेही नेहमी संत कबीर अभ्यासा असा सल्ला देत तर कुणी तुकारामांच्या गाथेचा आग्रह धरीत. दुसरा एक विद्वान जे. कृष्णमूर्तींचे वांग्मय वाच असा घोषा लावत असे आणि मला स्वत:ला आतून वाटायचे की उपनिषदांचा अभ्यास केला पाहिजे. पण अगदी खरं सांगू, ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेली भुरळ किंवा चटक इतर काही वाचायला वेळच देत नाही हो आतांशा !
रहाळकर
२५ नोव्हेंबर २०२५.