Monday, September 22, 2025

 

वन् किमी वॉक् !

 वन् किमी वॉक…….!


आज सकाळी फेरफटका मारत असताना कोपऱ्यावरच्या घरात राहणाऱ्या एका वृद्धेची गाठ पडली. श्रीशने त्यांची ओळख करून देताना सांगितले की त्या रिटायर्ड जी. पी. म्हणजे एकेकाळी इथल्या एन् एच एस् अर्थात नॅशनल हेल्थ स्कीमच्या माजी डॉक्टर आहेत. साहाजिकच त्यांच्याशी पाच सात मिनिटे संवाद घडला. नुकतीच नव्वदी पार केलेली ती लेडी डॉक्टर विलक्षण शांत चित्त, सोज्वळ आणि बुद्धिमान जाणवली. मूळची वेल्श असलेली म्हणजे वेल्स या ब्रिटनच्या पश्चिम भागातील पण अवघे आयुष्य लंडनभरातल्या विविध हॉस्पिटल्स आणि ओपीडीत सेवा दिलेली होती. एक डॉक्टर असल्याचा सार्थ अभिमान आणि आनंद तिने बोलून दाखवला. दररोज चुकता ती सकाळ-संध्याकाळी एकएक किमी चालण्याचा परिपाठ पाळत आलेली आहे


तिच्या चेहऱ्यावरचा शांत प्रसन्न भाव खरोखर वाखाणण्यासारखा होताच पण डॉक्टर म्हणून केलेल्या सेवेने तिचे खूप समाधान झाल्याचे तिने आवर्जून सांगितले. मी जेव्हा तिला म्हटले की मी एकोणीसशे सहासष्ट साली एमबीबीएस झालो तेव्हा तिने मी एकोणसाठ साली झाले असे प्रत्युत्तर दिलेअर्थातच या जुजबी संभाषणांत तुम्हाला रस नसणार म्हणून या लेखाची मूळ संकल्पना आता सांगणार आहे, कृपया वाचत रहा

लेखाचा मायना पुन्हा एकदा पाहून घ्या, ‘वन् किमी वॉक्’ ! किती किती महत्वाचं आहे हे सूत्र. किमान एक किमी चालणे प्रत्येकाला आवश्यक आहेच पण सेवानिवृत्तांसाठी तर ते अधिकच. साठ-सत्तरीनंतर चालणे हा सर्वोत्कृष्ठ व्यायाम असल्याचे सर्वच सांगतात, मात्र त्यातील सातत्य अतिशय महत्वाचे आहे. चालता चालतां अनेक विचार मनात येत राहतात, कधी एखादे छानसे गाणे गुणगुणावेसे वाटते, कधी नुसते नामस्मरण आपसूक घडत राहते प्रत्येक पावलागणिक

हे सर्व करत किंवा घडत असताना एक बाब जाणीवपूर्वक करून पाहावी. समोरून येणाऱ्या व्यक्तीला निदान स्मितहास्य द्यावे, ओळखपाळख नसली तरी कसे आहात, केम छो म्हणावे, जय श्रीराम किंवा तत्सम शब्दाने अभिष्टचिंतन करावे. अगदीच तिऱ्हाईतासारखे वागणे टाळावे. अखेर माणसा-माणसातला साधा शिष्टाचार महत्वाचा नाही काय ? सतत फोनमधे पाहात राहणे बरे नव्हे. आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घ्यावा. मला स्वत:ला ओसाड रस्त्याने चालायला अजिबात आवडत नाही. पुरेशी वर्दळ तर हवीच पण गोंगाट सहसा नसावा असे वाटत राहते


त्या वृद्ध डॉक्टर आजींकडे पाहून मनस्वी आनंद झाला याचे आणिकही कारण आहे. त्यांचा शांत प्रसन्न चेहरा, अगत्यशील बोलणे, स्वकर्तृत्वाचा सार्थ अभिमान नि समाधान या सर्वच बाबी खूप भावल्या मला आणि निदान एवढे तरी तुमचेपर्यंत पोहोचवावेसे वाटले

कशी झाली गम्माडीगम्मत ?

रहाळकर

२३ सप्टेंबर २०२५.   


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?