Saturday, August 02, 2025

 

ज्ञानेश्वरी इन्दौरी मराठीतून !

 ज्ञानेश्वरी इन्दौरी मराठीतून


आज एकतीस जुलाय, इंग्रजींत भाषांतर केलेल्या खटाटोपीचा चौदावा वर्धापन दिवस. सकाळपासूनच जरा बेचैन होतो की आता नवीन काही करायला सुचेल, किंवा जमेल काय. मग अचानक एक भन्नाट कल्पना शिवून गेली आणि वाटलं की मायमराठीपेक्षां तीच ज्ञानेश्वरी इन्दौरी लहेज्यांत संक्षिप्त किंवा सारांश रूपात मांडून पाहावी का ! कादंबरी स्वरूपात की व्याख्यान स्वरूपात ? पता नहीं. मात्र याच अनुषंगाने आठवला आम्हाला क्रमिक म्हणून नेमलेला विलियम बॉईड लिखित पॅथॉलॉजी किंवा विकृतिविज्ञानाचा भला मोठा ग्रंथ ! पॅथॉलॉजीसारख्या किचकट नि किळसवाण्या विषयाला बॉईडने इतक्या सुंदर पद्धतीने मांडले होते की ते एकमेव पुस्तक मी कादंबरी वाचावी एवढ्या तन्मयतेने किमान पंधरावीस वेळा वाचून काढले होते. आत्तां हातीं असलेल्या ज्ञानेश्वरीची देखील कित्येक पानें वेळोवेळी धुंडाळत आलोय मी एव्हाना. अर्थात विकृतिविज्ञानासारख्या किचकटपणाचा ज्ञानेश्वरीत मागमूसही नसून तींत ज्ञान-विज्ञानच नव्हे तर 'अंतिम सत्य' उलगडून सांगणारे  महाज्ञान ठासून भरलेले लक्षात येईल.  


मला माहीत आहे की इंग्रजीतल्या ज्ञानेश्वरीचे काठांवर उभे राहून अनेकांनी कौतुक केले असले तरी अम्मळ पाय सोडून त्या आंग्ल-गंगेंत फारसे कोणी उतरले नसणार ! आणि म्हणून आज वाटलं की तेच गंगास्नान तुम्हाला इन्दौरी मराठीत परौसतां येईल का ते पहावे. हा प्रयोग फसलाच तर कृपया क्षमा करावी या उच्छृंकल म्हाताऱ्याला ! मात्र त्यांतील भाव ओळखूनअवधान एकलें दीजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हें प्रतिज्ञोत्तर माझे, उघड ऐका’ ! 


ज्ञानेश्वरी सारांश’————!

जवळपास आठशे वर्षांपूर्वी संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी कलियुगात होरपळून निघत असलेल्या पब्लिकसाठी एका बहारदार  ग्रंथाची पायाभरणी केली, जी श्रोतृसंवाद म्हणून मानली जाते. वास्तवमधे संस्कृत भाषेत सांगितलेल्या भगवद्गीतेवरची ती कमेंटरी आहे असे म्हटले तरी त्याहूनही पलीकडचे गूढ-गहन ज्ञान महाराजांनी त्या वेळच्या सोहप्या प्राकृत मऱ्हाटीतून सांगितले. होय, सांगितले, कारण नेवाश्याच्या मंदिरात खांबाला टेकून महाराज जसे बोलत गेले तसे ते पटापट सच्चिदानंद बाबांनी लिहून ठेवले. त्या ग्रंथाची खूपशा पब्लिकने पारायणे केली म्हणतात आणि कालांतराने पाठभेदामुळे त्यांत काही त्रुटी घुसून गेल्या. त्यांचे शुद्धिकरण करायला संतश्रेष्ठ एकनाथ महाराज पुढे सरसावले आणि बाराशे बहात्तर साली लिहिला गेलेला हा ग्रंथ शुध्द स्वरूपात पंधराशे सहा सालीं पैठण येथून प्रसिद्ध झाला. तोच वाचत असतो बरं का आपण सर्व अधूनमधून


