Sunday, November 23, 2025

 

अष्ट-सात्विक-भाव !

 अष्ट-सात्विक भाव


एखादे भयानक दृष्य पाहतांच आपण कधीकधी सुन्न होऊन जातो, दिंग्मूढ होतो, काहीच सुचेनासे होते, घाम फुटतो, अंगाला  शहारे येतात, बोलताच येत नाही आणि प्रयत्न केलाच तर अडखळतो, अडून जातो . कां घडतं हे सगळं अचानक ? आमच्या वैद्यकीय शास्त्रानुसार तात्काळ स्त्रवित झालेल्याॲड्रिनलीनया अतिसूक्ष्म रसायनामुळे तसे घडते आणि  याचे ताबडतोब होणारे पर्यवसान म्हणजे लढणे किंवा पळून जाणे ( fight or flight )  असले तरी आधी सांगितलेल्या लक्षणांत काय म्हणून अडकतो आपण ? कारण सेल्फ डिफेन्सचा एक मार्ग मोकळा होतो ! लढण्यापेक्षा पलायनवाद अधिक उपयुक्त ठरतो त्यावेळीं


तथापि, आध्यात्मिक क्षेत्रात तत्सम लक्षणांना  अष्टसात्निक भाव उफाळून येणे असा संकेत आहे. असे पहा, पांडुरंग विठ्ठल, मोहवून टाकणारी श्रीराम किंवा चित्तचोर श्रीकृष्णाची प्रतिमा पाहताना कित्येक वेळा आपलेही देहभान हरवते. माझे आजोबा नास्तिक नसले तरी पूजाअर्चा, मंदिरांत दर्शनार्थ जाणे वगैरे क्वचित करीत. तथापि एकदा ते पंढरीला गेले असताना विठुरायाच्या पायीं मस्तक टेकवल्यावर ते समोरच्या सभामंडपांत बसले आणि पाहता पाहतां दीर्घ समाधी अवस्थेत गेले जवळजवळ दोन तास आणि भानावर आले तेव्हा छातीवर असलेले उपरणेसुद्धा आनंदाश्रूंनी चिंब झालेले त्यांच्या लक्षात आले. आम्ही चौघे म्हणजे मी, उषा, सिद्धिश्री, श्रीश आणि राजूसुद्धा जेव्हा सर्वप्रथम स्वामींना पाहिले तेव्हा आम्ही सर्वच, नि मुलें तर स्फुंदून स्फुंदून आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले होतो. ही सर्व लक्षणें अष्ट-सात्विक-भावाची होती हे नंतर कुणीतरी समजावून सांगितले होते. आज त्याच अष्टसात्विकभावा संबंधी बोलणार आहे जरासे विस्तृतपणे, तरी अवधान एकले दीजो ही विनंती ! इति प्रस्तावना ! ! 


आघी ते अष्ट-सात्विक-भाव कोणते ते पाहू

अष्टसात्विकभाव म्हणजे दृष्य स्वरूपात शरीरात दिसून येणाऱ्या भाव-भावना, ज्या आत्यंतिक भक्तिप्रेमाने तुडुंब झाल्यावर ओसंडून वाहूं लागतात. त्यांची आठ नावें प्रसिद्ध आहेत - ) स्तंभ-स्तब्धता ; ) स्वेद- घाम फुटणे ; ) रोमांच- शरीरावरील केंस उभे राहणे ; ) स्वरभंग- आवाज बदलणे ; ) कंप- शरीर थरथरणे ; ) वैवर्ण्य- चेहऱ्याचा रंग बदलणे (आरक्त किंवा फिका पडणे ; ) अश्रुपात- आनंदाश्रू येणे ; आणि ) प्रलय- निश्चेष्टता, भावसमाघि


