Monday, July 07, 2025
मनोरथा चल त्या नगरीला…..!
मनोरथा चल त्या नगरीला………!
‘मनोरथा चल त्या नगरीला
भूलोकींच्या अमरावतीला’ हे गदिमांनी रचलेलं, बाबूजींनी संगीतसाज चढवलेलं आणि लताजी, मालती पांडे इत्यादिकींनी मधुर स्वरात गायिलेलं गीत आज पुन्हा ऐकावं असं वाटलं, त्याचे शब्द सांठवून घ्यावेसे वाटले म्हणून गूगल् बाबाला विनंती केली आणि त्याने ती तात्काळ मान्यही केली.
गीताचा संदर्भ अयोध्या नगरी आणि प्रभू रामचंद्रांचा असला तरी या प्रभूने तो धागा पकडून मनोमन असंख्य नगरींचा फेरफटका मारून घेतला ! खरं तर या प्रभूला प्रत्येक नगरीचे अप्रूप नि आकर्षण वाटत राहिले आहे. आता अजून या वयातही त्याला विविध नगरें मनसोक्त पाहावीशी वाटतात, प्रत्येकीतली खासियत तो शोधून काढतो, तिथली बोलीभाषा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, जमलं तर संवाद साधतो आणि तिथल्या दुनियेंत अल्पकाळ का होईना गुंतून जातो, अर्थात पुढची नगरी पादाक्रान्त होईपर्यंत !
हे खूळ त्याच्या डोक्यात कधीपासून भिनलंय् विचारतां ? मला वाटतं त्याच्या अगदी बालपणापासूनच. कारण आजही तो नावांसकट त्याने पाहिलेल्या विविध गांवगांव, बस्तीबस्ती, शहरशहर और नगरडगरचे सविस्तर वर्णन करू शकतो. त्याचे वडिलांची बदलीची ठिकाणे आणि दौऱ्यांच्या जागीं तर तो असंख्य वेळां गेला आहेच पण वयाच्या उत्तरार्धातही लेक-जांवई नि मुलगा सुनेबरोबर (होय नातींबरोबर देखील ! ) त्याने भरपूर भटकंती केलेली आहे. मात्र स्वत:च्या धडपडीच्या काळांत काही मोजक्याच ठिकाणी त्याचे भटकणे झाले हेही खरेच.
त्याला सर्वप्रथम भावलं ते त्याचे आज्जोळ उजैन ! फ्रीगंज माधवनगर मधली टोलेजंग ए.के.बिल्डिंग त्याला खूप आवडायची. आज्जी-आजोबा, मामालोक नि मामे-मावस भावंडांत बऱ्यापैकी रमायचा तो, पण जास्त वेळ एकट्याने घालवायचा. स्थूल शरीरमानामुळे मैदानी खेळ फारसे जमले नसले तरी संघाचे बाळकडू त्याला उज्जैन नगरीं मिळाले हे तो कौतुकाने मान्य करेल.
निमाड प्रांतातील खरगोण जिल्ह्यात वसलेली इटुकली सेगांव ही नगरी तेव्हा मोठी वाटायची त्याला, प्रत्यक्षात जेमतेम हजार पाचशे उंबरढे असावेत - बहुतेक करून, त्याच्या अंदाजाने, त्याला वाटतं की ! असो.
नंतर राजस्थान बॉर्डरवरील गरोठ हे नगर. तिथे त्याची ‘सोडमुंज’ झाली, तो शाळेत जाऊ लागला तिथल्या आणि ती नगरी त्याला खूप आवडली. भरपूर मोर, ससे, कोल्हे नि खूपश्या शेळ्यामेंढ्या, दुभती जनावरें म्हणजे गाईम्हशींच्या मागे भरपूर भटकायला आवडू लागले त्याला !
आह, शिवपुरी ! एक नितान्त सुंदर नगरी नि:शंकपणे. सिंधिया राज्यातले एक हिलस्टेशन लाल मातीने माखलेले सर्वदूर. उत्तम प्रकारे आंखीवरेखीव पद्धतीने वसविलेले हे नगर म्हणजे विलक्षण निसर्गरम्यता, एकाहून एक सरस सुंदर दगडी बंगले किंवा ‘कोठी’, सुंदर आखलेले रस्ते चौक आणि दुतर्फा लावलेले विशाल वृक्ष नि विजेचे दिवे वगैरेंमुळे तत्कालीन महाराजांची दुसरी राजधानी असलेल्या या नगरीं सलग तीन वर्षें राहण्याचे भाग्य आमच्या प्रभूलाही लाभले. तोंवर तो बारा वर्षांचा झाला होता नि बाराव्या वर्षातले सर्व गुणधर्म उफाळून वर येत होते. नुकतीच मोठी सायकल चालवूं लागल्यामुळे शिवपुरी नि परिसर दररोज अक्षरश: पालथा घालत असे हा गडी. मनोरथा चल त्या नगरीला, नगरी कसली भूलोकींचा स्वर्गच होता तो.
त्यानंतर इन्दौर शहरीं पुन्हा वास्तव्य झाले त्याचे पुढची पंचवीस वरूषें. तिथे तो छानच रमला. इन्दौरबद्दल फार सेन्सिटिव्ह आहे तो बरं का. कुणी इंदूरचे नाव जरी काढलं तरी तो अहमहमिकेने बोलत सुटतो कोणी त्याला अडवेपर्यंत ! त्याच्या इन्दौर वास्तव्याचे किस्से म्हणजे कित्येक रिळें कागद फस्त करतील. म्हणून पुढच्या नगरांकडे वळूंया.
खरं तर जस्ट टु कट् ए लॉन्ग स्टोरी शॉर्ट, त्याला कितीतरी डझन नगरें मनापासून आवडली, भूलोकींच्या अमरावती एव्हडी नसलीत तरी, अर्थात केवळ एक अपवाद - प्रशांति निलयम्’चा ! मग ते लंडन असो, फ्लोरेन्स, वाई-महाबळेश्वर, इगतपुरी, शाजापूर, मैसूर, चित्रदुर्ग, पांवस, खामगांव आणि अर्थातच रग्बी ! !
प्रभू रहाळकर
८ जुलाब २०२५
लंडन.