काय बोलले हो ज्ञानेश्वर माहाराज इतके गूढ अन् गहन असे ! मुळीच नाही. त्या गहन गूढ ज्ञानाला त्यांनी जनरल पब्लिक, मग ते महाजन, मागासलेले, शूद्र, स्त्रिया - होय स्त्रियांना देखील वेद आणि उपनिषद ऐकण्या-वाचण्याला मज्जाव होता त्या काळी - या सर्वांना उच्च वर्ण पब्लिकबरोबरच मोकळे करून दिले होते

त्या अठरा अध्यायवाल्या संस्कृत गीतेला महाराजांनी नऊ हजार मऱ्हाटी ओंव्यातून झकासपैकी रंगवून रंगवून सांगितले. इतके बहारदार की त्यांत सगळ्या नऊ, नव्हे अकरा, रसांचा भरपूर वापर तुम्हाला सहज जाणवेल


अतिशय मनोहारी असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खरोखर भरपूर तन्मयतेने, उत्कटतेने, काळजीपूर्वक वाचण्यासाठी, परिशीलनासाठी आहे. हा ग्रंथ कितीही पवित्र, पूजनीय असला तरी त्याची जागा देवघरात किंवा फडताळांत जपून ठेवण्याची नसून तो नित्य वाचनात राहावा म्हणून आपल्या अभ्यासाच्या टेबलावर, दिवाणखान्यातील सेन्ट्रल स्टूलवर, इतकेच नव्हे तर हापिसातल्या टेबलवर देखील सहज हातात घेता येईल अशा ठिकाणी असावा. कारण आपले जीवन यथार्थपणे कसे जगावे याचा त्यांतील कानमंत्र हवा तेव्हा हाताशी असेल

खरंतर आजच्या तरूणाईला जी मानवी मूल्यें जपण्याची नितांत गरज आहे, तिला हा ग्रंथ निश्चितपणे उपयुक्त ठरावा


मला ठाऊक आहे की या प्रस्तावाला चक्क केराची टोपली दाखवली जाऊ शकते. पण किमान या ग्रंथाच्या संक्षिप्त, सारांश, ॲब्रिज्ड स्वरूपाला जवळ बाळगायला काय हरकत आहे ? माझी खात्री आहे की ते संक्षिप्त स्वरूप काहींना मूळ टेक्स्ट वाचायला भाग पाडील. ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य असे की यांत आध्यात्मिक गूढपण, तत्वज्ञान आणि काव्यात्मक प्रतिभेचा मनोहारी मिलाफ झालेला आढळून येईल


हल्लीच्याशिक्षितपीढीला ईश्वर विषयक संकल्पना, संत सत्पुरांचे आचरण, सनातन धर्माविषयीं अनास्था किंवा विपरीत ज्ञान आणि मूळ मानवी मूल्यांची जोपासना या सर्वांबद्दल प्रबोधन करणे गरजेचे होत चालले आहे. दासबोध-ज्ञानेश्वरीसारखे सद-ग्रंथ आजही खूप फायदा करू शकतात असा भरंवसा आहे


आज के लिये इतनाही बस्

रहाळकर

३१ जुलाय २०२५.    


ज्ञानेश्वरी इन्दौरी मराठीतून आणत असताना त्याच ज्ञानगंगेतली ही पहिली डुबकी


ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पुस्तकाची सुरूवात करतांना सर्वात आधी प्रथेप्रमाणे मंगलाचरण सांगितले. मंगलाचरण म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाची सुर्वात करताना केलेले ईश्वर-स्तवन

मला प्रश्न पडतो कधीतरी की लोगबाग आधी पुस्तकेच का बरे लिहितात. जे काही मस्तकात असते ते विसरू नये म्हणून कदाचित मस्तकातले पुस्तकात ओतून ठेवतात. मात्र खूप वेळा असे वाटते की जे काही ग्यान पुस्तकातून लिहून ठेवले असेल ते पुस्तकातच छपून राहात नसेल ना, आणि म्हणून ते लोकांनी पण वाचावे म्हणून त्याला जरा हलकेफुलके, सहज समजेल असे सांगितले तर ! महाराजांनी खरं तर तेच केलं, कठीण संस्कृतला त्यांनी तेव्हाच्या सोप्या मराठीतून सांगितलं. आता मी त्यांनाच विचारत विचारत आपल्या इन्दौरी लहेज्यात सांगायची कोशिश करणार आहे

