Thursday, August 28, 2025
साडू साडू !
साडू साडू !
कधी कधी एखादा शब्द पिच्छा सोडायला तयार नसतो. आता आजचेच पहा ना, फोनवर बायकोच्या बहिणीच्या प्रकृतीची चौकशी करता करतां मी चक्क तिच्या नवऱ्याची नक्कल करीत त्यांच्या विशिष्ठ लकबींत संभाषण चालू केले आणि तिची हसूनहसून मुरकुंडी वळली ! ती आपल्या तब्येतीची गाऱ्हाणी चक्क विसरून गेली तात्पुरती. मला वाटतं आपण कुणाच्या प्रकृती विषयीं बोलत असताना असे काही करून पाहावे ज्या योगें आपली गाऱ्हाणी उगाळत न बसतां ती व्यक्ती तात्पुरती का असेना, आपले दुखदर्द जरासे बाजूला ठेवू शकेल.
आज त्या साडूंची नक्कल करताना ‘साडू’ या शब्दावर मात्र गुंतून गेलो. मराठीत बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याला आपला साडू किंवा साठभाई असे काहीतरी म्हणतात हे पुण्यात आल्यावर नवीन मराठी शब्द शिकताना कळले. आमच्या इंदुरी हिंदींत याला जीजाजी म्हणतात हे जाताजाता सांगून जातो. वास्तविक जीजाजी हा शब्द अनेक नात्यांना लावला जातो हिंदीत पण ‘साडू’ नक्कीच नाते-स्पेसिफिक असावा. असो.
तर साडू ! संयोगवश बायकोला बऱ्याच बहिणी (त्यांत एकच सख्खी) असल्याने मला बऱ्याच साडूंशी हातमिळवणी करावी लागली. त्यांत काही अतिशय बुद्धिमान, तस्लख तर काही विरळा कुणीही टपलीत मारून जावे असे. त्या दुसऱ्या कॅटेगरीतला मीही एक हे तुम्ही केव्हाच ओळखले असेल म्हणा ! (अखेर मी सुद्धा अनेकांचा साडू आहेच की! )
माझे काही साडू मात्र विलक्षण प्रतिभावंत आहेत हे नि:संशय आणि म्हणून आपणही त्यांच्यासारखे असायला हवे होते अशी खंत वाटते कधीतरी, पण इतर साडूंना माझ्याविषयी असेच वाटत असेल हा विचारही सुखावून जातो म्हणा !
माझे धाकले साडू विलक्षण हजरजबाबी, तल्लख, अतिशय विनोदप्रिय, बहुश्रुत, दांडगा वाचन-छंद असलेले आणि मनमोकळ्या स्वभावाचे असल्याने त्यांचा सहवास अतिशय हवाहवासा वाटतो. कधीकधी वाटते त्यांचे बिऱ्हाड आपल्या शेजारी असते तर ? पण मग हेही लक्षात येते की अति-परिचयात अवज्ञा होऊ नये म्हणून जरा अंतर ठेवणे तेवढेच महत्वाचे असेल. शेवटी प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गुणधर्म वेगवेगळे असतात. (खायचे दात नि दाखवायचे वेगळे असतात तसे ! )
तथापि एक नातें मात्र अन-कॉम्प्रोमायझींग असते, पतिपत्नीचे ! एकदा गाठ पडते ती कायमची ! !
रहाळकर
२८ ऑगस्ट २०२५