Wednesday, July 02, 2025
माझी तिशीतली कविता !
माझ्या तिशीतली कविता !
होय, मी मनाने तिशींत असताना लिहिलेली ही कविता तुम्हाला देखील आवडेल. लंडनच्या बस मधून फिरत असताना एक ठेंगणी ठुसकी गौर वृद्ध महिला बस-स्टॉपवर धडपडत चढली. पुढे काय घडले ते पहा !
“एक वृद्धा ऐंशीतली……! “
‘एक वृद्धा ऐंशीतली
चढली आधार घेत घेत
नि धडपडत येऊन आदळली
माझ्या शेजारीं.
सर्वांना केलं ‘हाय एल्लो’
मला विचारलं ‘इटालियन ? इंडियन ?
मान डोलावतांच सांगत सुटली
आपलाच पूर्वेतिहास.
म्हणाली, ‘मी आहे पेशन्ट सायकॉलॉजिक
पॅरॅनॉईड सिझोफ्रेनिक !
आधी होत्ये नाजुक, सुंदर
तीन मुलें झालीत
माझी नव्हेत, ‘देवाची’ !
(सुखात आहेत आपापल्या बिऱ्हाडीं ! ! )
आतां फिरत्ये ‘नन्’ म्हणून सर्वांसाठी ‘प्रे’ करीत,
गॉड ब्लेस्स् यू sss !
खरंच का पेशंट ही, प्रश्न पडतो मला
शाहाणी ही की सिझोफ्रेनिक,
कुणी ठरवायचं बुवा !
तरतरीत नाकेली
गौर सुरकुतलेली
चमकदार बोलके डोळे
तोंडाची कवळी झालेली !
मात्र त्या नजरेमागची
खोलवर दडलेली वेदना, कणव, संवेदना -
हेलावून गेली माझ्या मनाला !
वार्धक्य सुद्धा इतकी भुरळ घालूं शकतं ?
अंतर्मनाला जागं करीत तडफडायला लावूं शकतं ?
तेव्हा असेलही कदाचित् नाजुक, सुंदर -
आज मात्र ‘सौंदऱ्याचा’ निराळाच अर्थ सांगून गेली !
तो आत्मविश्वास, तो स्वाभिमान
ती विजेरी नजरेची चमक
तो करूण भाव, ती भावस्पर्षी दास्तां,
जगत् कल्याणाची उठाठेव
नि मंगल-सुमंगलाचाच उद्घोष ! !
खरं सौंदऱ्य कुठे दडलंय् ?
पाहणाऱ्याच्या नजरेत
की अंतर्मनांत दडून बसलेलं ?
उफाळून येतात अशा एखाद्या क्षणीं
आनंदाच्या सरी
आनंदविभोर मी, आनंदविभोर मी !
प्र.शं.रहाळकर
मुंबई.पो.लंडन
२८ सप्टेंबर २००७