Friday, July 18, 2025
archbishop of Canterbury !
आर्चबिशप ऑफ़ कैंटरबरी !
वरील मायना पाहून बुचकळ्यात पडलांत ना ? खरंतर मी देखील, कारण हा मथळा उगीचच कानात गुणगुणत होता कालपासून. मग वाटलं झोडून टाकावं एखादं स्फुट, ज्याने तुमच्या नि माझ्यात सुद्धा काही ज्ञानप्रकाश उजळून निघेल !
वास्तविक ‘ आर्चबिशप ऑफ़ कैंटरबरी’ हा चर्च ऑफ इंग्लंडचा आध्यात्मिक गुरू. माझ्यासकट बहुतांचा समज असतो की ख्रिश्चियन म्हणजे निव्वळ कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट असतात. तथापि या धर्मात देखील कित्येक पोटजाती आहेत ज्या एकमेकांना मानत तर नाहीतच पण दु:स्वास सुद्धा करत आलेल्या आहेत एकमेकांचा. ते असो.
या निमित्त मला सांगायचंय विविध धर्मांतील त्यांच्या धर्मगुरूंबद्दल. खरंतर धर्मगुरू ऐवजी पुजारी म्हणणे अधिक औचित्यपूर्ण ठरेल. आपल्या हिंदू संस्कृतीत ईश्वराची पूजा करणारा किंवा ‘बांधणारा’ पुजारी म्हणूनच ओळखला जातो, जो निरनिराळी पूजाविधानें करीत देऊळातल्या देवाला किंवा घरच्याही देवांना षोडषोपचार पद्धतीने पूजित असतो. आमच्या लहानपणी धरातला देव्हारा गच्च भरलेला असे देवीदेवतांच्या प्रतिमांनी आणि अनेक तसबिरींनी. आजोबा, काका, वडील वगैरे सर्व सर्कारी नौकरीवाले म्हणून त्यांना पूजाअर्चना करायला वेळच नसे बहुधा. म्हणून महिना तीस रुपयांवर धोंडूगुरूजी पूजा करायला येत. पूजेची प्राथमिक तयारी आई किंवा आजी करून ठेवायची. मात्र भरपूर गंध उगाळण्यापासून देवाची वस्त्रें धुण्यापर्यंत सर्व उपचार गुरूजी करीत. ते हातपाय धुवून आधी सोंवळे नेसत आणि देवघरात शिरताशिरतां स्तोत्रें म्हणायला सुरूवात करीत मोठ्याने आणि स्पष्ट उच्चार करीत. त्यांचा गळा गोड असल्याने ते पूजाविधान हवेहवेसे वाटायचे तेव्हा. मला वाटतं त्यांचे स्तोत्रपठण दररोज कानांवर पडल्यामुळे बरीचशी स्तोत्रे आम्हालाही पाठ झाली होती. अर्थात त्यावेळी आमचे उच्चार नकळे का पण बरेचसे अशुद्ध असत ( जे विवाहानंतर पत्नीने रिपेअर करून दिले ! ) असो.
पारशी धर्मांतील पुजाऱ्याला ‘मोबद’ किंवा ‘दस्तुवान अथवा दस्तूर’ या नावाने ओळखले जाते तर इस्लाम मधे पूजाविधनच नसल्याने तिथे पुजारी वगैरे कोणी नसतो. तथापि प्रार्थना सांगणारा किंवा प्रारंभ करणारा ‘इमाम’ असतो जो इस्लाम विषयक माहिती अधिकृतपणे देऊ शकतो.
जैन धर्मांत पुजारी नसतात पण साधू आणि साध्वी या अतिशय कडक साधना करणाऱ्या आणि नितांत सोज्वळ दिनचर्या पाळणाऱ्या व्यक्ती जैन धर्माचे पावित्र्य, संस्कार आणि उपासना पद्धत आचरण करीत प्रसृत करतात. त्यांच्यांत ‘पुजारी’ ही संकल्पना नाही.
बौद्ध धर्मांत ‘भिक्षु’ आणि ‘भिक्षुणी’ असतात जे स्वत: आचरण करीत बौद्ध अनुयायांचे मार्गदर्शन करतात. इथेही कोणी पुजारी असा नाही.
पुजारी आणि धर्मगुरू यांत भरपूर तफावत असू शकते कारण पुजारी हा बहुधा विधिविधान करणारा तर धर्मगुरू हा आपल्या धर्माची यथार्थ माहिती असणारा, प्रबोधन करू शकणारा आणि सहसा, होय सहसा, त्याचे आचरण करणारा असू शकतो. पुन्हा, धर्मगुरू नि सद्गुरू यांतही भरपूर तफावत असते हे विसरून चालणार नाही. ते विषयीं पुन्हा कधीतरी ! !
रहाळकर
१८ जुलाय २०२५
लंडन.