Tuesday, October 14, 2025
काय दृष्टांतांची मात……!
काय दृष्टांतांची मात……!
खरोखर, काय म्हणावे माऊलींच्या विविध दृष्टांतांना, जे केवळ संख्येनेच प्रचंड नसून विलक्षण गूढार्थांनी ओतप्रोत आहेत. जमेल तेवढा परामर्ष घेऊया या लेखन-मालिकेतून क्रमश: !
मात्र त्या आधी दृष्टान्त म्हणजे तरी नक्की काय ते तर माहीत हवेच ना ! एखादी गोष्ट किंवा सिद्धान्त समजावून सांगण्यासाठी जे सविस्तर उदाहरण दिले जाते त्याला दृष्टान्त म्हणूया. दृष्टांतचा दुसरा अर्थ स्वप्नवत् दिव्य दर्शन असाही होऊ शकतो. इंग्रजीत याला Epiphany असे नाव आहे. (जेव्हा अनेक वाद्यें किंवा प्रसंग एकत्रितपणे येतात तेव्हा ती होते Symphany किंवा Orchestra ! ). असो.
मुळात दृष्टान्त देण्याची गरजच काय असा भाबडा प्रश्न मनात येण्याची शक्यता असली तरी विषय नीट समजावा म्हणून टीचर कशी निरनिराळी उदाहरणे देऊन किंवा प्रॅक्टिकल करवून घेत विद्यार्थी घडवतात, अगदी तसेच माऊली सामान्यजनांना देखील आत्मज्ञान व्हावे यासाठी विविध दाखले देत निरूपण करतात.
ज्ञानेश्वरीतल्या पहिल्याच ओंवीपासून या प्रबोघनाची सुरूवात होते पहा ! सर्वप्रथम ओंकारस्वरूप श्रीगुणेशाचे यथार्थ वर्णन करताना तो कसा अनादी आहे, केवळ वेद हेच ज्याचे प्रमाण आहेत असे सांगत असतानाच तो ओंकारस्वरूप तरी कसा तेही सांगतात पुढे. खरंतर पहिल्या वीस ओंव्यात केलेले श्रीगणेशाचे वर्णन इतके उपमा-अलंकारांनी विनटलेले आहे की ते आणि त्यांचा अर्थ अघिक जाणकार ज्येष्ठ व्यक्तीच सांगूं शकतील. श्रद्घेय मामासाहेब दांडेकर किंवा श्रद्धेय साखरे महाराज यांनी अप्रतिम अर्थ त्या वीस ओंव्यांचा दिलेला आहे, मात्र तोही समजून घेण्यासाठी खूप अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते. म्हणून मी आत्ता केवळ दृष्टांतांवर लक्ष केंद्रित करणार आहे, कृपया क्षमा करावी !
(क्रमश:)