Tuesday, May 06, 2025
बोध आणि प्रबोध !
बोध आणि प्रबोध !
‘बोध’ म्हणजे समजणे, जाणून घेणे, आत्मसात करणे किंवा जागृत होणे होय, तर ‘प्रबोध’ म्हणजे आपल्याला समजलेले, आत्मसात झालेले इतरांना यथार्थपणे समजावून सांगण्याची हातोटी, कला किंवा एक्स्पर्टीज् !
अगदी खरे सांगायचे तर बोध म्हणजे आत्मज्ञान होणे, मी म्हणजे नक्की काय नि कोण याची दृढ संकल्पना हृदयांत कायम स्थिरावणे नि ती जोपासणे. मला जर मी कोण हे कळले तरच तूं काय किंवा कोण हे खात्रीपूर्वक सांगतां येईल तुला निश्चितपणे कळेल असे ! वास्तविक दोन्ही अवघड आहेत आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी.
‘बोध’ नि ‘प्रबोध’ हे शब्द ओठांवर येताच सर्वप्रथम आठवतो समर्थांचा दासबोध जो प्राचार्य के. वि. बेलसरे यांनी अधिक सोप्या शब्दांत विवरून सांगितला. मला वाटतं यांत बोध नि प्रबोध एकाच ग्रंथातून कळण्यासारखे झाले आहेत. तसे पाहिले तर ‘मनोबोध’, साधुबोध, गौतम बुद्धांचा ‘निर्वाण’ बोध वगैरे सांगतां येतील, जे आपापल्या दृष्टीने अभ्यासतां यावेत. कधीकधी खूप कन्फ्यूजिंग वाटतं हे सगळं !
तथापि, अशा संभ्रमावस्थेत माऊली मार्गदर्शन करायला सरसावल्या नाहीत तर त्यांना माऊली कोण म्हणणार ! सबब त्यांच्याच दोनतीन ओंव्यांवर जरासे मंथन करून मगच पुढे जाऊया.
ज्ञानेश्वर कन्या, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचा साधुबोध जिज्ञासूंनी आधी पहावा आणि मग माऊलींच्या ओंव्या.
आपल्या ‘हरिपाठात’ माऊली म्हणतात -
‘साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला / ठाईच मुराला अनुभव //‘
आणि लगेचच दृष्टांत देतात -
‘कापुराची वाती उजळली ज्योती / ठायींच समाप्ती झाली जैसी //‘ ( ज्याला साधुबोध झाला तो आत्मज्ञानामुळे तत्क्षणीं ब्रह्मानंदांत लीन झाला. मग त्याने देहत्याग केला तरी त्याचे नांव, कीर्ती आणि योग्यता टिकून राहते आणि ती ब्रह्मानंदी अवस्था किंवा तसा अनुभव तेथल्या तेथे ब्रब्मानंदातच विलीन होतो. अथवा, कापुराची वात करून पेटवली तर ती वात देखील उजळून निघणाऱ्या प्रकाशांत लुप्त होऊन जाते. )
‘बोध नि प्रबोध’ यांवर थोडा विचार करू म्हणताच गाडी पहा कशी रूळ बदलत गेली ! !
क्षमाप्रार्थी हूं क्यों की यहां बोध और प्रबोध दोनो ही गायब नजर आयेंगे.
रहालकर
६ मई २०२५