Thursday, November 20, 2025
मॅटॅडोर वारी !
मॅटेडोर वारी !
तसे पाहिलं तर महाराष्ट्रात आल्यापासून अनेकवेळा मॅटॅडोरने सहली केल्या कारण तेव्हा कार नव्हती बुडाखाली. एक वारी मात्र अविस्मरणीय ठरली कारण सलग दोन रात्री नि एक दिवस सतत त्या नऊ सीटर मधून प्रवास घडला आणि इतकंच नव्हे तर रात्रभर ड्राईव्ह करायची देखील वेळ आली. मोठा रंजक आहे बरं का तोही किस्सा !
ॲक्च्युअली आम्हाला जायचे होते पुट्टपर्थीला वर्ल्ड कॉन्फरन्स अर्थात जागतिक परिषदेला हजेरी लावण्यासाठी. अनेक महिने आधीच सगळी रिझर्वेशन्स संपली असल्याने दोन मॅटॅडोर ठरवल्या आयत्या वेळी, मात्र दोन्हींची टायर्स अक्षरश: गुळगुळीत गोटे जणू नि स्टेपनी ठेवायची त्या मेकॅनिकची ऐपत नव्हती. तथापि देवाचे नाव घेऊन आम्ही पंधरा जणांनी रात्री साडेबाराला पुण्यातून कूच केले. इतक्या उशिरा निघण्याचे कारण त्या दोन्ही गाड्या कारखान्यात होत्या नि डागडुजी करून दोन ड्रायव्हर्स, जे आधल्या रात्रभर गाड्या हांकत आलेले. कधी नव्हे ते सोलापूर मार्गें कुणास ठाऊक का पण गाड्या वळल्या. अरे हो, मुरली जाजूच्या दोन बहिणींना बरोबर घ्यायचे होते म्हणून ! ते असो, सोलापूरला पहाटे सहाला पोहोचलो खरे पण त्या मारवाडी कुटुंबाने भोजन करूनच जायला गळ घातली. मस्त चमचमीत (भरपूर तेलकट ) पुरी-भाजी-रस्सा ओरपून निघायला चक्क चार वाजले हो ! मजल-दरमजल करीत विजापूर मार्गे होस्पेटला पोचलो रात्री आठला आणि एका गाडीचे रेडिएटर लीक करू लागले. ते रिपेअर व्हायला अकरा वाजले आणि दोन्ही ड्रायव्हर्सनी खूप झोप येत असल्याचे म्हणत चक्क आपल्या पथाऱ्या टाकल्या की राव बाकड्यांवर !
खरंतर सोबत अतिशय महत्वाच्या दोन व्यक्ती होत्या ज्या प्रथमच प्रशांतिनिलयम येथे लवकर पोंचण्यास उतावीळ होत्या - एक होते महाराष्ट्राने नावाजलेले रांगोळी कलाकार वसंतराव थिटे नि दुसरे स्वारगेट साईमंदिराचे प्रमुख अण्णासाहेब लोंबर ! वसंतरावांनी स्वामींची अतिशय सुरेख आणि हुबेहूब रांगोळी काढून स्वामींचे मनसोक्त कौतुक अनुभवले नंतर कॉन्फरन्स दरम्यान.
जराशी लिंक तुटली ना प्रवास वर्णनाची ? तर मी सांगत होतो की दोन्ही ड्रायव्हर्सनी गाडी चालवण्यात असमर्थ असल्याचे पाहून मी एका मॅटॅडोरचा ताबा घेतला नि वासू सुवर्णाने दुसऱ्या. त्या तसल्या गाड्या रात्रभर विनाथांबा चालवीत आम्ही पहाटे सहाला प्रशांति मंदिरांत ! नुकतेच नगर-संकीर्तन आटोपून येत असलेल्या महाराष्ट्रियन साईभक्तांनी एकच जल्लोश केला नि आम्ही कृतकृत्य ! !
रहाळकर
२० नोव्हेंबर २०२५