Sunday, February 23, 2025
सागर दर्शन !
सागर दर्शन !
इंदौरचं आमचं राहातं घर सुटल्यावर बहुधा प्रथमच आम्ही केवळ भावंडं एकत्रपणे सलग पाच दिवस कोंकणातल्या सागर-किनारीं मुक्काम केला. कल्पना होती सर्वात धाकट्या बंधूची की आपण सडी भावंडें कोंकणात काही दिवस एकत्र राहूं एखाद्या ‘होम-स्टे’मधें. मात्र लेक नि जांवयांनी उत्तमातल्या उत्तम ‘रिसार्ट्स’ चे आगावू बुकिंग केले आणि आम्ही घरच्या दोन मोटारींनी तिकडे कूच केले.
नुसते बुकिंगच नव्हे तर पूर्वतयारी म्हणून त्यांनी नवीन पोषाख आणि ‘स्लिपऑन’ बूट खरेदी करून दिले आणि सोबत वाटेत जातायेतांना खायची प्यायची प्रचंड प्रमाणात खादाडी पियाडी पॅकेट्स भरून दिली !
अतिशय उत्साहांत नि रंगबिरंगी जर्किन बर्म्युडांमधे आमचा प्रवास सुरू झाला नि पूर्व अनुभवांच्या जोरावर मस्त भजीं आणि ‘चाय’चा लुत्फ घेत मार्गस्थ जाहलों. जातांना ‘सरपंच ॲंड सन्स’ या अतिउच्च शिक्षित मुलामुलींनी म्यानेज केलेले रेस्ट्रां पाहून थक्क झालो कारण विलक्षण स्वच्छ, सुंदर, सुबक नि भव्य स्थळ निघाले तें.
कोकणातल्या नागमोडी वळणदार रस्त्यांवरून सुसाट जात असताना श्रीवर्धन नजिकच्या ‘सी-व्ह्यू रिसार्ट’ वर डेरेदाखल झालो. अगदी सागर किनाऱ्यावरील हे आणि नंतर गाठलेले दापोली नजीकचे रिसार्ट अक्षरश: पंचतारांकित असेच होते आणि सागर दर्शन म्हणावे तर समुद्राकडे तोंड करून उभे राहिले असतां आपले दोन्ही हात आडवे पसरले तर डाव्या हाताच्या बोटांपासून उजव्या हाताच्या बोटांमधे जेवढा सागर सामावतां येईल इतका लांबच लांब सागर किनारा असलेले ! (कळले ना मला काय म्हणायचंय् ते ?) असो.
दिवसा नि रात्री सागराची ‘भरती आणि ओहोटी’ सहज ओळखतां येऊं लागली, लाटांच्या कमीजास्त होणाऱ्या आवाजावरून. रात्रंदिवस सतत वाहात असलेला घोघावणारा वारा उन्हाळ्याची चाहूल सहज लपवून ठेवू शकला.
केवळ ‘चिल् आऊट’ साठी आलेले असल्याने दुसरे कोणतेही व्यवधान नव्हते. अधूनमधून बालपणींच्या आठवणी पुन्हा शेअर करण्या व्यतिरिक्त संवाद असा क्वचित् रंगला मात्र या सहलींत स्वत:शी स्वत:चा संवाद किंवा चिंतन भरपूर घडले इतके मात्र खरे !
खरोखर खराखुरा एकान्त अनुभवायचा असेल तर सागरकिनारीं निवान्तपणे राहून यावे असे मला निश्चितपणे जाणवले खरे ! !
रहाळकर
२३ फेब्रुवारी २०२५.
Monday, February 03, 2025
ध्यायतो विषयान्पुंस: ……!
ध्यायतो विषयान्पुस: ……..!
आज स्वाध्याय करण्यासाठी ज्ञानेश्वरी उघडली आणि समोर श्लोक आले दुसऱ्या अध्यायातील बासष्ट नि त्रेसष्ट. वाटले यांवरच थोडेसे चिंतन करावे. तर मग चला माझ्या बरोबर !
“ध्यायतो विशयान्पुंस: संगस्तेषूपजायते । संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते ॥६२॥
आणि
“क्रोधाद् भवति संमोह: संमोहात् स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद् बुध्दिनाशो बुध्दिनाशात् प्रणश्यति ॥६३॥”
या दोन श्लोकांवर माऊलींनी केलेले निरूपण आधी पाहूं.
