Saturday, August 23, 2025
एक विडंबन !
एक विडंबन !
आज तेवीस ऑगस्ट, माझ्या पहिल्यावहिल्या नि अखेरच्या एकतर्फी प्रेम-प्रकरणाचा साठावा स्मृतिदिन ! होय, याच दिवशी ती म्हणाली होती ‘तुमचा काहीतरी गैरसमज होतोय’ ! खरंतर त्या दिवशी सकाळीच मी एक कविता लिहून तिला वाचून दाखवणार होतो, मात्र अचानक GPL लागल्यामुळे केवळ एकच शब्द बदलून त्याच कवितेचे बारा वाजवले होते मी ! आज तेवीस ऑगस्ट रोजीं ते विडंबन पुन्हा आठवले, खूप हसून घेतले मनातल्या मनात आणि वाटले तुम्हालाबी त्या गुपितांत सहभागी करून घ्यावे ! आधी मूळ कविता वाचतो नि नंतर तिचे विडंबन एका शब्दाने केलेले. पहा तुम्हाला तो शब्द सहज सापडतोय् का !
“तुझ्या नि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या त्या ठिकाणी भिरभिरतोय् कधीपासून काजव्यांचा मिणमिणता थवा ; मला वेड्याला मात्र उगीचच वाटतं की ती तूच आली आहेस, चांदण्यांची वाट होऊन माझी पुन्हा वाट पाहण्यासाठी !”
आणि त्याच रात्री लिहिलं ते असे -
“तुझ्या नि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या त्या ठिकाणी भिरभिरतोय् कधीपासून काजव्यांचा मिणमिणता थवा ; मला वेड्याला मात्र उगीचच वाटतं की ती तूच आली आहेस, चांदण्यांची वाट होऊन माझी पुन्हा वाट लावण्यासाठी! ! !
(GPL म्हणजे कुल्ल्यावर लाथ बरं का ! ! )
गणपतिबाप्पा मोरया.
रहाळकर
२३ ऑगस्ट २०२५