Monday, November 03, 2025
गीताचे गाणें होताना……!
गीताचे गाणें होताना……..!
खरंच किती गम्मत आहे पहा, आपण एखादे गीत किंवा काव्य वाचतो त्यावेळी समाधान मिळते बुद्धीला. मात्र तेच जेव्हा गाण्याच्या रूपात कानावर येते तेव्हा मन, चित्त नि अहंकार देखील सुखावतो. खूप उदाहरणे देता येतील पण काही मोजकीच घेऊया.
अटलबिहारी वाजपायींचे ‘बावन्न कविताएं’ हे पुस्तक कितीतरी जणांनी वाचले असेल किंवा त्यांचेच मुखातून ऐकले असेल. मात्र तेच जेव्हा पद्मजा फेणाणी गाऊन दाखवते तेव्हा किती जास्त परिणाम करतात त्याच कविता ?
पाडगावकरांची एक कविता आहे, ‘कधी बहर कधी शिशिर, दोनही एक बहाणे / डोळ्यांमधले आंसूं पुसती ओठांवरले गाणे’ नि तेच बाबूजींच्या गळ्यातून ऐकताना ते आर्त स्वर किती बेचैन करतात नाही ?
तुलसीदासांनी रामायण रंगवून सांगितले असले तरी त्यांतील ‘दोहे’ चालीत ऐकत असताना अधिक परिणामकारक वाटतात किंवा संस्कृतमधली भगवद् गीता ज्ञानेश्वरीतील ओव्यांमुळे कितीतरी मधुर होते.
मला आठवतात मागील शतकातील कित्येक कवी, जे आपल्या कविता गेय स्वरूपात अर्थात गाऊन पेश करीत. प्रकर्षाने आठवले कवी अनिल, ज्यांनी कुमार गंधर्वांच्या बरेच आधी एका वेगळ्याच चालीवर म्हटलेले भावगीत - अजुनि रूसून आहे. नंतर कुमारजींनी हेच गाणे खूप भावोत्कट होऊन गायलेले आपण जाणतोच, विशेषत: तिसऱ्या कडव्यांत आलेला आर्त आलाप ! अशा काही ‘जागा’ हृदयाला हेलावून सोडतात. असो.
गजाननराव वाटवे यांचा आवाज खूप गोड वगैरे नव्हता पण त्यांनी गायिलेली कित्येक भावगीतें निव्वळ घराघरांतच पोहोचली नाहीत तर तत्कालीन स्त्रीवर्गाचे ते अतिशय लाडके गायक होऊन बसले. रामूभैय्या दाते हे उत्तम संगीताला उत्स्फूर्त दाद देत. त्यांनी तर आपल्या मोटारीचे नावच मुळी ‘अख्तरी’ ठेवले होते असे पुलंनी लिहिलंय् !
माझ्या गाडीने सांधे बदलले असल्याचे तुमच्या ध्यानी आले असणारच एव्हाना, सबब थांबतो !
रहाळकर
३ नोव्हेंबर २०२५.