Monday, July 21, 2025
फलहेतुचा पांजरा !
फलहेतुचा पांजरा !
ज्ञानेश्वरी अधिक काळजीपूर्वक अभ्यासत असताना एका ओंवीतले हे शब्द अस्वस्थ करून गेले. मुळात ती संपूर्ण ओवी अशी आहे - ‘तैसा फलहेतुचा पांजरा / सांडूनिया धनुर्धरा / कां प्रतीतिपाखीं चिदंबरा / गोसाविया नोहावें //‘ ( ७/१५४ )
( फलहेतु = फलाशा ; पांजरा = पिंजरा ; सांडूनिया = टाकून, मोडून ; प्रतीतिपाखीं = स्वानुभवरूपी पंखाने ; चिदंबरा = चिदाकाशांत ; गोसाविया = समर्थ पुरूषाने )
या ओंवीचा सोप्या मराठीत अर्थ लावून पाहण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी समजून घेऊया. जे कोणी काही ऐहिक फल मिळवण्यासाठी विविध देवीदेवतांचे श्रद्धापूर्वक आणि यथायोग्य पूजन करतात, आराधना करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतातही. मात्र ते फल सुद्धा ऐहिकच असल्याने क्षणभंगुर ठरते, ते शाश्वत नसते. अर्थात ते फल देणारा अंततोगत्वा मीच तर असतो ना !
मात्र भगवंत सांगतात की ‘माझी’ आराधना करणारा अंतत: माझ्यातच मिसळून जातो, नव्हे मीच होऊन जातो. तथापि, ‘जाणती ना मातें / सर्वथा ते भक्त / गेले कल्पनेंत / गुंतोनि जे //
‘म्हणोनियां फळ / पावती कल्पित / जे का नाशिवंत / स्वभावेंचि //
फार काय सांगूं, असे आराधन म्हणजे निव्वळ या नश्वर संसारापुरते मर्यादित राहून त्याचा फलभोग सुद्धा स्वप्नाप्रमाणे क्षणमात्र असतो. ही चर्चा तात्पुरती बाजूला ठेवून मी म्हणतो की कोणत्याही देवतांची पूजा केली तर त्याला ते देवत्व प्राप्त होईल. मात्र जो सद्भक्त तन, मन, प्राण पणाला लावून माझेच आराधन करील ते देहान्तीं मीच होतील हे नीट समजून घे अर्जुना’.
तरीही अनेक साधक तसे न केल्यामुळे स्वहित साधून घेण्यात अपयशी ठरतात. अरे, त्यांचे तसे वाागणे म्हणजे तळहातावरील पाण्यांत पोहण्यासारखे निरर्थक ठरते ! असे पहा, अमृताच्या सागरात बुडत असतांना तोंडाला वज्रमिठी मारावी नि डबक्यातल्या पाण्याची आठवण यावी असे हास्यास्पद वर्तन करण्याऐवजी त्या अमृतसागरातच बुडून अमर का होऊं नये ?
अगदी तसेच, फलाशेचा पिंजरा तोडून स्वानुभवाच्या, आत्मानंदाच्या पंखांनी चिदाकाशांत कितीही उंच भरारी मारली तरी त्या आकाशाचा थांग लागणार नाही ! अशा त्या चिदाकाशांत उंच उंच भरारी मारण्यासाठी समर्थ का होऊ नये बरे ! !
अरे जो अमाप आहे, अमर्याद आहे त्याचे मोजमाप घेण्याचे श्रम घेऊन विनाकारण का बरे शिणावे ? प्रत्यक्ष मी, पूर्णकाम स्वयंसिद्ध समोर उभा असताना या जडजीवांना ते उमजत नाही याचेच वैषम्य वाटते खरे !
अरे हे लोक माझ्यावरील योगमायेच्या आवरणामुळे आंधळे झाले आहेत म्हणून माझे स्वरूप ज्ञान-प्रकाशात पाहण्यास ते असमर्थ ठरतात.. एऱ्हवी मी नाही अशी कोणतीही वस्तु अस्तित्वातच नाही. ते असो, या विश्वांत मीच मी सर्वत्र भरून आहे हे नीट ध्यानात घे धनुर्धरा ! ! !
रहाळकर
२१ जुलाय २०२५.