Saturday, September 06, 2025

 

नाटक नाटक !

 नाटक नाटक

आज सकाळी सकाळी एका प्रवचन करणाऱ्या व्सक्तीचे शब्द कानांवर पडले आणि ती संथ लय, जाणून बुजून व्यक्त होत असलेला शांत अविर्भाव, किंचित अतिरेकी वाटावी अशी विनम्रता आणि भगवंताचे नाव घेताना दाटून येत असलेला उमाळा ऐकून त्यावर जरासे चिंतन करावेसे वाटले. अर्थात अशा स्वरूपाची अनेक उद्बोधनें याआधी कानांवर पडली असली तरी आजच्या या प्रवचनाने त्या विशिष्टस्टाईलकिंवा लहैज्याने आतून एक वेगळाच विचार उफाळून आला नि तो असा की खरंच का हो असे प्रवचनकार आपले दैनंदिन जीवन तसे जगत असतील


सर्वप्रथम आठवले स्वामी माघवनाथ, ज्यांची प्रवचनें आम्हाल सलग पाच वर्षे दररोज ऐकतां आली. त्यांचे व्यक्तिगत जीवन देखील जवळून पाहण्याचा अनुभव आला तसेच त्यांचा अमाप लोकसंग्रह सुध्दा. त्यांचे विषयीं मनात तसूभरही किंतु-परंतु नाही. खरोखरच ऋषितुल्य दैनंदिन जीवन होते त्यांचे.

 जे कधीहीआस्तिकम्हणून ओळखले गेले नाहीत मात्र जीवन - वैयक्तिक नि पारलौकिक देखील- खरेखुरे आध्यात्मिक जीवन जगले ती होती एस् एम् जोशी, ना गोरे प्रभृति ऋषितुल्य मंडळी. त्यांनी कधीही पारमार्थिक प्रवचने वगैरे केली नसली तरी त्यांनी मानवी मूल्यांशी प्रतारणा केली नसावी असे माझे प्रांजळ मत आहे, आणि म्हणून त्या अर्थी ते निश्चितच आध्यात्मिक किंवा आस्तिक होते


प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेकानेक उद्बोधने ऐकायला मिळाली मला. केवळ शब्दप्रभूच नव्हे तर खोलवर दडून बसलेला त्यांच्यातील संत कधीच लपून राहिला नाही

आमच्या इंदूरचे प्रा. प्र गो घाटे तशाच पठडीतले. त्यांचेही  वैयक्तिक जीवन आदर्श असेच होते. म्हणजेचकथनी नि करनीयांत या मंडळींत कधीही गोंघळ झाल्याचे निदान माझ्या ऐकीवात नाही


मात्र याच्या अगदी उलट अशाही काही व्यक्ती नजरेपुढे येतात ज्यांच्या बोलण्यात नि वर्तनात काडीभरही एकवाक्यता दिसत नाही. अशांनाच तरभोंदूम्हणतात ना ! अर्थात तेनाटकनाटकापुरतेच मर्यादित राहते म्हणा ! ! 

या निमित्त मी नुकताच तुम्हाला सांगितलेला डॉक्टर श्रीराम लागूंचा किस्सा आठवतोय् तुम्हाला ? आस्तिकपणा आणि नास्तिकपणा हे दोन्ही नाटकाचे प्रकार असल्याचे त्यांचे विचार बोलून दाखवण्यात त्यांचे थोरपण नक्कीच अधोरेखित होते. इतका प्रांजळपणा खरेतर प्रत्येकाने जोपासला पाहिजे

या वरून स्वामींचे एक प्रवचन आठवले. ते म्हणाले होते की हे विश्व एक फिरता रंगमंच आहे आणि त्यावर वावरणारे तुम्ही सर्व नट नटी आहांत. सर्व नैपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत, संवाद, गीतें, इतकेच नव्हे तर हास्यविनोद नि दु:खाचे प्रसंग मी लिहिले आहेत. मी आहे तुमचा प्रोड्यूसर डायरेक्टर कोरिओग्राफर. मी आहे नटराजा ! या नटराजाला किती कष्ट पडतात तुमच्याकडून आपापला रोल आदा करून घ्यायला ते केवळ मीच जाणत असतो. तथापि तुम्ही तुमचे काम कुशलतेने, आनंदाने, समजून-उमजून करता तेव्हा मलाच आत्यंतिक समाधान मिळत असते हे ध्यानात ठेवा

यानाटक-नाटकच्या निमित्त किती मोठा संदेश मिळतोय आपल्याला. आपण प्रत्येकाने आपापला अभिनय पूर्णपणे अलिप्त राहून केला तर  शेवटल्या पटाक्षेपापर्यंतची वाटचाल सुकर होईल, सुखावह होईल यात शंका नाही

रहाळकर

सप्टेंबर २०२५.            


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?