Tuesday, July 08, 2025

 

तीन कविता !

 एकूण तीन कविता


आम्ही साधारण तीन आठवड्यापूर्वीं इथे लंडनमध्ये पुन्हा एकदा डेरेदाखल जाहलों. चि. श्रीश आणि सौ. अलका मुद्दाम आम्हाला आणण्यासाठी पुण्यांत आले होते कारण यावेळी माझ्या मनाची फारशी इच्छा नव्हती आमच्याच म्हातारपणच्या तक्रारी पाहतां. मात्र त्या उभयतांनी धाडस दिले आणि अक्षरश: फुलासारखे हळुवारपणे इथे घेऊन आले. इथे पोहोचतांच दुसरेच दिवसापासून आमचे बस्तान व्यवस्थित बसले, पुण्यांत असलेली मरगळ हां हां म्हणता विरून गेली. पुन्हा नव्या जोमाने दिवसाला सामोरे जाऊं लागलो, दररोजचे फिरणे नियमित सुरू झाले आणि माझी लेखणी (आयपॅड) पुन्हा कार्यरत झाली, नि दररोज नवनवीन खाद्य मागूं लागली ! रोजरोज नवीन काय बोलणार या संभ्रमात असताना ड्रॉवरमधे या तीन कविता आढळल्या कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेल्या. सबब आजशिळ्या कढीला ऊतम्हणत ही प्लेट तुम्हा सुहृदांसाठी


आधी उषाने सहजगत्या लिहिलेल्या या पंक्ती….!

गुढी

गुढी उंच उभारूं

मांगल्याची

तोरण बांधूं

पावित्र्याचे

सज्ज होऊं सारे आपण

स्वागत करण्या नववर्षाचे

सोडून देऊं हेवेदावे

करूं उधळण प्रेमाची

स्वार्थाला नच देऊ थारा

कुणीच अपुल्या मनीं ! ! 

उषा रहाळकर

एप्रिल २००७

लंडन


आतां माझ्या आई विषयीं

आई

नमितों तुज शतशतदां आई

प्रेमस्वरूप तूं करणासिंधू

चारित्र्याची मूर्तिमंत खाण तूं


भावुक म्हणुनी जगत् सुखास्तव

तळमळली धडपडलीस तूं 

सांवरलेस तूं कितीजणांना

आवरलेस तूं

अन् कितिक जणांचा आधार तूच तूं


शांतिरूप अन् निगर्वताही

हरहुन्नरी जननी आई

मांगल्याची मूसच जणू तूं होसी

नमितों तुज शतशतदां , आई ! !

प्रभु रहाळकर

जुलाय २०१०


आतां शेवटली बरं का आजच्यासाठी

कवी

होय, मी पण आहे एक कवी

अगदीकवीम् कवीनाम्नसलों तरीही…….! 

(एव्हांना ओळखलेच असेल म्हणा तुम्ही ! )

कारण

मी भावविश्वांत रमतो,

मला आकळतात भाव-भावना

थव्यांतली माणसें नि माणसातले थवे

ओळखता येतात मला.

त्या थव्यांतील माणुसपणाशी 

नातें जुळते माझे, गट्टीही होते

म्हणून मी कवी !


कुणी मला एककल्ली निगरगट्ट म्हटलं तरी

संवेदनशील आहे बरं का माझं मन,

तरल, भिरभिरणारं, बागडणारं

पण तरीही काळजाचा ठाव घेणारं

एकदां बसलंच तर तिथून 

अज्जिबात हलणारं !


निसर्ग मला खुणावतो,

जवळ ये म्हणतो,

मीही हरखतो हरवतो गुंगून जातो

मनाच्या कॅनव्हासवर

त्याला शिगोशीग उतरून घेतो…….! 


पक्ष्यांच्या किलबिली बरोबरच

चर्चचा घंटानाद मला भुरळ घालतो

शांतीची प्रशांतीची अनुभूती देतो……! 

मी रमतो, सुखावतो

म्हणून मी कवी ! ! 


विंदा करंदीकर म्हणाले,

ज्याला कविता कळते तो कवी

कविता तर माझ्यात खोलवर दडी मारून बसते


खरंतर म्हणूनच मी कवी ! ! ! 

रहाळकर

/ / २००७

लंडन.      



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?