Friday, October 17, 2025

 

इंदूर ते लाहौर मोटारीने !

 इन्दूर ते लाहौर मोटारीने


होय, एकोणीसशे छत्तीस सालीं आई-अण्णा आणि आजी-आजोबा मोटारीने इंदूर ते लाहौर असा सलग चार दिवसांचा मोटारीने प्रवास करून गेले होते हे माझ्या आईने आम्हाला वेळोवेळी त्या आठवणी सांगताना खूप छान कथन केलेले मला आजही स्पष्टपणे आठवते आहे


इंदौरला कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना आजोबांनी इंदोरची औद्योगिक नगरी म्हणून मुहूर्तमेढ केली होती. नंतर ते जयपूर आणि लाहौर येथे डायरेक्टर इंडस्ट्रीज या हुद्यांवर रूजूं झाले होते. लाहौरला जाण्यापूर्वी आई-अण्णांचा नुकताच विवाह झाला होता. त्या काळीहनिमूनवगैरे निराळे असे होत नसावे, मात्र ती लाहौर सहल या दोघांनी छानपैकी उपभोगली असेल यात शंका नाही

तेव्हा आजोबांची भलीमोठीस्टुडबेकरकार होती निळ्या रंगाची. मागच्या सीटवर आजीआजोबा आणि आईअण्णा सहज आरामांत बसू शकत. पुढच्या सीटवर ड्रायव्हर, चपरासी कम् प्यून, खेमा नांवाचा आचारी कम् देवराम असे. मागच्या मोठ्या डिक्कींत मोठ्या पितळी बादलींत अत्यावश्यक अशी सर्व भांडीकुंडी असत, शिध्याचे डबे नि पुरचुंड्या, होल्डऑल वगैरे सामान ठासून भरलेले. मुक्कामाला सरकारी डाकबंगले आणि हो, पेट्रोलने भरलेले पाचपाच गॅलनची पिपें देखील


त्या काळांत आज्जीचे उपासतापासही असत. भोजनासाठी कुठेच हॉटेलं वगैरे नसत. आजीआजोबांचे ठीक होते हो, ते भुकेवर सहज नियंत्रण मिळवीत पण आईअण्णांना साहाजिकच खूप भूक लागायची. मात्र आजीला याची जाणीव होती म्हणून ती गुपचुप आईजवळ भरपूर सुकामेवा सरकवून द्यायची असे आईने रूद्ध कंठाने सांगितलेले मला छानपैकी आठवतेंय्

इंदोर सोडल्यावर पहिला मुक्काम त्यांनी केला एकदम आग्र्याला. गुना-शिवपुरी-ग्वालियर-धौलपूर करीत ते आग्र्याला पोहोचले होते. त्या दिवशीं पौर्णिमा होती आणि पहांटेपासूनचा इतका लांब प्रवास करूनही त्या सर्वांनी पौर्णिमेच्या प्रकाशांत झळाळणारा ताजमहाल पाहिला होता

नंतर दिल्ली-चंडीगड करीत ते अमृतसरला पोहोचले. तिथल्या सुवर्णमंदिराचे वर्णन करताना तर आईला किती सांगू असे झाले होते. तिथून खैबर-बोलन खिंडी पार करून त्या पर्वतीय भागाचे वर्णन करताना तर भल्याभल्या साहित्यिकांना सहज मागे टाकता येईल अशा शब्दांत तिने सर्व प्रवासवर्णन केलेले देखील मला आणि ताई-सुधीलाही ते नक्कीच आठवत असेल. भास्कर तेव्हा खूपच लहान असावा नि रविंद्र दिवाकर तर अजूनव्हायचेहोते

लाहौरचेही वैभव वगैरे आई रंगवून सांगायची पण आम्हाला ते प्रवासवर्णन अधिक आवडत असे ! ! 

रहाळकर

१७ ऑक्टोबर २०२५     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?