Tuesday, March 25, 2025
एक की शून्य ?
एक की शून्य ?
आज उषाशी सहज बोलताना ‘एक’ अधिक महत्वाचा की ‘शून्य’ यावर मजेशीर चर्चा झाली. आधी वाटलं की ई.स. ६२८ मध्ये ब्रह्मभट्ट या भारतीय गणितज्ञाने शोधलेले ‘शून्य’, जे अखिल विश्वाने एकमुखाने मान्य केले, तेच सर्वोपरी महत्वाचे असावे. मात्र ही ऐतिहासिक बातमी मला ‘गूगल् बाबा’ कडून मिळाली होती आणि त्या बाबाचा मी अंधश्रद्ध नक्कीच नाही. कारण मला स्वत:चे जे मत असते तिथे गूगलच काय कोणताच बाबा हस्तक्षेप करू शकत नाही !
खरेतर शून्यातूनच महा-शून्याची संकल्पना रूढ झाली असावी, जी आपली अनादी वेद-शास्त्रें-पुराणें सांगत आली आहेत असे म्हटले जाते.
वास्तविक शून्याची महती सांगायला माझी वाणी असमर्थ आहे याची मला जाण असली तरी महा-मूर्खांचे ते अद्वितीय लक्षण असते असे मानून तुम्ही सूज्ञांनी तिकडे काणाडोळा करावा ही नम्र विनंती. नमनालाच सर्व तेल वापरून ते वांया घालू नये असे कुणास ठाऊक का मला आत्ताच जाणवले. सबब मूळ मुद्यावर येतो.
असे पहा, एक शून्य जर एक या संख्येआधी लावले तर एकाची किंमत एक राहते, पण तेच जेव्हा एकाच्या पुढे लावले तर त्याच एकाची किंमत दहा होते आणि ती प्रत्येक शून्याबरोबर ‘एकम्, दशम्, शतम्, सहस्त्रम् अशी वृद्धिंगत होत जाते. हे सगळे आपण पहिली दुसरीत शिकले आहोंत. म्हणजेच ‘एक’ची किंमत कमी जास्त करायला शून्याचे महत्व जास्त नाही काय ?
ते असो.
‘एक अधिक महत्वाचा की शून्य’ हे ठरवताना ‘पहिले मुर्गी या पहिले अंडा’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. अर्थात या आधीच मी ‘पहिले अंडा’ हे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहेच. त्या वेळी अंड्याला ब्रह्मांड या अतिउच्च पातळीवर नेऊन ठेवले होते आणि ब्रह्मांड हेच सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे मूळ स्थान असल्याने त्यांत ‘मुर्गी’ देखील आलीच की !
अगदी तसेच शून्य हे एकापेक्षा अधिक महत्वाचे असे सिद्ध करता येईल. त्या ‘एका’ला अनेक होण्याची ‘इच्छा’ झाली म्हणूनच हे जग ‘निर्माण’ झाले असे म्हटले तर ‘शून्या’तून ‘महाशून्या’कडे वाटचाल करणे क्रमप्राप्त का ठरूं नये ? तसेही अमक्याने अगदी शून्यातून हे वैभव निर्माण केले असा आपल्याकडे वाक्प्रचार आहेच ना ?
तर मग त्या शून्याला ‘अ-क्षर’ पुरूष म्हणता येईल का, अव्यक्त स्वरूपात असूनही विश्वनिर्मितीची क्षमता असलेला !
खरंच मजेशीर आहे ना हे सर्व चर्वीचरण करायला ?
जस्ट प्लेटफुल्स ऑफ फूड फॉर थॉट ! ! !
रहाळकर
२५ मार्च २०२५