ते सांगतात -
‘जरी हृदयीं विषय स्मरती / तरी निसंगाही आपजे संगती / संगीं प्रगटे मूर्ती / अभिलाषाची // ( मनात विषयांची नुसती आठवण जरी झाली तरी नि:संग झालेल्या म्हणजेच सर्वसंगपरित्याग केलेल्या पुरूषाला देखील विषयांची ओढ लागून ते प्राप्त करण्याची इच्छा होते )
‘जेथ कामु उपजला / तेथ क्रोधु आधीच आला / क्रोधीं असे ठेविला / संमोहु जाणें // (जेव्हा कामना जागृत होते आणि कामनापूर्ती जेव्हा होत नाही त्या वेळीं क्रोध आधीच दबा धरून बसलेला असतो आणि त्या सुप्त क्रोधात भ्रांती देखील दडून असते.)
'संमोहा जालिया व्यक्ती / तरी नाशु पावे स्मृती / चंडावातें आहत / ज्योती जैसी // (ज्याप्रमाणे सोसाट्याचे वाऱ्याने दीप विझून जातो तसे संमोह निर्माण होताच उपदेशात्मक स्मृती नष्ट होत असते)
‘कां अस्तमानें निशी / जैसी सूर्य-तेजातें ग्रासी / तैसी दशा स्मृतिभ्रंशी / प्राणियांसी // (अथवा सूर्यास्ताचे वेळीं येणारी रात्र सूर्यतेजाला गिळून टाकते, अगदी तसेच स्मृतिहीन माणसाची दयनीय अवस्था होते.)
‘मग अज्ञानांध केवळ / तेणें आप्लविजे (बुडणे) सकळ / तेथ बुध्दी होय व्याकुळ / हृदयामाजीं // (अशा वेळीं सर्व ज्ञान मावळून सर्वत्र अज्ञानाचा अंधार तेवढा शिल्लक उरतो आणि म्हणून कोणताही अन्य विचार करता येत नसल्याने बुध्दी अत्यंत व्यग्र होते.)
एक सोपा दृष्टांत देतात माऊली -
‘जैसे जात्यंधा (जन्मत: आंधळा) पळणीं पावे / मग ते काकुळती सैरा धांवे / तैसे बुध्दिसी होती भंवें (भ्रमण) / धनुर्धरा // (एखादा जन्मत:च आंधळा माणूस काही कारणाने जर धावपळीत अडकला तर निरूपायाने तो जसा दीनवाणा सैरावैरा पळत सुटेल, तशी बुध्दीची अवस्था होते.)
‘ऐसा स्मृतिभ्रंश घडे / मग सर्वथा बुध्दी अवघडे (घोटाळते) / तेथ समूळ हें उपडे (नष्ट होते) / ज्ञानजात // (असा स्मृतिभ्रंश होताच बुध्दी गोंधळून जाते आणि मिळवलेले सर्व ज्ञान लोप पावते.)
आतां कळीच्या मुद्यावर येऊन सांगतात की हे अर्जुना,
‘चैतन्याच्या भ्रंशीं / शरीरा दशा जैसी / तैसें पुरूषा बुध्दिनाशीं / होय देखैं //
‘म्हणौनि आइकें अर्जुना / जैसा विस्फुल्लिंग लागे ईंधना / मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना / पुरों शके //
‘तैसें विषयांचे ध्यान / जरी विपायें वाहे मन / तरी येसणें (एवढें) हे पतन / गिंवसीत पावे (शोधीत येते) //
आतां, वरील सर्व ओंव्या वाचल्यावर सायकल स्टॅंडवर उभ्या केलेल्या सायकली पहिलीला जरासा धक्का देताच जशा एकमेकांवर कोलमडतात, तसे निव्वळ विषयांच्या स्मरणाने कसा संगदोष, त्यातून अभिलाषा, मग क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, भ्रांती नि बुध्दीची अगतिकता आणि संपूर्ण अज्ञानावस्था नि ‘प्रणश्य’ निफजते हे समजले तरी मुळात ‘विषयांचे’ स्मरण होणे अगदी स्वाभाविक नाही काय ? थेट बालवयापासून आजतागायत आपण कोणीही विविध विषयांपासून कधीच वेगळे राहिले नसतो. तर मग विषयांची आठवण देखील न राहण्यासाठी कोणते खटाटोप किंवा साधन करायला हवे ? जरा त्रासदायक आणि कठीण वाटत असले तरी कुणी तज्ञ मंडळी यावर मार्गदर्शन करतील काय ?
रहाळकर
३ फेब्रुवारी २०२५