Saturday, September 27, 2025
लीगसी - Legacy !
लीगसी - Legacy - एक सांस्कृतिक वारसा !
आज काही नातेवाईक मुद्दाम भेटायला घरी आले होते. त्यांतील एका सात वर्षाच्या मुलीने ‘लीगसी’ म्हणजे काय ते सांगाल काय अशी पृच्छा करून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आणि विचार करायला भाग पाडले. कुणी त्याचा डिक्श्नरी अर्थ सांगितला तर कुणी अन्य काही. कायद्यानुसार वहिवाटीने मिळणारी रकम किंवा प्रॉपर्टी असा जरी शब्दश: अर्थ असला तरी आपण सहज संभाषणांत या शब्दाला वहिवाटीने मिळालेले संस्कार किंवा सांस्कृतिक वारसा अशा स्वरूपात वापरत असतो.
तर मग हा ‘सांस्कृतिक वारसा’ म्हणजे नक्की काय असेल हो ? आपल्याला माहीत आहे की कित्येक प्रकारच्या कला, मग त्या सांगीतिक असोत, चित्र-शिल्प असो, साहित्यिक क्षेत्रातल्या किंवा चक्क न्याय-व्यवस्थेतल्या. बऱ्याच बाबतींत पिढ्यानपिढ्या चालत येणारा वारसा असतो तो. आणि प्रत्येक क्षेत्रात अशी नामवंत घराणी सहज सापडू शकतील.
मला आत्तां प्रकर्षाने याद येते आहे स्व. ताराशंकर बंद्योपाध्याय यांचे एक सुंदर पुस्तक - आरोग्य निकेतन’. त्यात त्यांनी किमान तीन पीढ्यांच्या ‘कविराजी’ वारश्याचा सुरेख मेळ घातलेला आढळेल. अशी अन्य कितीतरी उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहात नि ऐकत आलेले आहोत. तसा सांस्कृतिक वारसा किंवा लीगसी कदाचित जन्मजात असली तरी ती प्रत्यक्ष अनुभवाच्या बळावर अधिक तेजाने, अधिक जोमाने वृद्धिंगत होत असावी. अर्थात काही वेळां ती जमीनदोस्त होतानाही आपण पाहिली असेल.
मला कौतुक वाटलं त्या चिमुरडीचे जिने शाळेत कधीतरी ऐकलेल्या शब्दावर अधिक जाणून घेण्याची इच्छा बाळगली. शाब्बास शनाया !
रहाळकर
२७ सप्टेंबर २०२५.