Sunday, March 30, 2025
विक्रम नि त्रिविक्रम !
विक्रम नि त्रिविक्रम !
यंदाचे नूतन संवत्सर ‘विक्रम’ या नावाने संबोधले जाईल असे ऐकले होते पण त्यात तथ्य नाही. वास्तविक विक्रम संवत् हे मध्यप्रदेशातील मालव प्रांत किंवा माळव्यांतील अतिप्राचीन उज्जयिनी अथवा उज्जैनचा शासक चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचे नावाने प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. खरेंतर इतिहास नि गणित हे दोन्ही विषय मुळातच अधू राहिल्याने पुढे त्या अनुषंगाने येणारी अनेक कवाडें बंद झाली ती कायमची. त्यांत पंचांग, ग्रहांचे परिभ्रमण, आणि त्यातून उद्भवणारे फल-ज्योतिष्य वगैरे महारथी कोसों दूर राहिले आणि त्यांत भर पडत गेली इंग्रजी नि भारतीय क्यालेंडरे आणि पंचांगांची. अजूनही दोन्ही अनाकलनीय वाटत राहिल्या आहेत मला. असो.
मात्र मागील वर्षांचे क्रोधी नाम संवत्सर बऱ्यापैकी त्या नावाची चुणूक अधूनमधून देत राहिले आणि ग्रहांची फारशी तमा न बाळगणाऱ्या मला थोडे बहुत चटके देखील सहन करावे लागले. कदाचित तसल्या अनुभवांवरून आता ‘विक्रम नाम’ काहीसा हुरूप देईल असा विश्वास वाटू लागला आहे !
‘अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?’ असा सवाल येण्याआधी रूळावर येण्याचा प्रयत्न करतो.
विक्रम हा शब्द आठवताच अगदी पहिले नाव समोर आले ते राजा विक्रमादित्य यांचेच. लहानपणी त्या राजाच्या कित्येक सुरस कथा ऐकल्या आणि वाचल्यादेखील होत्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणा प्रताप, बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल, राजा विक्रमादित्य (आणि राजा रविवर्मा देखील) वगैरे मंडळी खूप प्रिय झाली होती. अनेक वर्षांनंतर विक्रम-वेताळ वगैरे कॉमिक्स हाती पडली असली तरी विक्रमादित्यांचे रोमहर्षक किस्से त्या बालवयांत खूप आवडत, कदाचित प्रेरक ठरत.
त्यात शाळेतला बालमित्र विक्रम पाटणकर त्याच्या विलक्षण बुद्धिचातुर्याने, अत्यंत खिलाडू वृत्तीमुळे आणि धाडसी उपद्व्यापांमुळे आम्हा सर्वच वर्गमित्रांचा अतिशय लाडका होता. नंतर नंतर विक्रम साराभाई, विक्रमवीर सुनील गावसकर, विक्रम गोखले वगैरेंचा मी चाहता झालो.
शिवपुरीला असतांना चितळे मास्तरांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे नाव ‘त्रिविक्रम’ असे ठेवलेले स्पष्ट आठवते. वास्तविक भगवान विष्णूंचे नाव आहे हे आणि वामन अवतारांत निव्वळ तीन पावलांत तिन्ही लोक सहज पादाक्रांत करणाऱ्या वामन-अवताराचे ‘त्रिविक्रम’ नाम आहे.
खरंच सांगतो, विक्रम-त्रिविक्रम हे शब्द उच्चारतांच वरचे सगळे चऱ्हाट मांडून मोकळे व्हावेसे वाटले आणि म्हणून तुम्हास वेठीस धरले गेले. क्षमस्व ! !
मऱ्हाटी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
रहाळकर
३० मार्च २०२५
वर्ष प्रतिपदा