Saturday, September 20, 2025
व्यष्टी आणि समष्टी !
व्यष्टी आणि समष्टी !
व्यष्टी म्हणजे एकेक, तर समष्टी म्हणजे अनेकानेक. आता हे दोन्ही शब्द का वापरले त्याची व्युत्पत्ती सांगू. व्युत्पत्ती म्हणजे उगम बरं का, शब्द कसा निर्माण झाला ते समजावणारे एक भाषाशास्त्र.
ते असो, आज जरा तात्विक विषयाला स्पर्ष करणार असल्याने किंचित कठीण शब्द शोधून काढले इतकेच. असे पहा की काल मी तुम्हाला एक व्हीडिओ क्लिप ऐकण्याची सूचना केली होती - पत्रकार पालकी शर्माची. ती जर ऐकली असेल तर तिने भारताच्या सद्य स्थितीचे वर्णन अतिशय सुंदर आणि चपखल शब्दात केलेले तुम्हालाही जाणवले असेल. आपल्या भाषणाच्या ओघांत तिने ‘पाच D’s’ ( पाच डी ) चा उल्लेख आणि त्यांवर थोडेसे विवेचन केले. ते पाच शब्द होते - डेमोग्राफी, डेमॉक्रसी, डायव्हर्सिटी, डिजिटल पॉवर आणि डायोस्पोरा. या पाचही शब्दांचा अर्थ सांगत बसण्याचा मूर्खपणा आजतरी करणार नाही, पण तुम्ही जर ती क्लिप पाहिली नसेल तर तिची लिंक लगोलग पेश करतो - शक्य होईल तेव्हा अवश्य पहा, ऐका अशी विनंती करतो.
https://youtu.be/68WHjCLEqNc?si=pF9EvQZwP8NNekR6
या पाच डी’ज बरोबर पाच आणखीही D आहेत, ज्यांचा ऊहापोह हातोहात करणे अगत्याचे वाटते मला.
असे पहा, “राष्ट्रधर्म” हा व्यष्टी आणि समष्टीवर समसमान अवलंबून असतो. समष्टी आणि व्यष्टी. समष्टी हा बाह्यरंग किंवा प्रत्यक्ष दिसणारे रूप तर व्यष्टी हे न दिसणारे पण अत्यंत महत्वाचे अंग. व्यष्टी म्हणजे एकेक व्यक्ती, जी समूहरूपात राष्ट्र म्हणून ओळखली जाते. अर्थात समष्टी मध्ये इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा, चालीरीती, व्यवहार, युद्ध नि शांती हे सर्व निहित असले तरी मुळांत राष्ट्र बनते ते त्यांत राहणाऱ्या व्यक्तींचे. अन्यथा ते ओसाड राहील निर्जीव, संवेदनहीन, पाषाणासारखे.
म्हणून व्यष्टी किंवा व्यक्ती अतिशय महत्वाच्या. बरे ही व्यक्ती कशी असावी ? परिपूर्ण, पूर्ण विकसित, संस्कारक्षम, बुद्धिमान आणि कार्यक्षम. अशी प्रजा घडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अनेक चळवळी सतत धडपडत राहिल्या आहेत. त्या व्यक्ती घडविण्याचे पुण्यकर्म करीत आलेल्या आहेत, करत राहणार आहेत. तिथेही किमान पाच D’s अत्यावश्यक ठरतात - ड्यूटी, डिसिप्लीन, डिटरमिनेशन, डेडिकेशन आणि डिव्होशन - सर्व चढत्या भांजणीतले एकापाठोपाठ येणारे. ( अर्थात डिटॅचमेंट, डेलिव्हरन्स वगैरे त्यांचेही नंतर ! )
तर आता कळले ना व्यष्टी आणि समष्टीतले अंतर ?
रहाळकर
२० सप्टेंबर २०२५.