Friday, August 08, 2025
नाकेली !
नाकेली !
शीर्षकावरून तुम्ही नक्कीच ताडले असणार की ‘नाक’ या अतिशय प्रतिष्ठित अवयवावर बोलणार आहे आज ! मात्र त्या सुप्रतिष्ठित अंगाबद्दल मी काहीही व्यंग करणार नाही याची खात्री असू द्यावी. त्याचे कारण सरळ सोपे आहे. आम्हा जवळजवळ सर्व रहाळकरांचा ‘नाक’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे कारण तो रहाळकरी नाक या सदरांत विशेष ठशठशीत मानला जातो !
माझा कॉलेजमधला आर के जैन बराच वेळ माझ्याकडे पाहात म्हणाला होता की ‘अबे तेरी नाक तो बिलकुल समोसे जैसी है’ ! यावरून आम्हा बहुतेक रहाळकरांच्या नाकाची ठेवण तुमचे लक्षात आली असेलच एव्हाना. आणि म्हणूनच आम्ही बहुतेकांनी ‘नाकेल्या’ म्हणता येतील अशा सहधर्मचारिणी निवडल्या होत्या. तथापि आमच्या सर्व पिलावळी आमच्याच नाकांचे प्रोटोटाईप घेत जन्मल्या ! असो.
माझा एक गोड गैरसमज आहे की विशाल नाक असलेली मंडळी जरा अधिक (जास्तच ! ) बुद्धिमान असतात आणि हे मी सप्रमाण सिद्ध करू शकतो. फ्रान्सचा तत्कालीन प्रेसिडेंट चार्ल्स् डि गॉल पाहिलाय तुम्ही, निदान त्याचे व्यंगचित्र ? ते असू देत, इंदिरा गांधींचे नाक तरी आठवतेय तुम्हाला ? बरे तेंही असो, निदान मला तर नक्कीच पाहिलंय् की नाही ? माझ्या बुद्धिमत्तेबद्दल काही शंका आहे का काही ?
फार काय सांगूं, ज्यांना मी गुरूतुल्य मानले ते अकोल्याचे डॉक्टर भागवत, नव्वदी पार केलेले पोहनेरकर काका आणि प्रत्यक्ष सद्गुरू आगाशे काका हे अतिशय विशाल नाकाचे धनी होऊन राहिलेत. आणि कदाचित म्हणूनच नाकावर काहीही अर्बटचर्बट बोलायचे नाही असे ठरवले आहे आज !
तरी पण, कधीकधी एखादा वेडपट विचार शिवून जातो की समजा माणसाला नाकच नसते तर ? डोळे नि ओठांच्या मधे काहीच नाही, सर्व सफाचट ! छे, विचारच करता येत नाही पुढे. बरं हे नाक कशासाठी ठेवलंय निसर्गाने, छान दिसायलाच की परिमळ तुरंबायला ? तुरंबायला म्हणजे हुंगायला बरं का. ज्ञानेश्वरीमुळे कित्येक नवनवीन शब्दांची बेगमी झाली खरी. आणि परिमळ म्हणजे सुगंध हेही जाताजातां लक्षात ठेवलेले बरे !
या नाकाला अधिकच उठावदार करायला किंवा कधीकधी झाकून ठेवायला सुद्धा ‘नथ’ किंवा सुंकल्या घालायची पद्धत रूढ झाली. दाक्षिणात्या स्त्रिया तर दोन्ही नाकपुड्यांत मोठाल्या ‘चमक्या’ मिरवतात. या सर्व श्रुंगाराचा हेतू एवढाच की पुरूषांनी आपला तोरा मिरवूं नये, तो हक्क किंवा बहुमान स्त्रियांपुरता मर्यादित असू द्यावा. (तोरा मिरवण्याचा !)
एकच लहानशी शंका, एखाद्या लंपट पुरूषाचा उल्लेख करतांना उजव्या नाकपुडीवर अंगुलीनिर्देश का केला जातो ?
रहाळकर
८ ऑगस्ट २०२५.