मंडळी, नवव्या अध्यायाच्या शेवटी माऊलींनी संजयाच्या मन:स्थितीचे तंतोतंत वर्णन केले आहे. आधी स्वामी स्वरूपानंदांच्या आणि लगोलग माऊलींच्या ओंव्या सांगून मगच  तुमची सुटका करीन म्हणतो


धृतराष्ट्रालागी / सांगावा वृत्तांत / करोनि निमित्त / हेंचि आज //

जन्म-मृत्यूंतून / सोडविले मज / कैसें मुनिराज / व्यासदेवें // 

ऐसें जंव दीर्घ- / सायासें तो बोले / करोनि आपुले / दृढ मन // 

तों चि ते सात्विक / भाव प्रकटले / जरी आवरले / नावरती // 

होवोनि चकित / आटूं लागे चित्त / पांगुळली तेथ / वाचा ती हि // 

पायांपासोनियां / मस्तकापर्यंत / झाले रोमांचित / सर्व अंग // 

अर्ध-उन्मीलित / लोचनांमधून / वाहती निघून / आनंदाश्रु // 

उचंबळे सुख / अंतरीं अमूप / म्हणोनियां कंप / शरीरातें // 

रोम-रंध्रांतून / स्वेद-बिंदू आले / ल्याला जणूं जाळें / मोतियांचे // 

महा-सुखें ऐसा / भरे अंत:प्रांत / जीवदशा तेथ / आटूं लागे // 

आणि व्यासें आज्ञा / केली जी साचार / तयाचा विसर / पडूं पाहे // 


तोंचि पार्थालागीं / बोले चक्रपाणी / तेंचि आले कानीं / घोघावत // 

तेणें घोषें तया / आले देहभान / टाकिले पुसून / मग अश्रू // 

सर्वांगाचा घाम / घेतला टिपून / मग उल्हासून / संजय तो //

धृतराष्ट्रालागीं / म्हणे अवधारा / अहो जी दातारा / संवाद हा //‘ 


संजयाची भूमि / सात्विक सुपीक / बीज निवडक / कृष्ण-वाक्य //

म्हणोनि प्रमेय-/ पिकाचा सुकाळ / होईल सकळ / श्रोतयांस //

अहो श्रोतेजन / सकळ सज्जन / द्यावें अवधान / अळुमाळ // 

तेणें तुम्ही व्हाल / स्वानंदाचे धनी / लोटलें श्रवणीं / भाग्य आज //‘ 


(माऊली संजयाचे मनोगत सांगताना म्हणतात - ‘परि बाप भाग्य माझें जें वृत्तांत सांगावयाचेनि व्याजें ।कैसा रक्षिलों मुनिराजें श्रीव्यासदेवें येतुलें हें वाडें सायासें जंव बोलत असे दृढें मानसें तंव धरवेचि आपुलिया ऐसें सात्विकें केले चित्त चाकाटलें आटु घेत वाचा पांहुळली जेथींची तेथ आपादकंचुकित रोमांच आले अर्धोन्मीलित डोळे वर्षताति आनंदजळें आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें बाहेरि कांपे पैं आघवाचि रोममुळीं आली स्वेदकणिका निर्मळी लेइला मोतियांची कडियाळीं आवडे तैसा ऐसा महासुखाचेनि अतिरसें जेथ आटणी होईल जीवदशे तेथें निरोविलें व्यासें तें नेदीच हों आणि कृष्णार्जुनांचे बोलणे घों करीत आले श्रवणें कीं देहस्मृतीचा तेणें वापसा केला तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी सर्वांगीचा स्वेदु परिमाजी तेवींच अवघान म्हणे हो जी धृतराष्टातें ॥आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु आणि संजय सात्विकाचा बिवडु म्हणोनि श्रोतयां होईल सुरवाडु प्रमेयपिकाचा अहो अळुमाळ अवधान देयावे येतुलेनि आनंदाचिये राशीवरी वैसावें बाप श्रवणेंद्रिया दैवें घातली माळ


रहाळकर

२३ नोव्हेंबर २०२५.     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?