Monday, September 08, 2025

 

दळण-वळणाची साघनं !

 दळण-वळणाची साधनं

अगदी शाळेत असताना हा शब्दप्रयोग ऐकला-वाचल्याचे आठवले पण शिंचा कुठला विषय शिकताना हे काही केल्या आठवेचना ! खूप खूप (असलेले) डोके खाजवून पाहिले. शेवटी उषाला विचारले नि आश्चर्य म्हणजे तिलाही आठवेना. (तिनेही आपले शुभ्र डोके खाजवून पाहिले) . मग तिनेच गूगल् बाबाला विचारले अन् भूगोल आणि अर्थशास्त्र हे उत्तर तिने मिळवले. मात्र एक भूगोल सोडला तर खरं म्हणजे अर्वाचीन इतिहास अधिक जवळचा वाटतो या शब्दासंगट


असं पहा, माणूस जेव्हा अश्मयुगात (स्टोन-एज्) विहार करत असेल तेव्हा त्याला निव्वळ अन्नाची निकड असेल. वस्त्र आणि निवारा जेव्हा तो झुंडीत राहायला लागला तेव्हाच नाही का ? मग त्या झुंडी पुन्हा अन्नाच्याच शोघात इकडून तिकडे फिरायला लागल्या असतील. साहाजिकच प्रत्येकाचे दोन दोन पाय हेच दळणवळणाचे मुख्य, नव्हे एकमेव  साधन असले पाहिजे तेव्हा. कालांतराने मुलेबाळे खांद्यावर वाहता गाढव, घोडा आणि कदाचित उंटांचा समावेश या साधनांत झाला असावा


ते असो, आमच्या भूगोलाच्या पुस्तकात तेव्हा फक्त जमीनीवरची, पाण्यावरची आणि हवेत उडूं शकणारी साधने सांगितली होती. आतां ? अबब, अवकाशातही मुक्त विहार करू लागलींत की मंडळी


बरं, हेदळण-वळणनुस्ते शरीरांच्या हालचालींपुरते किंवा प्रवासापुरते मर्यादित आहे का ? जरा खोलवर विचार करायला उद्युक्त होतोय् आज. कारण दळणवळणात मास् कम्युनिकेशनचाही अंतर्भाव करायलाच हवा ना ? (पहा बरं, जरा खोल पाण्यांत उत्तरत आहांत तुम्हीही ! ) 


दळणवलण आणि मास-कम्युनिकेशन ! काही शेंडाबुडखा दिसत नसला तरी ते दोन्ही कदाचित समानार्थी असू शकतील ना. खरंतर दोन्हीत देवाण-घेवाण अनूस्युत आहे, म्हणजे अर्थशास्त्र देखील सामावलेलं आहे का हितं ? पहा कसा सॉक्रेटीस झालाय् माझा ! बरं ते राहू देत. मूळ दळणवळणावरच थोडी आणखीन चाळवाचाळव करतो


मला वाटतं या दळणवळण प्रकर्णाचा केंद्रबिंदू किंवा स्टार्टिंग पॉइंटचक्राचाशोध असला पाहिजे. ‘चक्रम्हणजे चाक शोधून काढताच बैलगाडीची, सायकलींची, मोटारींची इतकेच नव्हे तर बोटी आणि विमानांची सुपरफास्ट घोडदौड सुरू झाली. (आपल्या इडापिंगला सुषुम्नेचाही मूलाधार हे चक्रच आहे बरे का, आणि एकच नव्हे तर अनेक चक्रें भेदावी लागतात आपल्यासारख्या योग्यांना ! ) ते असो


मघाशी मी मास् कम्युनिकेशन सारखा शब्दप्रयोग केलेला तुम्हाला अजूनही आठवतोय का ? टेलिग्राफची कट्ट कडकट्ट , टेलीफूनचा रिंगटोन, सेलफोनची गुरगुर, मेसेंजरची मंद किणकिण ही सर्व त्या महान मास् कम्युनिकेशनचा अविभाज्य भाग आहे. आपण क्षणार्धात कुणाही व्यक्तीला पाहू शकतो, अगदी पृथ्वीवरच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आणि अंतराळात विहार करणाऱ्या वीरांशी देखील, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करू शकतो, क्षणात उत्तर नि प्रतिक्रिया पाहू-ऐकू शकतो. निदानटेक्स्टतर निमिषार्धात करता येतोच ना. पहादळणवळणाचंहे किती प्रभावी आणि अतिजलद माध्यम किंवा साघन आहे हे


तथापि, मला पडलेलं एक कोडे आहे. कितीहीक्लेयरवायन्सचा टेंभा मिरवला तरी तुमच्या मनात आत्त्तां नक्की काय घोळतंय याचा थांगपत्ता लावायचं साधन अद्याप मला तरी उपलब्ध नाही, नाहीतरपुरे कर तुझी वटवटहे शब्द मी केव्हाच ऐकले असते ! ! 

रहाळकर

सप्टेंबर २०२५.       


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?