Saturday, November 08, 2025
तुलसी रामायण- भाग तीन
तुलसी रामायण - भाग तीन
“बिघि हरि हर कबि कोविद बानी ।
कहत साधु महिमा सकुचानी ॥
सो मो सन कहि जात न कैसे ।
साक बनिक मनि गुन गन जैसे ॥
(ब्रह्मा, विष्णु, शिवशंकर, कवी आणि विद्वान पंडितसुद्धा जिथे संतमहिमा वर्णन करताना थोकडे पडतात, तिथे माझ्यासारखा सामान्य माणूस संतांचे माहात्म्य कसे काय वर्णन करू शकेल ! असे पहा, भाजीपाला विकणारा कधी जड-जवाहरांबद्दल कसे सांगू शकेल बरे !
दोहा -
“ बंदऊं संत समान चित हित अनहहित नहि कोई ।
अंजलि गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ ॥३ (क )
(मी संतांना वंदन करतो कारण त्यांच्यापाशी ‘समता’ आहे, त्यांचा ना कोणी मित्र ना शत्रू, जसे हातांत घेतलेले फूल, जे लावणाऱ्या नि खुडणाऱ्या दोन्ही हातांना सारखाच सुगंध देते ! अगदी तसेच संतमंडळी शत्रू मित्रांचे सारखेच कल्याण चिंतीत असतात. )
“संत सरल चित जगत हित जानि सुभाउ सनेहु ।
बालबिनय सुनि करि कृपा राम चरन रति देहु ॥ ३ (ख)
(संत हे सहृदय असून कायम जगाचे हित पाहतात. त्यांचा हाच स्वभाव-विशेष आणि सगद्भाव पाहून मी त्यांचा आदर करतो. माझा हा बालिश विनय ओळखून कृपया मला श्रीरामांच्या चरणांचे प्रेम उत्पन्न करून द्या ! )
“बहुरि बंदि खल गन सति भाएं ।
जे बिनु काज दाहीनेहु बाएं (डावे-उजवे ! ! ) ॥
पर हित हानि लाभ जिन्ह केरें ।
उजरें हरष बिषाद बसैरें ॥१ ॥
(आता मी मनापासून दुष्टांनाही वंदन करतो जे त्यांचे हित करू पाहणाऱ्यांवर देखील विनाकारण प्रतिकूल आचरण करतात, ज्यांची भावना इतरांचे अहित व्हावे हीच असते आणि तेच लाभदायक वाटते, दुसऱ्याचे नुकसान पाहून त्यांना आनंद होतो आणि फायदा क्लेषकारक ! )
“हरि हर जसं राकेस राहु से ।
पर अकाज भट सहसबाहु से ।
जे पर दोष लखहिं सहसाखी ।
पर हित घृत जिन्ह के मन माखी ।।
(जिथे कुठे हरि आणि हर यांचे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे यशगान होत असते तिथे यांचा राहू काल सुरू होतो ; अर्थात ते प्रत्येक शुभकार्यांत सतत बाधा आणत राहतात. इतरांची वैगुण्ये आणि दोष दाखवताना त्यांना जणू हजार हात फुटतात ! ते इतरांच्या दोषांना हजार डोळ्यांनी पाहतात आणि तुपांत माशी पडावी तसे चांगल्याचे वाईट करून टाकतात. थोडक्यात, इतरांचे. छान चालले असताना त्यांत विघ्ने आणून अंततोगत्वा स्वत:ही नामशेष होतात ! )
“तेज कृसानु रोष महिषेसा ।
अघ अवगुन धन धनीसा ।
उदय केत सम हित सबाही के।
कुंभकरन सम सोवत नीके ।।”
( जे इतरांना यमदूतांप्रमाणे विलक्षण यातना देणाऱ्या क्रोधाग्नीत जाळूं पाहतात, जे अवगुणरूपी खजीन्याचे जणू कुबेर आहेत आणि ज्यांच्या वाढीमुळे सद्विचार, सद्वासना नि लोकहित पांगळे होतात अशा ‘केतु’ (पुच्छल तारा- Commet, South Lunar Node or Dragon) ग्रहाप्रमाणे अनिष्ट आणि जे कुंभकर्णाप्रमाणे कायम निद्रिस्त असणेच हितकारी ठरते !
“पर अकाजु लगि तनु परिहरहीं ।
जिमि हिम उपल कृषी दिलं गरहीं ।
बंदऊं खल जसं सेष सरोषा ।
सहस बदन बरनइ पर दोषा ।।”
( ज्याप्रमाणे गारांचा पाऊस शेतीचे वाटोळे करीत स्वत:ही विरघळून जातो अगदी तसेच दुष्ट मंडळी इतरांचे प्रचंड नुकसान करताना आपले शरीर देखील सोडायला मागेपुढे पाहात नाहीत. अशा दुष्टांनाही हजार मुखें असलेल्या शेषाप्रमाणे मानून नमन करतो कारण अशी मंडळी हजार मुखांनी इतरांचे दोष दाखवीत राहतात ) !
( अजून वंदन भक्तीच चालू आहे बरे का ! )
क्रमश:……..