Friday, November 21, 2025
मंकी आणि मॉंक !
मंकी आणि मॉंक !
नुकतेच दोन दिवसांपूर्वी दोन दिवस महाबळेश्वरला राहून आलो लेक नि जांवयासोबत. थंडीचा कडाका तर होताच तिथे पण महिन्द्र क्लब् च्या त्या सुरेख ‘शेरवुड’ रिसॉर्ट मुळे सर्व काही सुसह्यच नव्हे तर विलक्षण सुखावह नि ताजेतवाने करणारे ते अल्प-वास्तव्य ठरले.
या वेळच्या ट्रिप मध्ये प्रथमच पंचवीस तीस माकडांच्या झुंडी अक्षरश: धुमाकूळ घालताना पाहिल्या. एका ठराविक वेळी तेथील एक कर्मचारी त्या झुंडीला चक्क ब्रेडच्या शिळ्या लाद्या चारताना पाहून गम्मत वाटली. जवळजवळ सर्व वयोगटातील ती माकडे साहाजिकच सर्व प्रकारच्या माकडचेष्टा करण्यांत गुंतली असताना त्यांतील एक वयस्क जोडपे मात्र निवांतपणे तो सर्व धांगडधिंगा शांतपणे न्याहाळत होते आणि मला आम्हा दोघांची तशीच स्थिती अनुभवताना खरंच खूप मजा येत राहिली. त्या वृद्ध मंकी जोडप्याकडे पाहात असतांना मला अचानक मॉंक का आठवला नकळे ! मंकी-माईंड ॲंड द मॉंक ! किती विलक्षण विरोधाभास ! !
खूप वर्षांपूर्वी एक माकडकथा ऐकली होती की एका माणसाला अचानक जादूचा दिवा सापडतो नि त्यातला ब्रह्मसमंध हात जोडून सतत आज्ञेची मागणी करत राहतो. सगळ्या मागण्या क्षणार्धात पूर्ण करून पुढच्या आज्ञेची वाट पाहणारा तो समंध कधी त्या माणसाला गिळंकृत करेल याचा भरंवसा नसल्याने अखेर एका खांबावर निरंतर चढ-उतर करण्याची आज्ञा अखेर त्याला सुचते. ही गोष्ट सर्वांना माहीत असली तरी त्यातला मतितार्थ जरासा उलगडून पाहूं.
आपल्या प्रत्येकातील ‘मन’ हे विलक्षण चंचल, अस्थिर नि पाऱ्यासारखं असतं. पारियाचा रवा जसा गोळा करणे अवघड असते तसेच मनाचे उच्छ्रुंकलपण आवरणे कठीण असते हे आपण सर्वजण जाणतो. तथापि प्रत्येकाच्या अंतर्मनांत खोलवर एक साधू, सज्जन, संत किंवा मॉंक दडून बसला असतो याचा कधी विचार केलाय का कुणी ? मी केलाय ! आणि त्याला शोधून आपल्यासमोर बसवण्याची युक्ती देखील मला माहीत आहे, साधली आहे. आपल्या अंतर्मनातली खळबळ दूर सारण्यासाठी आधी बाहेरचा गोंगाट टाळणे गरजेचे वाटते मला आणि म्हणून शांत प्रशांत सागरकिनारा, घनदाट जंगल, खेड्यापाड्यातले निवान्तपण, गेलाबाजार एकादे शांत नितळ सरोवर किंवा जलाशय असे वातावरण सहज उपलब्ध करून देतात. ते शक्य नसले तरी गॅलरींत बसून निवान्तपणे असे काही मन:श्चक्षुपुढे आणता आले तर तो दडलेला मॉंक सहज पुढ्यात येऊन बसेल !
रहाळकर
२१ नोव्हेंबर २०२५.