Sunday, October 19, 2025
संस्कार आणि नव-विचार !
संस्कार आणि नव-विचार !
नातींबरोबरचा संवाद मला नेहमीच खूप काही शिकवून जात असतो दरवेळीं ! नुकतेच लंडन वारींत आशना कडून पुन्हा एकदा छान छान ऐकतां आले कारण यावेळेस ती अनेकदां लंडनला येत गेली तिचा बीझी स्केज्यूल असून देखील. सहसा असा वार्तालाप संध्याकाळच्या डायनिंग टेबलवर छान रंगतो. खरं म्हणजे ही मुलं एकदा बोलू लागली की आपण मधेच बोलूं नये कारण अशा वेळी आपल्या माहितींत किंवा खरंतर ज्ञानात मोलाची भर पडत असते. सर्वांत उत्तम म्हणजे आपणच एखादा विवादित मुद्दा मांडावा आणि मग निवान्तपणे नवनवीन विचार ऐकत राहावे जे आपल्याला कधीही सुचले देखील नसते ! असो.
या वेळी आशनाने विविध ‘कल्ट्स’ वर छान उहापोह केला. अर्थातच त्यांत ‘धर्म-कारण’ आलेच. तिच्या म्हणण्यानुसार धर्मशिक्षणाला तिचा आक्षेप नसला तरी त्या अनुषंगाने येणारे कर्मकांड तिला मान्य नाही, होय अगदी प्रत्येक धर्मातले !
मग सुरू झाले निरनिराळ्या धर्मांत माजलेल्या अनावश्यक रूढी आणि परंपरांवर नाराजी दाखवणे. आपला स्वत:चा आवाज न चढवताही अत्यंत प्रभावीपणे आपले परखड मत छान मांडतात हल्लीची मुलें. नाराजी सुद्धा कुणी दुखावणार नाही अशा अविर्भावांत !
मला खूप भावले ते तिचे ‘कल्ट’ वरील स्पष्ट विचार. नव्हे ती नास्तिक नाही, देवा-धर्मावर विश्वास आहे तिचा पण कशाचाही अतिरेक नसावा हे अघोरेखित करतानाच कोणत्याही प्रकारची उधळपट्टी तिला आवडत नाही. ती कंदूष नाही पण निव्वळ पैशाचीच नव्हे तर ‘वेळे’चे तिला भान आहे. स्वामींच्या उधळपट्टी म्हणजे हिंसा हा विचार ती अप्रत्यक्षपणे जगत असलेले आमच्या लक्षात आले आहे. अर्थात आईवडील किंवा मित्रमैत्रिणींसाठी खर्चाला मागेपुढे पाहात नाही ती. आणि बाप नि आत्त्यासारखेच ‘कर्तेपण’ कधीच मिरवत नाही ती ! जरासे विषयांतर होतंय् खरं म्हणून पुन्हा मूळ विषयावर येतो.
‘कल्ट’ विरोधातली तिची मतें स्पष्ट वाटली मला. जवळजवळ सर्व धर्मांत प्रचलित असलेले उपास-तापास, नवस-सायास, शरीराला कष्टविणारे विधिविघान तिला पसंत नाहीत. आपल्या धर्माचा अभिमान असावा पण अवडंबर नको आणि धर्मांतरांवर होणारी अवाजवी टीका तिला नकोशी असते. अर्थात इच्छेविरूद्ध होणारे धर्मांतरण मान्य नसले तरी स्वेच्छेने कुणी ते करत असेल, विशेषत: त्यातील मूल्यें पाहून, तर तें स्वीकार्य आहे तिला.
मंडळी, आशनाच्या संवादांतून असे काही मुद्दे मिळाले तर त्यांचे स्वागत नको का करायला ?
रहाळकर
१९ ऑक्टोबर २०२५।