खरंतर गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव आहेअर्जुन विषाद योग’. म्हणजे अर्जुनाच्या मनात झालेला गडबडगुंडा ! कुरूक्षेत्रावर म्हणजे लढाईच्या मैदानवर कौरव-पांडवांची लढाई सुरू होण्याआधी आमच्या अर्जुनाला वाटलं की त्याला कुणाकुणाशी झुंजायचं आहे ते तरी अगोदर पाहून घेऊ. म्हणून तो आपला रथ-सारथी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला सांगतो की जरा मला दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चला. भगवान तसे करतात तेव्हा अर्जुनाला आपले सगेसोयरे, काकेमामे, मित्रमंडळी, इतकेच नाही तर गुरूतुल्य आणि प्रत्यक्ष गुरू देखील समोरच्या कॅम्पमधे दिसून येतात. आता आपल्याला या लोकांना कसे काय मारायचे म्हणून त्याच्या  मनात कालवाकालव सुरू होते, तो गडबडून जातो आणि हताश होऊन जातो. या सर्वांचे वर्णन पहिल्या अर्जुन-विषाद-योगांत येते. ग्यानेश्वर मैय्या त्या सगळ्याचे विस्तारपूर्वक वर्णन करतात.


मात्र या सगळ्यांच्या आधी ज्ञानेश्वर महाराज आपल्या पोथीचे जे प्रास्ताविक करतात ते खरंच खूप अचंभित करणारे आहे. आधी प्रथेप्रमाणे ते श्री गजाननाची स्तुती करतात त्याचे अतिसुंदर वर्णन करून

ते म्हणतात की पहिल्यांदा मी त्या आद्य, ओंकाररूपी श्रीगणेशाला वंदन करतो. हा गणपती खरोखर अखिल ब्रह्मांडाचे मूळ आहे, तो अनादि अनंत आहे ज्याचे वर्णन करायला वेद पुढे सरसावतात आणि त्याला ओंकारस्वरूप असे म्हणतात. पण खरं सांगू का, ते वेद देखील या बाबतीत लुळे पडतात आणि त्या परब्रह्मस्वरूपालाहे नव्हे, हे नव्हे’ (नेति नेति) म्हणत पळ काढतात ! हा श्रीगजानन कसा आहे म्हणावे तर तो स्व-संवेद्य आहे, स्वत: स्वत:लाजाणणारासर्वव्यापी आत्मस्वरूप ! मूळ ओंवी म्हणते - ‘ओम् नमो जी आद्या / वेदप्रतिपाद्या / जय जय स्वसंवेद्या / आत्मरूपा //‘ 


पुढे म्हणतात की हे गणराया, तूं सर्वजणांच्या बुद्धीला प्रकाशमान करतोस, उजळून काढतोस, म्हणजेच ज्ञानवान करतोस. अशा रीतीने निवृत्तिनाथांचे शिष्य म्हणतात की रसिक श्रोतेहो, कृपया लक्षपूर्वक हे निरूपण ऐकावे

श्रीगणेशाच्या अंगोपांगांचे सुरेख उदाहरणे देत ते वर्णन करतात, प्रत्येक अंगाच्या विशिष्ट अर्थासह. ते म्हणतात की श्रीगणेश म्हणजे शब्दब्रह्म अर्थात वेदांचे मूर्त स्वरूप होय. अतिशय तेज:पुंज, लावण्यमय, सोज्वळ स्वरूपात सर्व अठरा पुराणे तुझ्या मनोहारी अंगांवर दागिन्यांप्रमाणे खुलून दिसतात. सर्व सहा शास्त्रें किंवा दर्शनें तुझ्यातच सामावलेली आहेत तसेच सगळी उपनिषदें देखील

श्रीगणेशाच्या विविध अवयवांचे यथार्थ वर्णन एकवीस ओंव्यात केल्यानंतर श्रीज्ञानदेव केवळ एका ओंवीत पण संपूर्णत्वें देवी सरस्वती शारदेचे वर्णन करतात - ‘आतां अभिनव वाग्विलासिनी / जे चातुर्यार्थ कलाकामिनी / ते श्रीशारदा विश्वमोहिनी / नमिली मियां / ……….पुढील भागात चालू राहील पुढचे आख्यान

ररहाळकर

ऑगस्ट २०२५.     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?