Friday, August 01, 2025
Immortal !
“Immortal”……..!
खूप वर्षांपूर्वी वाचलेली ही कविता आज पुन्हा समोर आली आणि ज्ञानदेवांनी या विषयीं लिहिलेले निरूपण देखील लगोलग आठवले. आधी त्या कवितेच्या पंक्ती पाहू…….!
-
Do not stand at my grave and weep ;
I am not there . I do not sleep .
I am a thousand winds that blow .
I am the diamond glints on snow .
I am the sunlight on ripened grain .
I am the gentle autumn rain .
When you awaken in the morning's hush
I am the swift uplifting rush
Of quiet birds in circled flight .
I am the soft stars that shine at night .
Do not stand at my grave and cry ;
I am not there . I did not die .
एकोणीसशे चौतीस सालीं वरील कविता प्रसिद्ध झाली. मात्र हाच विषय कित्येक शतकांपूर्वी माऊलींनी कसा सांगितला पहा -
अज मी, अजर मी .......!
आत्मस्वरूपाचे वर्णन श्री ज्ञानदेव अतिशय सोप्या शब्दांतून घडवितात. वास्तविक आत्म-स्वरूप हा शब्दच अनेकांच्या बुद्धीपलिकडचा असावा. ‘Not My cup of tea’ असे म्हणून कित्येकजण या विषयाला बगल देतील; पण ज्ञानेश्वर महाराजांची किमया अनेक गूढ सिद्धांतांना सोपी करून सोडते. खरें तर, आत्मा परमात्मा ब्रम्ह परब्रम्ह वगैरे शब्द सर्वसामांन्यांना ऐकून माहीत असले तरी त्यांचा अर्थ समजून घेण्याइतपत बहुतांश लोकांना आवड नि सवडही नसते.
तथापि, प्रत्येक व्यक्तीला आपण नक्की काय आहोत हे जाणून घेण्याची केव्हाना केव्हांतरी उर्मी उफाळून येतेच ही वस्तुस्थिती आहे. त्यांतले काही थोडे लोक स्वत:चा ‘शोध’ घेण्याचा प्रयत्न करूं लागतात. त्यासाठी ते ग्रंथ चाळतील, संत-सत्पुरूषांची भेट घेतील, त्यांनी वास्तव्य केलेल्या स्थळांना भेट देतील, संत-सद्गुरूंना प्रश्न विचारून आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर होतील. काही अधिक प्रगत मंडळी ध्यानमार्गाचा अवलंब करून अंतर्यामीं बुडी मारतील आणि स्वता:ला स्वत:तच शोधण्यासाठी आटापिटा करतील.
मला वाटतं की अशा जिज्ञासूंना ध्यानात प्रगती साधण्यासाठी ज्ञानेश्वरीतील खालीं नमूद केलेल्या काही ओव्या मार्गदर्शक ठराव्या.
“अध्याय १८ - ओवी क्रमांक ११९३ पासून पुढे “
‘जाणे अज मी (अजन्मा-Birth less), अजरू (जरारहित, वार्धक्यरहित), अक्षय मी अक्षर (नाशरहित- Imperishable); अपूर्व मी (Unprecedented) अपार (Infinite), आनंद मी ( Blissful). अचळु मी (Steady) अच्युतु (Immovable); अनंतु मी ( Endless) अद्वैत (Non-dual); आद्य मी ( Original) अव्यक्त ( Unmanifest); व्यक्तही मी ( Manifest); ईश्य मी (नियम्य- All powerful) ईश्वर (Almighty God); अनादि मी ( Eternal) अमरू (Immortal), अभय मी ( Fearless) आधारू ( Basis, foundation); आधेय ( Support, prop); स्वामी मी सदोदितु ( Master forever), सहज मी सतत (Very Natural, spontaneous); सर्व मी (Omniscient) सर्वगत (All-pervasive, omnipresent); सर्वातीत (Transcendental) मी; नवा मी (Recent) पुराणु ( Ancient), शून्य मी (Void) सम्पूर्ण (Complete); स्थूल मी (Physical, inert) सूक्ष्म (Subtle), जे कांही तें मी !
अक्रिय मी येकू (Non-doer), असंगु (Detached) मी अशोक (Without grief), व्याप्य मी (Pervasive) व्यापक (Expansive) पुरूषोत्तम मी ( Best of Purusha).
अशब्दु मी ( Wordless) अश्रोत्र (Without hearing), अरूप मी (Formless) अगोत्र (Without lineage), सम मी (Equal) स्वतंत्र ( Independent) परब्रम्ह (Providence)!
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरूतें । आणि याही बोधा जाणतें । तेंही मींचि जाणें ।।
सरतेशेवटीं, आपण सर्व ईश्वराचाच अंश आहोत ही जाणीव होण्यासाठी नि ती दृढ होण्यासाठी लागणारी साधना म्हणजे नियमितपणे घडणारे ध्यान, अंतर्मुख करणारे-स्वत:चा शोध घ्यायला लावणारे नि तद्वारा प्रचंड शांतीचा अनुभव देणारे सर्वांना लाभों अशी मन:पूर्वक प्रार्थना !!
रहाळकर
१ ऑगस्ट २०२५.